नया पाकिस्तान

Homeताज्या बातम्यासंपादकीय

नया पाकिस्तान

पाकिस्तानमध्ये अखेर सत्ताबदल झालाच. तब्बल एक महिनाभर चाललेल्या राजकीय घडामोडींचा शेवट पाकिस्तानच्या संसदेमध्ये हाय व्होल्टेज ड्रामाने झाला. विद्यमान

दहशतवादाची किंमत
राजकारणाचे गुन्हेगारीकरण
संसदेचा आखाडा

पाकिस्तानमध्ये अखेर सत्ताबदल झालाच. तब्बल एक महिनाभर चाललेल्या राजकीय घडामोडींचा शेवट पाकिस्तानच्या संसदेमध्ये हाय व्होल्टेज ड्रामाने झाला. विद्यमान पंतप्रधान इम्रान खान यांच्याविरोधातील अविश्वास ठराव मंजूर करण्यात आला आणि त्यांची पंतप्रधानपदाची इनिंग ३ वर्षे, २२८ दिवसांनी संपुष्टात आली. इम्रान खान यांच्या जागी पाकिस्तान मुस्लीम लीग-नवाझ पक्षाचे (पीएमएल-एन) अध्यक्ष शाहबाझ शरीफ हे नवे पंतप्रधान झाले. विरोधी पक्षनेते शाहबाझ शरीफ यांनी इम्रान खान यांच्याविरोधात ८ मार्च रोजी पाकिस्तानच्या संसदेमध्ये अविश्वास ठराव मांडला होता. दरम्यान देशात निर्माण झालेली आर्थिक संकटाची परिस्थिती आणि बोकाळलेला भ्रष्टाचार या कारणांमुळे हा ठराव त्यांच्याकडून मांडण्यात आला होता. इम्रान खान यांनी यावर विरोधकांची ही खेळी म्हणजे, परकीय शक्तींचा कट असल्याची टीका केली होती. मात्र इम्रान यांनी राजकीय चाल रचताना पाकिस्तानच्या संसदेचे उपाध्यक्ष कासिम सुरी यांना हाताशी धरून ठरावच अवैध ठरवत फेटाळून लावला होता. त्याचप्रमाणे ९० दिवसामध्ये पुन्हा निवडणुका घेण्याची मागणी केली होती. राष्ट्रपती अल्वी यांच्यावर दबाव आणून ३४२ संसदीय सदस्यांची संसदच बरखास्त केली. विरोधकांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितल्यानंतर इम्रान खान अडचणीत आले. पाकिस्तानमधील संसदेने उपाध्यक्षांचा निर्णय घटनाबाह्य ठरवत अविश्वास ठरावावर मतदान घेण्याची परवानगी दिली होती. इम्रान खान स्वत: या ठरावाच्या मतदानावेळी गैरहजर राहिले. त्यांच्या पक्षाच्या खासदारांनी मतदानादरम्यान सभात्याग केला होता. त्यामुळे एकूण ३४२ सदस्यांच्या संसदेमध्ये १७४ मतांनी हा अविश्वास ठराव मंजूर झाला. अविश्वास ठराव मंजूर होण्याआधीच इम्रान खान यांनी संसदेतील पंतप्रधानांसाठी असलेली जागा सोडलेली होती. शाहबाज शरीफ हे आता पाकिस्तानचे नवीन पंतप्रधान.
पाकिस्तानचे नवे पंतप्रधान म्हणून शाहबाज शरीफ यांची निवड झाली. माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांचे बंधू व पंजाब प्रांताचे माजी मुख्यमंत्री शाहबाज शरीफ यांच्याकडे आता देशाची सूत्रे आली आहेत. इम्रान खान यांना अविश्वासदर्शक ठरावाद्वारे, संसदीय मार्गाने सत्तेवरून खाली खेचण्यात यश आल्याने पाकिस्तानमध्ये अशा पद्धतीने राजीनामा देणारे इम्रान खान हे पहिले पंतप्रधान ठरले आहेत. हा सत्ताबदल इम्रान खान यांच्या ‘पाकिस्तान तेहरिक-ए-इन्साफ’ या पक्षाच्या कार्यकर्त्यांसह पदाधिकारी नेत्यांना पचविणे तेवढे सोपे नक्कीच नाही. त्यातून सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे लोक अजूनही रस्त्यावर आमने-सामने येऊ शकतात. तशी पाकिस्तानात स्थिती सुद्धा आहे. इम्रान खान यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी लाहोर, कराची, मुलतान आणि फैसलाबाद या शहरांमध्ये जोरदार निदर्शने केली. त्यातून इम्रान खान यांचा ‘नया पाकिस्तान’ आणि शाहबाज शरीफ यांचा ‘पुराना पाकिस्तान’ असा घनघोर संघर्ष पाहायला मिळू शकतो.
पाकिस्थान मधील सत्ता बदलानंतर भारतावर काही त्याचे परिणाम होऊ शकतात का? याची चिकित्सा करणे आवश्यक. आजपर्यंत आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताविरोधात सातत्याने गरळ ओकणे, चीनच्या नादी लागून पाकिस्तानला गहाण ठेवणे, पाकिस्थानची अर्थव्यवस्था सावरण्यासाठी अन्य देशांसमोर नेहमीच  हात पसरणे इतकेच इम्रान यांनी आजपर्यंत केले. क्रिकेटमध्ये जरी त्यांनी अष्टपैलू खेळाडू म्हणून लौकिक मिळवला हे ठीकच पण, राजकारणाच्या सामन्यात मात्र ते पंगू ठरले आहेत हे नक्की. त्यांच्या नेतृत्वाखालील सरकारची साडेतीन वर्षांची इनिंग संपुष्टात आली. खरे तर संसदेत आपल्या पक्षाने बहुमत गमावल्याची पूर्णत: खात्री असतानाही इम्रान हे उसने अवसान आणत अखेरच्या चेंडूपर्यंत खेळत राहिले. अखेर अविश्वास प्रस्तावाने त्यांची दांडी उडवली. अर्थात पाकमध्ये आजवर कोणत्याही पंतप्रधानाने पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केलेला नाही. लोकशाहीला बासनात ठेवणार्‍या व्यवस्थेचेच हे लक्षण मानावे लागेल.
पाकिस्तानातील इम्रान सरकार पडल्यामुळे भारतासोबतच्या संबंधांवर फारसा परिणाम होण्याची शक्यता अजिबात नाही. पाकिस्तानचे वरिष्ठ पत्रकार अर्शद युसूफझाई म्हणतात, ‘यामागील सर्वात मोठे कारण म्हणजे पाकिस्तानचे मोठे निर्णय अनेकदा लष्कर आणि गुप्तचर संस्था घेतात. भारतासोबतचे संबंध असोत, अफगाण धोरण असो, चीनशी संबंध असोत, हे सर्व अनेकदा एस्टाब्लिशमेंट्सकडून केले जाते. सरकारच्या येण्या-जाण्याचा फारसा परिणाम होत नाही.
परराष्ट्र धोरण तज्ज्ञ शैलेंद्र देवळाणकर यांच्या मते, ‘पाकिस्तानमधील सत्ताबदलाचा भारतावर परिणाम होणार नाही. याची दोन मोठी कारणे आहेत. प्रथम, भारताबाबत कोणतेही नवीन धोरण राबविण्यासाठी आघाडी सरकारला पुरेसा वेळ मिळणार नाही. दुसरे, तेथे खरी सत्ता पाकिस्तानी लष्कराच्या हाती आहे.” यावर पाकिस्थानच्या सत्ता बदलाचा भारतावर काहीही एक  परिणाम होणार नाही. आता एवढेच पाहणे की, सत्ता बदलानंतर नवे सरकार  नया पाकिस्तान बनवण्यासाठी काय करणार?

COMMENTS