Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

खाजगीकरणाच्या लाटेत ‘झेडपी’ शाळेसाठी माजी विद्यार्थ्यांची वज्रमूठ; केजमध्ये शिक्षणाची नवी पहाट

केज । प्रतिनिधीअन्न, वस्त्र, निवार्‍यासोबतच दर्जेदार शिक्षण ही काळाची गरज बनली आहे. मात्र खाजगी शाळांच्या वाढत्या फीमुळे सर्वसामान्य पालकांवर आर्थ

शिक्षणाला आध्यात्मिकतेची जोड देण्याची गरज : माजी आ. पिचड
शिक्षणाच्या विश्‍वासार्हतेवर घाला !
शैक्षणिक चळवळीचा वारसा जपण्यासाठी एकत्र येण्याची गरज : भोस 

केज । प्रतिनिधी
अन्न, वस्त्र, निवार्‍यासोबतच दर्जेदार शिक्षण ही काळाची गरज बनली आहे. मात्र खाजगी शाळांच्या वाढत्या फीमुळे सर्वसामान्य पालकांवर आर्थिक ओझे वाढत असताना, केज येथील जिल्हा परिषद माध्यमिक शाळेला पुन्हा वैभव मिळवून देण्यासाठी माजी विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला आहे. तब्बल 500 हून अधिक माजी विद्यार्थी एकत्र येऊन शाळेच्या पुनरुज्जीवनासाठी उभे राहिल्याने केज तालुक्यात शिक्षणाच्या नव्या पर्वाची सुरुवात झाली आहे.
1959 मध्ये स्थापन झालेली जिल्हा परिषद शाळा, केज ही केवळ शिक्षण संस्था नसून समाज घडवणारी एक संस्कारभूमी आहे. गेल्या 65 वर्षांत या शाळेने एक लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना घडवले आहे. आज या शाळेचे विद्यार्थी केंद्रीय मंत्री, खासदार, आयुक्त, डॉक्टर, अभियंते तसेच विविध क्षेत्रांत उच्च पदावर कार्यरत आहेत. मात्र अलीकडील काळात खाजगी शाळांचे वाढते वर्चस्व आणि प्रशासनाचे दुर्लक्ष यामुळे ही शाळा बंद पडण्याच्या मार्गावर होती. शाळेची दुरवस्था पाहून महाराष्ट्राच्या विविध भागांत असलेल्या माजी विद्यार्थ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली. सोशल मीडियाच्या माध्यमातून आवाहन करण्यात आले आणि प्रजासत्ताक दिनी तब्बल 500 माजी विद्यार्थी शाळेच्या प्रांगणात एकत्र आले. ध्वजारोहणानंतर हातात फलक घेऊन त्यांनी जनजागृती फेरी काढली. सरकारी शाळा वाचवा, दर्जेदार शिक्षण मिळवा या घोषणांनी संपूर्ण केज शहर दणाणून गेले. या आंदोलनाची दखल तहसीलदार श्री. राकेश गिड्डे यांनी घेतली. त्यांनी गटशिक्षण अधिकारी, केंद्रप्रमुख आणि माजी विद्यार्थी समितीच्या पदाधिकार्‍यांसोबत चर्चा करून शाळेची पाहणी केली. इमारत दुरुस्ती, सुरक्षा व्यवस्था आणि शिक्षक नियुक्तीचे तत्काळ आदेश देण्यात आले. विशेष म्हणजे तहसीलदार गिड्डे यांनी स्वतः आठवड्यातून एक तास विद्यार्थ्यांना शिकवण्याची तसेच 5 सायकली देण्याची वैयक्तिक मदत जाहीर केली. मदतीचा ओघ आणि नव्या प्रवेशांचा उत्साह या उपक्रमाला स्थानिक नागरिकांचा मोठा पाठिंबा मिळाला आहे. आर्थिक मदत: 4 वर्गखोल्यांची दुरुस्ती व 3 लाख रुपयांहून अधिक मदतनिधी जाहीर. साहित्य: क्रीडा व शैक्षणिक साहित्य पुरवण्याची माजी विद्यार्थ्यांची हमी. नवे प्रवेश: कार्यक्रमस्थळीच 11 पालकांनी आपल्या मुलांचे शाळेत प्रवेश निश्चित केले. कार्यक्रमादरम्यान गुरुजनांचा सत्कार करताना अनेक माजी विद्यार्थ्यांचे डोळे पाणावले. जवळपास सहा तास चाललेल्या या मेळाव्याने संपूर्ण बीड जिल्ह्यात सकारात्मक संदेश दिला आहे. मराठी शाळा बंद पडत असल्याच्या पार्श्वभूमीवर केजच्या माजी विद्यार्थ्यांनी उभारलेला हा लढा शिक्षण क्षेत्रात नवा आदर्श निर्माण करणारा ठरत आहे. आम्ही केवळ माजी विद्यार्थी म्हणून नाही, तर समाजाचे ऋण फेडण्यासाठी एकत्र आलो आहोत. ही शाळा पुन्हा जिल्ह्याची शान बनेल, हा आमचा संकल्प आहे.

COMMENTS