महाराष्ट्राला ज्या तीन महापुरुषांचा कृती आणि विचारांचा वारसा लाभला आहे, त्यातील पहिले महामानव म्हणून महात्मा ज्योतिराव फुले यांचा समावेश होतो. त्

महाराष्ट्राला ज्या तीन महापुरुषांचा कृती आणि विचारांचा वारसा लाभला आहे, त्यातील पहिले महामानव म्हणून महात्मा ज्योतिराव फुले यांचा समावेश होतो. त्यांची आज १९८ वी जयंती सारा भारत साजरा करत आहे. आणखी दोन वर्षांनी त्यांच्या जन्मशताब्दीला दोनशे वर्ष म्हणजे दोन शतक पूर्ण होतील. दोन शतक पूर्ण होण्याआधीच भारत सरकार, महात्मा ज्योतिराव फुले यांना भारतरत्न पुरस्कार बहाल करेल, याची आम्हाला शंभर टक्के अपेक्षा आणि खात्री आहे! महात्मा ज्योतिबा फुले यांनी समस्त भारतीय समाजाला आपल्या कृती आणि विचाराने जे बहाल केलं, त्यातूनच आज भारतीय समाज जगाच्या उन्नत अवस्थेबरोबर येऊन ठेपला आहे. स्त्री शिक्षण असो अथवा अस्पृश्यांच्या शाळा असो, याबाबत कोणत्याही गोष्टीमध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांनी तडजोड केली नाही. शिक्षणाचा ध्यास घेत, सावित्रीबाई फुले यांना देखील त्यांनी शिक्षित करून भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका केलं. महात्मा ज्योतिराव फुले यांनी अस्पृश्यांच्या शाळा उघडून, शिवाय त्यांच्यासाठी सर्व प्रकारच्या मदतीचे कार्य करून भारतामध्ये असं अतुलनीय आणि अजोड उदाहरण कृतीशीलपणे पेश केलं की, ज्यामुळे अस्पृश्य समाज हा शिक्षणामध्ये आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हणूनच महात्मा ज्योतिबा फुले यांना आपले गुरु मानले. कारण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर ब्रिटिशकालीन शाळांमध्ये जरी शिकले, तरी, त्यापूर्वी महात्मा ज्योतिबा फुले यांनी अस्पृश्यांसाठी शिक्षणाच्या परंपरेसाठी दालन खुले केलं होतं! महात्मा ज्योतिराव फुले यांनीच या देशाच्या शिक्षण व्यवस्थेला सार्वजनिक करावं, यासाठी हंटर कमिशनला निवेदन देऊन, ठामपणे शिक्षण सार्वजनिक करण्याची मागणी केली. आज भारताची शिक्षण व्यवस्था सार्वजनिक झाली. परंतु १९९१ नंतर पुन्हा भारताला खाजगीकरणाचे ग्रहण लागलं. त्यामुळे सार्वजनिक शाळा मोठ्या प्रमाणात बंद होताना दिसतात. आम्हाला अपेक्षा आहे की, नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांचे सरकार हे मागासवर्गीयांच्या शिक्षणासाठी शाळा- ज्या शासकीय क्षेत्रामध्ये आहेत, त्या बंद पडू देणार नाहीत. कारण, या सरकारने महात्मा ज्योतिबा फुले यांना भारतरत्न पुरस्कार देण्याची जी तयारी काही वर्षांपासून चालवली आहे, त्यामुळे आम्हाला हा विश्वास वाटतो. ‘नीती हाच मानवी जीवनाचा आधार आहे,’ हा विचार मांडणारे जोतीराव एक तत्त्वचिंतक व्यक्तिमत्त्व होते. महात्मा फुलेंनी सामाजिक प्रबोधन करण्यासाठी शेतकऱ्यांचा आसूड इ. ग्रंथ लिहून सामाजिक प्रबोधन केले. मूलभूत मानवी हक्कांच्या आधारावरून विश्वकुटुंब कसे निर्माण होईल व त्याकरिता कशा प्रकारचा वर्तनक्रम व वैचारिक भूमिका स्वीकारली पाहिजे, हे महात्मा जोतीराव फुलेंनी आपल्या ‘ सार्वजनिक सत्यधर्म ‘ संहितेत अनेक वचनांच्या आधारे मांडलले आहे. अखिल विश्वाला कवेत घेणाऱ्या माणसाला माणूस म्हणून प्रतिष्ठा देणारा धर्म साकार करायचा होता. त्यासाठी मानवी वर्तनात, म्हणजेच व्यवहारात काय आमूलाग्र बदल घडवून आणायला हवा, यासाठी मानवी स्वभाव आणि मानसिकता यात काय बदल केले पाहिजेत, याबाबतही ज्योतीरावांनी विपुल लेखन केले आहे. ‘अखंड’ या काव्यप्रकारात त्यांनी ‘मानवाचा धर्म’, आत्मपरीक्षण, नीती, समाधान, उद्योग, स्वच्छता, गृहकार्यदक्षता, आदी बाबींवर देखील ते शूद्रातिशूद्र समाजाला मार्गदर्शन करतात.
विद्येविना मती गेली ।
मतीविना नीती गेली ।
नीतीविना गती गेली ।
गतीविना वित्त गेले ।
वित्ताविना शूद्र खचले।
इतके अनर्थ एका अविद्येने केले ।।
महात्मा ज्योतिबा फुले यांनी लिहिलेले हे अखंड जगात अनन्यसाधारण आहे. कारण या छोट्याशा चार ओळींच्या अखंडात त्यांनी जगातील तमाम दबलेल्या मानवी समुदायाच्या कारणांचा जो शोध घेतला आहे, ते इथे स्पष्ट होते. एखाद्या महाकाय ग्रंथामध्ये जी गोष्ट समजावून सांगता येऊ शकत नाही किंवा समाविष्ट करता येऊ शकत नाही, ते महात्मा ज्योतिबा फुले यांनी आपल्या अखंडाच्या माध्यमातून समजावलं आहे की, जगातल्या तमाम दबलेल्या समाज बांधवांनो, तुम्ही, जे मागे राहिला आहात किंवा तुम्ही प्रगती पासून लांब राहिला आहात, त्याचं कारण एकमेव जे काही आहे, ते ‘विद्येविना मती गेली’, यातच आहे. त्यांच्या या ओळीत त्यांनी स्पष्ट केलं आहे. जगाच्या तमाम दबलेल्या समाज बांधवांना आपल्या मागासलेपणाचे कारण समजावून सांगणाऱ्या महात्मा ज्योतिबा फुले यांना त्यांच्या १९८ व्या जयंतीनिमित्त कोटी कोटी प्रणाम!
COMMENTS