Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वाहतूक कोंडीने नांदेडकर हैराण; मुख्य रस्त्यांवर रोजचाच त्रास, प्रशासनाकडे ठोस उपायांची अपेक्षा

नांदेड  । प्रतिनिधीनांदेड शहरातील वाढती वाहतूक कोंडी ही आता केवळ गैरसोय न राहता नांदेडकरांच्या दैनंदिन जीवनातील मोठी डोकेदुखी ठरत आहे. सकाळी कार्य

नांदेडमध्ये शेती व्यवहारातून दोन कोटींची फसवणूक; पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
Nanded : देगलूर मध्ये ज्ञान सरस्वती इंग्लिश स्कूलचे पूर्वतयारी व निर्जंतुकीकरण
धनशक्तीच्या दबावासमोरही शिवसेनेची लढत अखंड

नांदेड  । प्रतिनिधी
नांदेड शहरातील वाढती वाहतूक कोंडी ही आता केवळ गैरसोय न राहता नांदेडकरांच्या दैनंदिन जीवनातील मोठी डोकेदुखी ठरत आहे. सकाळी कार्यालयीन वेळेत, दुपारी शाळा-कॉलेज सुटल्यावर आणि सायंकाळी बाजारपेठेत गर्दी वाढली की शहरातील मुख्य रस्ते अक्षरशः ठप्प होतात. रस्त्यावर वाहनांची रांग, हॉर्नचा कर्कश आवाज, घाईत असलेले नागरिक आणि कुठेच दिसत नसलेले नियोजन – असे चित्र सध्या नांदेड शहरात सर्वत्र पाहायला मिळत आहे.
शहरातील अनेक मुख्य रस्त्यांची रुंदी अपुरी असल्यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न अधिक तीव्र झाला आहे. वाढती लोकसंख्या, वाहनांची संख्या आणि नियोजनाचा अभाव यामुळे जुन्या रस्त्यांवर सध्या प्रचंड ताण पडत आहे. श्रीनगर, आनंदनगर, गोकुळ नगर रस्ता, वजीराबाद, डॉक्टर लेन, तरोडा नाका, पूर्णा रोड, जुना मोंढा, आयटीआय कॉर्नर अशा भागांमध्ये दररोज मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होते. विशेषतः हे सर्व भाग ‘एज्युकेशनल हब’ म्हणून ओळखले जात असल्याने सकाळ-संध्याकाळी विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांच्या वाहनांची गर्दी वाढते. शहरातील अनेक शाळांच्या स्कूलबसदेखील वाहतूक कोंडीला कारणीभूत ठरत आहेत. अरुंद रस्त्यांवर एकाच वेळी अनेक स्कूलबस उभ्या राहिल्याने इतर वाहनांची हालचाल पूर्णपणे ठप्प होते. शाळांसमोर बस उभ्या करून विद्यार्थ्यांना चढ-उतार करण्याची कोणतीही ठरावीक व्यवस्था नसल्याने रस्त्यावर अराजकतेचे वातावरण निर्माण होते. पालकांची खासगी वाहने, रिक्षा आणि दुचाकी यांची भर पडल्याने परिस्थिती अधिकच बिकट बनते. वाहतुकीतील बेशिस्त हा आणखी एक गंभीर मुद्दा आहे. अनेक वाहनचालक वाहतूक नियमांचे सर्रास उल्लंघन करताना दिसतात. चुकीच्या बाजूने वाहन चालवणे, रस्त्याच्या मधोमध वाहन थांबवणे, अचानक वळणे घेणे यामुळे अपघातांचा धोका वाढतो आणि कोंडी अधिक तीव्र होते. अनेक महत्त्वाच्या चौकांवर अद्यापही ट्रॅफिक सिग्नल यंत्रणा कार्यान्वित नाही. सिग्नल नसल्यामुळे प्रत्येक जण ‘आपली वाट’ काढण्याच्या प्रयत्नात असतो आणि त्यामुळे वाहतुकीचा गोंधळ उडतो. फुटपाथवरील फेरीवाल्यांचे अतिक्रमण हाही वाहतूक कोंडीचा मोठा घटक ठरत आहे. पादचार्‍यांसाठी असलेले फुटपाथ फेरीवाल्यांनी व्यापल्यामुळे नागरिकांना रस्त्यावरून चालावे लागते. त्यामुळे वाहनांची गती मंदावते आणि वाहतूक कोंडी अधिक वाढते. विशेषतः बाजारपेठेच्या परिसरात हा प्रश्न गंभीर स्वरूपाचा आहे. शहरातील रिक्षाचालकांची बेशिस्तही वारंवार नागरिकांच्या संतापाचा विषय ठरत आहे. अनेक रिक्षाचालक रस्त्यावर कुठेही रिक्षा थांबवतात, प्रवासी भरताना किंवा उतरवताना वाहतुकीचा विचार करत नाहीत. याशिवाय अनेक कालबाह्य ऑटो रिक्षा अजूनही रस्त्यावर बिनधास्तपणे दिवस-रात्र धावताना दिसतात. या रिक्षांची तांत्रिक तपासणी झाली आहे की नाही, याकडे आरटीओचे दुर्लक्ष असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. धूर सोडणार्‍या आणि असुरक्षित रिक्षांमुळे पर्यावरणासोबतच वाहतुकीलाही अडथळा निर्माण होत आहे. वाहतूक कोंडीचा थेट परिणाम नागरिकांच्या वेळेवर, आरोग्यावर आणि कामाच्या उत्पादकतेवर होत आहे. रुग्णवाहिकांना मार्ग मिळण्यात अडचणी येतात, विद्यार्थी वेळेवर शाळेत पोहोचू शकत नाहीत, तर नोकरदारांना कार्यालयात उशीर होतो. वाढत्या अपघातांची भीतीही कायम असते. नांदेडकरांची अपेक्षा आहे की प्रशासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहावे. रस्ते रुंदीकरण, प्रभावी ट्रॅफिक सिग्नल व्यवस्था, स्कूलबस व रिक्षांसाठी स्वतंत्र नियोजन, फेरीवाल्यांचे नियमन आणि कालबाह्य वाहनांवर कठोर कारवाई केल्याशिवाय वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटणार नाही. अन्यथा ‘स्मार्ट सिटी’चे स्वप्न केवळ कागदावरच राहील आणि नांदेडकरांचा रोजचा प्रवास अधिकच त्रासदायक ठरेल.

COMMENTS