अहमदनगर/प्रतिनिधी :नगर अर्बन मल्टीस्टेट शेड्युल्ड बँकेतील गैरव्यवहार प्रकरणी मागील व विद्यमान संचालक मंडळातील काही सदस्य पोलिसी कारवाईच्या रडारवर असत
अहमदनगर/प्रतिनिधी :नगर अर्बन मल्टीस्टेट शेड्युल्ड बँकेतील गैरव्यवहार प्रकरणी मागील व विद्यमान संचालक मंडळातील काही सदस्य पोलिसी कारवाईच्या रडारवर असताना आता बँकेचे काही अधिकारीही संशयाच्या भोवर्यात सापडण्याची चिन्हे आहेत. अधिकार्यांच्या सांगण्यावरून बनावट व्हॅल्युएशन रिपोर्ट तयार केल्याचे स्पष्ट होण्याच्या मार्गावर असून, यामुळे बँकेचे अधिकारी आता पोलिस तपासाच्या रडारवर येण्याची चिन्हे आहेत. नगर अर्बन बँकेच्या 150 कोटींच्या फसवणूक प्रकरणात बनावट व्हॅल्युएशन रिपोर्ट तयार करून कर्ज घेतल्याचे उघडकीस आल्यानंतर बँकेच्या अधिकार्यांच्या सांगण्यावरूनच हे बनावट व्हॅल्युएशन रिपोर्ट तयार केल्याचे आरोपी सचिन गायकवाड याने पोलिस कोठडीतील चौकशीदरम्यान सांगितल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. गायकवाडकडून मिळालेल्या या माहितीची आर्थिक गुन्हे शाखेकडून खातरजमा केली जात आहे. मात्र, यामुळे बँकेचे अधिकारी अडचणीत येण्याची शक्यता दिसू लागली आहे.
बँकेच्या 28 संशयास्पद कर्जखात्यांसह बँकेच्या तत्कालीन अध्यक्षांच्या जवळचे असलेल्या सचिन गायकवाड व आशुतोष लांडगे यांनी मिळून बँकेची दीडशे कोटीची फसवणूक केल्याची फिर्याद नगर अर्बन बचाव कृती समितीचे प्रमुख राजेंद्र गांधी यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात दिली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अरूण आव्हाड करत आहेत. सुरुवातीला पोलिसांनी सचिन गायकवाड याला अटक केली. त्यानंतर कर्ज प्रकरणाचे गूढ बाहेर आले.बँकेकडे तारण ठेवलेल्या सुमारे पाच मालमत्तांचे मूल्यांकन जास्त दाखवले गेले होते. यासाठी आरोपी गायकवाडने व्हॅल्युअरच्या बनावट सह्यांसह खोटा रिपोर्ट सादर केला असल्याची बाब पोलिस तपासातून समोर आली आहे. हा बनावट व्हॅल्युएशन रिपोर्ट कोणी तयार केला याचा शोध पोलिसांकडून घेतला जात होता. मुकेश कोरडे याने हा व्हॅल्युएशन रिपोर्ट तयार केल्याची माहिती पोलिसांच्या तपासातून समोर आली. पोलिसांनी कोरडे याला अटक केली आहे. मात्र, चौकशीत त्याने अधिकार्यांच्या सांगण्यावरून बनावट रिपोर्ट तयार केल्याचे सांगितले आहे. त्यामुळे बँकेचे अधिकारी अडचणीत सापडण्याची चिन्हे आहेत. आरोपीने अधिकार्यांचे नाव घेतले असले, तरी या संदर्भात सर्व बाजूंनी खातरजमा केली जाईल. या प्रकरणात अधिकार्यांचीही चौकशी व जबाब होणार आहेत, असे तपासणी अधिकार्यांकडून सांगण्यात आले.
संचालकांचे जबाब सुरू
बँकेतील कर्ज प्रकरणे व घोटाळ्यांसंदर्भात आर्थिक गुन्हे शाखेने बँकेच्या संचालकांना चौकशीला बोलावले होते. त्यानुसार सोमवारपासून संचालकांनी चौकशीला हजेरी लावून माहिती सादर करण्यास सुरुवात केली आहे. आणखी काही दिवस ही चौकशी चालेल, असे आर्थिक गुन्हे शाखेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
बँकेसमोर आजपासून उपोषण
नगर अर्बन बँकेतील सेव्हींग व करंट रकमा मिळण्यासाठी कर्जत तालुक्यातील व्यापार्यांनी आज मंगळवारी 5 जुलैपासून नगरमधील बँकेच्या मुख्यालयासमोर उपोषणास बसण्याचा निर्णय घेतला आहे. या व्यापार्यांची सुमारे 10 कोटीची रक्कम या खात्यांत अडकून पडली आहे. रिझर्व्ह बँकेच्या निर्बंधांंमुळे या खात्यांतून त्यांना पैसे काढता येत नाहीत व व्यावसायिक व्यवहारही करता येत नाहीत. त्यामुळे कर्जतमधील महेश जेवरे यांच्यासह अतुल कोठारी, प्रफुल्ल नेवसे, अशोक सुपेकर, कल्याण काळे, रविकिरण नेवसे, प्रतापकुमार शहा, महादेव जगताप, भीमराव काळे, ताराबाई जगताप, देवदत्त जगताप, प्रसाद शहा आदींनी उपोषणाचा इशारा देणारे निवेदन मागील 21 जूनला दिले आहे व ते आजपासून उपोषण सुरू करणार आहेत.
COMMENTS