पाटण / प्रतिनिधी : महाराष्ट्रात पर्यटनाच्या बाबतीत मोठ्या प्रमाणात वैविध्य आहे. स्वित्झर्लंडमधील पर्यटकांचे महाराष्ट्रात नेहमीच स्वागत आहे, असे

पाटण / प्रतिनिधी : महाराष्ट्रात पर्यटनाच्या बाबतीत मोठ्या प्रमाणात वैविध्य आहे. स्वित्झर्लंडमधील पर्यटकांचे महाराष्ट्रात नेहमीच स्वागत आहे, असे सांगत महाराष्ट्र आणि स्वित्झर्लंड यांच्यात पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी परस्पर सहकार्याबाबत पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी आवाहन केले. बुधवारी स्वित्झर्लंडचे महावाणिज्यदूत (कॉन्सुल जनरल) मार्टिन मायर यांनी मुंबई येथे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई आणि विधानसभा अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर यांची भेट घेतली. त्यावेळी मंत्री शंभूराज देसाई यांनी भूमिका मांडली.
स्वित्झर्लंडचे महावाणिज्य दूत मार्टिन मायर यांनी बुधवारी विधानसभा अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर यांच्या कक्षात त्यांची व पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांची भेट घेतली. यावेळी दोन्ही देशांतील परस्पर सहकार्य वाढवण्याच्या दृष्टीने त्यांच्यात सकारात्मक चर्चा झाली.
यावेळी मंत्री शंभूराज देसाई म्हणाले, देशाच्या स्वातंत्र्यापासून आजवर भारत आणि स्वित्झर्लंड या दोन्ही देशांमध्ये नेहमीच मैत्रीपूर्ण संबंध राहिले आहेत. व्यापार, शिक्षण, तंत्रज्ञान या क्षेत्रात दोन्ही देशांचे एकमेकांना सहकार्य होत असते. त्याचबरोबर सांस्कृतिक व पर्यटन क्षेत्रातही दोन्ही देशांतील आदान-प्रदान वाढावे. महाराष्ट्रात पर्यटन विकासाला चालना देण्याच्या दृष्टीने असे परस्पर सहकार्य कायमच महत्त्वाचे राहील, असे सांगत मंत्री शंभूराज देसाई यांनी महावाणिज्य दूत मार्टिन मायर यांना पर्यटन विभागाकडून पर्यटन वाढीसाठी राबविण्यात येत असलेल्या योजना व उपक्रमांची माहिती दिली. तसेच एप्रिलमध्ये महाबळेश्वर येथे पर्यटन विभागाकडून आयोजित होणार्या महाराष्ट्र पर्यटन महोत्सवाचेही मंत्री शंभूराज देसाई यांनी मार्टिन मायर यांना याप्रसंगी आमंत्रण दिले.
COMMENTS