यासीन शेख/जामखेड : मुस्लिम समाजाची मते प्रत्येक निवडणुकीत निर्णायक ठरतात, मात्र या समाजातील उमेदवारांना निवडणुकीत संधी देण्यापासून डावलले जाते. क

यासीन शेख/जामखेड : मुस्लिम समाजाची मते प्रत्येक निवडणुकीत निर्णायक ठरतात, मात्र या समाजातील उमेदवारांना निवडणुकीत संधी देण्यापासून डावलले जाते. केवळ तोंडी लावण्यापुरते काही लोकांना राजकीय पक्षांकडून सांभाळले जाते, परिणामी या समाजाला लोकसभा आणि विधानसभेत प्रतिनिधित्व दिले जात नाही.
लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी मोर्चे बांधणी सुरू केली आहे. अनेकांना अनेक वेळा आमदार खासदार बनविण्यात तसेच अनेक पक्षांना सत्ता मिळवून देण्यात मुस्लिम समाजातील राजकीय नेत्यांनी कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे महत्वाची निर्णायक भूमिका बजावली आहे. राजकीय पक्षांनी मतदानासाठी मुस्लिमांचा वापर करून घेतला मात्र सत्तेमध्ये भागीदारी दिली नाही. भारतात यापूर्वी कधीही मुस्लिम समाजाने इतक्या मोठ्या प्रमाणावर मतदान केले नाही ते 2024 च्या लोकसभा निवडणुकीत केले. यावरून मुस्लिम मताची ताकद सत्ताधारी व विरोधक दोघांच्याही लक्षात आली आहे. मात्र राजकीय पक्षांची मुस्लिम समाजाबद्दल भूमिका नेहमी दुटप्पी राहिल्याचे दिसून येत आहे. लोकसभा निवडणूक 2024 मध्ये एकाही मुस्लिम उमेदवाराला अधिकृतरित्या पक्षाचे तिकीट दिली नाही. तरीही मुस्लिम समाजाचे कार्यकर्ते ज्या ज्या पक्षात आहेत त्या त्या पक्षाच्या उमेदवाराचे काम करून उमेदवारांना भरभरून मतदान दिले. महाराष्ट्र राज्यात विधानसभेच्या एकूण 288 जागापैकी किमान 40 मुस्लिम उमेदवार असणे अपेक्षित आहे.महाराष्ट्र राज्यातील एकूण जनसंख्येनुसार 15 टक्के मुस्लिम आमदारांनी विधानसभेत प्रवेश झाला पाहिजे. या मागणीसाठी राज्यभर एक चळवळ सुरू होणे गरजेचे आहे. मुस्लिम समाजातील राजकीय नेत्यांना विचारवंतांनी याबाबत राज्यभर दौरे आयोजित करणे गरजेचे आहे. मुस्लिम समाजाच्या आरक्षणाचे काय झाले हे सर्वांना माहीत आहे. मुस्लिम धर्मगुरू,विविध पक्षात काम करणारे सर्व पक्षाचे मुस्लिम पदाधिकारी, सामाजिक संघटनांना एकत्रित करून चिंतन बैठकीचा आयोजन करून पुढील दिशा ठरविण्याची गरज आहे. मुस्लिम समाजाचे सर्वच राजकीय पक्षांत सुशिक्षित, प्रमाणिक जागरूक, समाजभान असणारे हजारो पदाधिकारी व कार्यकर्ते आहेत.जनसंख्येनुसार राज्यात विधानसभेची उमेदवारी मुस्लिम समाजाला मिळाली पाहिजे. मुस्लिम समाज हा फक्त खजूर,इफ्तार पार्टी आणि सरबत पुरता मर्यादित राहिलेला नाही. याची जाणीव सर्वच राजकीय पक्षांना करून देणे गरजेचे आहे.
COMMENTS