मनपा करणार एका प्रभागात मीटरद्वारे पाणीपुरवठा ; यंदाचे अंदाजपत्रक 802 कोटींचे, नवी करवाढ नाही

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मनपा करणार एका प्रभागात मीटरद्वारे पाणीपुरवठा ; यंदाचे अंदाजपत्रक 802 कोटींचे, नवी करवाढ नाही

अहमदनगर/प्रतिनिधी : केंद्र सरकारच्या अमृत योजनेतून होत असलेल्या पाणीपुरवठा फेज-3 प्रकल्पाचे काम आता अंतिम टप्प्यात आल्याने यंदा नगर शहरातील प्रत्येक

अर्बन बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न करणार : वसंत लोढा
नगरमध्ये चार ठिकाणी दरोडे, लाखो रुपयांचा ऐवज लुटला
गुहात आमदार अबू आझमींना गावकर्‍यांचा विरोध

अहमदनगर/प्रतिनिधी : केंद्र सरकारच्या अमृत योजनेतून होत असलेल्या पाणीपुरवठा फेज-3 प्रकल्पाचे काम आता अंतिम टप्प्यात आल्याने यंदा नगर शहरातील प्रत्येक घराला मीटरद्वारे पाणीपुरवठा करण्याचा संकल्प मनपा प्रशासनाने यंदाच्या अंदाजपत्रकात व्यक्त केला आहे. अर्थात या योजनेच्या पहिल्या टप्प्यात प्रायोगिक तत्वावर एकाच प्रभागात 24 तास मीटरद्वारे पाणीपुरवठा नियोजन आहे. याशिवाय बदलत्या काळानुसार मनपा शाळांचे डिजीटायझेशन आणि ’सॅटेलाईट’द्वारे नगरकरांच्या मालमत्तांचे सर्व्हेक्षणही करण्याचे नियोजन आहे. दरम्यान, मनपा आयुक्त शंकर गोरे यांनी मनपाचे यंदाजे 802 कोटीचे अंदाजपत्रक स्थायी समितीचे सभापती कुमारसिंह वाकळे यांना सादर केले. कोणतीही नवी करवाढ प्रशासनाने यात सुचवलेली नाही. यावर आता स्थायी समिती येत्या सोमवारपासून (14 मार्च) चर्चा करणार असून, शिफारशींसह अंतिम मंजुरीसाठी महासभेला सादर करणार आहे.
महापालिका प्रशासनाने तयार केलेले सन 2022-23 चे 802 कोटी रुपयांचे मूळ अंदाजपत्रक आयुक्त गोरे यांनी स्थायी समितीचे सभापती वाकळे यांच्याकडे सादर केले. येत्या वर्षभरात शहरातील पाणीपुरवठा योजनेंतर्गत केंद्र सरकार पुरस्कृत अमृत-2 योजनेद्वारे मीटर पद्धत सुरू करणे, शहरातील मालमत्तांचे सॅटेलाइट व ड्रोनद्वारे सर्वेक्षण व पुनर्मूल्यांकन (रिव्हिजन) करणे, मनपाच्या 12 शाळा ’डिजिटल’ करणे, नव्याने मंजूर झालेला 2 मेगावॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प उभारणे व बुरूडगाव रस्त्यावर मनपाचे अद्ययावत रुग्णालय उभारणे आदी नवीन योजना प्रस्तावित करण्यात आल्या असून या योजना आगामी वर्षात मार्गी लावण्याचे आश्‍वासन आयुक्त गोरे यांनी सभेत दिले. स्थायी समितीची अंदाजपत्रकीय सभा शुक्रवारी झाली. आयुक्त गोरे यांनी सन 2021-22 चे सुधारित व सन 2022-23 चे मूळ अंदाजपत्रक सभेपुढे सादर केले. समिती सदस्यांनी अंदाजपत्रकाचा अभ्यास करण्यासाठी अवधी मागून घेतला त्यामुळे सभापती वाकळे यांनी ही सभा तहकूब केली व येत्या सोमवारी (दि. 14) ती आयोजित करण्यात आली आहे. त्यात चर्चा करून समिती अंदाजपत्रकाबाबत काही नव्या शिफारसी करेल, त्यानंतर हे अंदाजपत्रक अंतिम मंजुरीसाठी महासभेपुढे जाईल.

68 कोटींची वाढ
मनपाचे गेल्या वर्षीचे 2021-22 चे मूळ अंदाजपत्रक 733 कोटी होते. त्यानंतर ते 691 कोटीचे सुधारित करण्यात आले. यंदा या अंदाजपत्रकात 68 कोटींची वाढ होऊन ते 802 कोटींचे झाले आहे. शहरात यापूर्वी अमृत-1 पाणी योजना राबवण्यात आली. त्याद्वारे मुळा धरणातून उपसा वाढून तो विळद जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत आणण्यात आला. फेज-2 अंतर्गत शहरात नवीन जलवाहिन्या टाकण्यात आल्या. आता केंद्र पुरस्कृत अमृत पाणी-2 अंतर्गत शहरातील वितरण व्यवस्थेतील दोष दूर करून मीटरद्वारे पाणी देण्याचा व प्रायोगिक तत्वावर किमान एक प्रभाग पूर्णपणे मीटरद्वारे 24 तास पाणी देण्याचे काम केले जाणार आहे. त्याचा आराखडा तयार करण्याचे काम सुरू असून 15 एप्रिलपर्यंत तो केंद्र सरकारला सादर केला जाणार आहे. दरम्यान, मनपा कार्यालये ’डिजिटल’ करणे, मनपा उत्पन्न वाढीसाठी शहरातील मालमत्तांचे उपग्रहाद्वारे पुनर्मूल्यांकन केले जाणार आहे. अर्थात, यामुळे सर्वांच्या मालमत्ता करात वाढ होणार नसली तरी ज्या मालमत्तांना कर आकारणी झालेली नाही किंवा ज्या मालमत्तांमध्ये वाढीव बांधकामे झालेली आहेत, अशांचे सर्वेक्षण केले जाणार आहे. त्या मुळे या सर्व्हेक्षणाची निविदा येत्या आठवड्यात मनपाद्वारे प्रसिद्ध केली जाणार आहे.

मनपाकडे येणार असे पैसे
मनपा अंदाजपत्रकात महसूली उत्पन्न 373 कोटी 91 लाख, भांडवली जमा 372 कोटी 4 लाख गृहित धरण्यात आले आहे. संकलित करापोटी 51 कोटी 22 लाख, संकलित करावर आधारित करापोटी 67 कोटी 21 लाख, जीएसटीचे अनुदान 111 कोटी 67 लाख व इतर महसुली अनुदान 27 कोटी 65 लाख, पाणीपट्टी 26 कोटी 40 लाख, मीटरद्वारे पाणी पुरवठापोटी वसुली 42 कोटी, संकीर्णे 24 कोटी 80 लाख, गाळा भाडे 3 कोटी आदी प्रमुख बाबींचा समावेश मनपाला येणार्‍या पैशांच्या स्त्रोतात आहेत. तसेच भांडवली कामांवर अनुदान, कर्ज व मनपा हिस्सा धरुन 372 कोटी 4 लाख अंदाजित जमा होणार आहेत.

असे खर्च होणार मनपाचे पैसे
खर्च बाजूस वेतन, भत्ते व मानधनावर 126 कोटी 36 लाख, पेन्शन 42 कोटी 77 लाख, पाणी पुरवठा वीजबिल 33 कोटी, पथदिवे वीजबिल 3 कोटी, शिक्षण मंडळ वर्गणी 4 कोटी 30 लाख, महिला व बाल कल्याण योजना 1 कोटी 60 लाख, अपंग पुनर्वसन योजना 1 कोटी 60 लाख, मागासवर्गीय कल्याणकारी योजना 5 कोटी 25 लाख, सदस्यांच्या मानधनाचे 1 कोटी 50 लाख, औषधे व उपकरणे 1 कोटी, सदस्य प्रभाग स्वेच्छानिधी 7 कोटी 47 लाख, कचरा संकलन व वाहतूक 3 कोटी, पाणी पुरवठा साहित्य खरेदी व दुरुस्ती 60 लाख, टँकरद्वारे पाणी पुरवठा, तुरटी व ब्लिचिंग पावडर खरेदी 1 कोटी 70 लाख, अशुध्द पाणी आकार 2 कोटी, विविध वाहने खरेदी 2 कोटी 30, नवीन रस्ते 15 कोटी, रस्ते दुरुस्ती 12 कोटी, इमारत दुरुस्ती 50 लाख, शहरातील ओढे-नाले साफसफाई 45 लाख, आपत्कालीन व्यवस्थापन 40 लाख, कोंडवाड्यावरील खर्च 20 लाख, वृक्षारोपण तदनुषंगिक खर्च 85 लाख, हिवताप प्रतिबंधक योजना 40 लाख, कचरा डेपो सुधारणा व प्रकल्प उभारणी 41 लाख, मोकाट कुत्री व जनावरे बंदोबस्त 1 कोटी 35 लाख, आदी बाबींबर खर्च प्रस्तावित केला आहे. रस्त्यांसाठी 27 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

COMMENTS