मुंडे विरुद्ध मुंडे

Homeताज्या बातम्यासंपादकीय

मुंडे विरुद्ध मुंडे

ओबीसी समाजाचे देशाचे नेतृत्व करणारे दिवंगत गोपीनाथ मुंडे हे भाजपचे होते पण त्यांनी संघाची चड्डी कधीच घातली नाही. गोपीनाथ मुंडे यांच्या राजकारणाला एक

लोकसंख्यावाढ रोखण्याचे आव्हान
कर्नाटकातील जातीय समीकरण
संसदेची सुरक्षा आणि त्या तरूणांची मानसिकता

ओबीसी समाजाचे देशाचे नेतृत्व करणारे दिवंगत गोपीनाथ मुंडे हे भाजपचे होते पण त्यांनी संघाची चड्डी कधीच घातली नाही. गोपीनाथ मुंडे यांच्या राजकारणाला एक दिशा होती. समाजाचे मन जिंकलेले गोपीनाथ मुंडे जेव्हा जगण्याची लढाई हरले तेव्हा खऱ्या अर्थाने ओबीसी समाजाचे नेतृत्व त्यांच्या कन्या पंकजा मुंडे या करतील अशा आशा सर्वांच्याच पल्लवित झाल्या होत्या. मात्र, त्यांच्या घमंडी आणि एकलखोरी स्वभावामुळे अनेकजण त्यांच्यापासून चार हात दूर झाले. त्यापूर्वी धनंजय मुंडे हे राष्ट्रवादीचे आश्रयीत नेते म्हणून काम करत होते. पंकजा मुंडे यांच्या डोक्यातील हवा काढण्यासाठी अखेर परळीच्या ओबीसी समाजाने पंकजा मुंडेंना पराभूत केले आणि धनंजय मुंडे यांच्या कर्तृत्वाचे राजकारण सुरु झाले. पुढे धनंजय मुंडे यांच्यात काकाचे काही गुण दिसतील असे समाजबांधवांना वाटले मात्र हा बार सुद्धा फुसका निघाला आणि ओबीसी समाजाचे राष्ट्रीय स्तरावरील नेतृत्व पोरके झाले. याचे मुख्य कारण हे धनंजय आणि पंकजा यांच्या पोरकटपणातच आहे. त्यांचा हा पोरकटपणा जावई आल्यावर जाणार की, नातवंडे झाल्यावर जाणार हे मात्र येणाऱ्या काळातच दिसेल.
मागील काही दिवसापासून धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे या दोन बहीण भावामध्ये वर्चस्वासाठी कलगीतुरा सुरु आहे. पण या दोघांची झुंज लावून देणारे त्यांच्या त्यांच्या पक्षातील नेतृत्व असून ओबीसींचे नेतृत्व मवाळ करण्याचा हा डाव आहे, हे या दोघांच्याही लक्षात येत नाही.

काल परवा पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर बोचरी टीका केली होती. त्या धनंजय मुंडे यांना उद्देशून म्हणाल्या होत्या की, ”मी मी म्हणणारं नेतृत्व महाराष्ट्राला नको, तर जनता-जनता म्हणणारं नेतृत्व हवं.” यांच्या या वक्तव्यावर धनंजय मुंडे यांनीही चांगलेच उत्तर दिले. ”मतदार संघातील जनेतमुळेच मी आमदार, मंत्री झालो जनतेला मी कसा विसरणार मी कायम परळीकरांच्या ऋणात राहणार.” असे धनंजय मुंडे म्हणाले. या धनंजय मुंडेंच्या वक्तव्यातून दोन अर्थ निघतात. एक म्हणजे, धनंजय मुंडे यांना परळीच्या बाहेर राजकारण करायचे नाही. त्यांनी परळी मतदार संघापूर्ती मर्यादा लावून घेतली हेच यातून सिद्ध होत आहे. तर दुसरा त्याचा अर्थ, पंकजा पेक्षा जास्त मलाच जणू परळी मतदार संघाची जास्त काळजी आहे असे. यावरून परळी मतदार संघ नेत्या पंकजा व धनंजय मुंडे यांचा जीव की, प्राण अशीच स्थिती. त्यामुळे परळीकरांच्या उपकारावर ते सातत्याने बोलत राहतात. परळीच्या नागरीकांकडून मिळालेले प्रेम असो की, मताधिक्क्य याची सारखीच चर्चा असते. पंकजांच्या या गडावर आता धनंजय मुंडे यांनी चांगलाच ताबा घेतलेला आहे हे कुणालाही कबूलच करावे लागेल. त्यावरून दोघा भाऊ-बहिणीत सारखे द्वंद्व होत हे जगजाहीर. हे दोघेही एकमेकांवर टीका करण्याची कोणतीही संधी सोडत नाहीत.

पंकजा मुंडे एका कार्यक्रमात म्हणाल्या होत्या की, ”माझं जे काही आहे ते तुमच्या समोर आहे. मी राजकारणात आज जशी आहे ते तुमच्या समोर आहे. मी परळीत, बीडमध्ये जनतेची सेवा करते ती गोपीनाथ मुंडे यांच्याच कार्यालयात बसून, मला स्वत:साठी काही नको. माझ्या नावासमोर आमदार नसलं तरी मी माझा वसा टाकलेला नाही. सगळ्या जाती, धर्मांना सोबत घेऊन पुढे जाणाऱ्या नेतृत्वाची आज महाराष्ट्राला गरज आहे. मी मी म्हणणारं नेतृत्व महाराष्ट्राला नकोय, तर जनता-जनता नेतृत्व म्हणणारं हवं आहे” असे पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या. पण स्वतः पंकजा मुंडे सत्तेत असतांना जनता जनता म्हणत नव्हत्या तर मी- मीच म्हणत होत्या याची कदाचित त्यांना आठवण राहिली नसेलही पण आज त्या साध्या आमदार देखील नाहीत हेच त्याचे कारण. भविष्यातही पंकजा मुंडे यांना चांगले दिवस नाहीत हे खरे. एक राज्य स्तरावरील ओबीसी समाजाचे नेतृत्व करण्याची संधी पंकजा मुंडे गमावून बसल्या आहे. ती संधी आता त्यांना पुन्हा नाही.

आज धनंजय मुंडे एका कार्यक्रमात पंकजा मुंडे यांना उद्देशून म्हणाले की, “आम्ही तुमच्यासाठी (परळीकरांना उद्देशुन) जे काही करत आहोत ते आमचे कर्तव्य आहे. आम्ही वेगळे काही करत नाही आणि हे मी आयुष्यभर करत राहणार आहे. माझे सर्व सहकारीही करत राहणार. मला परळीकरांच्या ऋणातून कधीच उतरायचे नाही. मला कायम तुमची सेवा करायची आहे. एकदा तुम्ही मला आमदार म्हणून निवडून दिले. मतं दिली आणि मी एकदाच तुमची सेवा केली माझं काम संपले, असे नाही तर मला तुमच्या कायम ऋणात राहायचे आहे. लॉकडाऊनच्या काळात देखील गरिबांना घरपोहच अन्नधान्य दिले अशी आठवणही त्यांनी सांगितली.” यावरून या दोन्ही नेत्यांचे राजकारण हे आता फक्त परळी मतदार संघापुरते मर्यादित राहिले आहे हेच यावरून लक्षात येते.

दिवंगत गोपीनाथ मुंडे यांनी आपल्या करारी बाण्यातून राज्यातील प्रस्थापितांना घाम फोडला होता. गोपीनाथ मुंडे यांना काउंटर करण्यासाठी शरद पवार आणि इतरांनी मोठे प्रयत्न केले. त्यासाठी ओबीसींचे नेते सुद्धा निर्माण केले. पण त्या उभ्या केलेल्या ओबीसी नेत्यासोंबत गोपीनाथजींचे प्रेमाचे आणि जिव्हाळ्याचे नाते होते. त्यामुळे राज्यात गोपीनाथ मुंडे यांना कुणीही काउंटर करू शकले नाही. या नेत्याला संपवण्यासाठी भाजपच्या वरिष्ठानी देखील अनेक प्रयत्न केले मात्र त्याचा उपयोग झाला नाही. राज्यात गोपीनाथ मुंडे म्हणतील तीच पूर्व दिशा असायची. त्याच लोकनेत्यांच्या निधनानंतर पंकजा मुंडे यांना त्यांच्या ”मनातील मुख्यमंत्री” आणि घमंडी स्वभावामुळे देवेंद्र फडणवीस यांनी धडा शिकवला. आज ओबीसी समाजाला नेतृत्वाची गरज असतांना राज्यात ते नेतृत्व देणारा एकही ओबीसी नेता नाही. मुंडे ते नेतृत्व देऊ शकतात मात्र हे दोन्ही मुंडे अति शहाणे असल्यामुळे त्यांना सल्ला देणेही चुकीचेच. त्यामुळे मुंडे विरुद्ध मुंडे हिच यापुढची वाटचाल. त्यांच्या वाटचालीला शुभेच्छा..!

COMMENTS