मुंबई/प्रतिनिधी ः मुंबई महापालिकेची ही वास्तू आर्थिक केंद्र आणि शक्तीपीठ आहे. या वास्तूवर भगवाच असेल. त्याचा आवाजदेखील दिल्लीला ऐकावा लागतो. मुंब
मुंबई/प्रतिनिधी ः मुंबई महापालिकेची ही वास्तू आर्थिक केंद्र आणि शक्तीपीठ आहे. या वास्तूवर भगवाच असेल. त्याचा आवाजदेखील दिल्लीला ऐकावा लागतो. मुंबईची आज परिस्थिती काय आहे? मुंबई महापालिकेवर प्रशासक आल्यापासून मुंबईकरांचा विचार बाजूला पडला असून, केवळ कंत्राटदार आणि काही विशिष्ठ राजकारण्यांचे खिशे भरण्याचे उद्योग सुरू आहे, मात्र मुंबईला लुटू देणार नसल्याचा इशारा ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी शनिवारी दिला. मुंबई महापालिकेवर काढण्यात आलेल्या विराट मोर्चाला संबोधित करतांना ते बोलत होते. यावेळी ठाकरे गटाचे नेते उपस्थित होते.
यावेळी बोलतांना आदित्य ठाकरे म्हणाले की, मला वाटते आपला उत्साह पाहिल्यानंतर आपला जोश पाहिल्यानंतर, आक्रोश पाहिल्यानंतर मी एकच सांगेन, समजनेवाले को इशारा काफी आहे. आपल्याला जो जनसागर दिसतोय, भगवे वादळ दिसतेय, ही फक्त शिवसेनेचे, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची ताकद आहे. हे भगवे वादळ फक्त मुंबईतले आहे. महाराष्ट्रातले अजून आम्ही सुरु केलेले नाही. येताना हनुमानजींचे दर्शन घेऊन आलो. मनात एकच ओढ होती की, भूतपिछा निकट न आवे जब महावीर नाम सुनावे, तेच करायचे आहेत. आपल्या आजूबाजूला जी भूते आहेत त्यांना दूर सारायचे आहे. गेल्या 25 वर्षात आपण जी कामे केली आहेत ती करुन दाखवले आहे. पण एक वर्ष मुंबई महापालिकेत नगरसेवक, कमिट्या, चेअरमन नाहीत. दाराला कुलूप लावलेले आहेत. प्रशासक आहेत. तुमचा आवाज त्यांना ऐकू येते का? तुमची चिंता त्यांना आहे का? तुम्ही मुंबईकर आहात, असा सवाल आदित्य ठाकरे यांनी यावेळी केला.
मुंबईला लुटू नका. ही आमची मुंबई आहे. मुंबईकरांची महाराष्ट्राची मुंबई आहे. मुंबईमधील सगळे रस्ते काँक्रीट करणार असल्याचे म्हणत आहेत. चांगले आहे, खड्डेमुक्त रस्ते करा. तुम्ही ज्या रस्त्यावर बसले आहात ना त्याच्याखाली 42 युटीलिटी असते. पाण्याच्या पाईपलाईनपासून ते गॅसच्या पाईपलाईन असतात. सगळ्या विभागांशी बोलून नीट ठरवून रस्त्याचे काम करावे लागले. वाहतूक पोलिसांना विचारुन काम करावे लागते. 16 वेगवेगळ्या एजन्सी असतात. म्हाडा, रेल्वे, एमआरडीए यांच्या सगळ्यांशी बोलून काम करावे लागते. आपल्या मुख्यमंत्र्यांना त्याबाबत माहिती नसल्याचा टोला आदित्य ठाकरे यांनी यावेळी लगावला.
त्यादिवशी लुटारू जेलमध्ये दिसतील.. – मुंबई महापालिकेच्या 100 वर्षांच्या इतिहासात हे 50 रस्त्यांंचे कमीत कमी टार्गेट घेतले. पण एकही रस्ता ही महापालिका पूर्ण करु शकलेली नाही. महापालिकेत काय चालले आहे? तुम्ही मुंबईसाठी काम करत आहात की खोके सरकारसाठी काम करत आहात? मी आजही सांगून ठेवतो, ज्यादिवशी आमचे सरकार येईल, ती येणार म्हणजे येणार आहे, त्या दिवशी पहिले काम हेच असणार मुंबईच्या लुटारुंना जेलमध्ये टाकल्याशिवाय राहणार नाही. हा रस्त्यांचा घोटाळा भयानक असल्याची घणाघाती टीका आदित्य ठाकरे यांनी यावेळी केली.
COMMENTS