ऑटो आणि कारचा चेंदामेंंदा ; 4 जण झाले जखमीमुंबई ः मुंबईतील मुलुंड परिसरात शनिवारी लाल बहादूर शास्त्री मार्गावर सुरू असलेल्या मेट्रो मार्गिकेच्या क

ऑटो आणि कारचा चेंदामेंंदा ; 4 जण झाले जखमी
मुंबई ः मुंबईतील मुलुंड परिसरात शनिवारी लाल बहादूर शास्त्री मार्गावर सुरू असलेल्या मेट्रो मार्गिकेच्या कामादरम्यान पुलाचा सिमेंट स्लॅब अचानक कोसळून एका निष्पाप नागरिकाचा मृत्यू झाला, तर चार जण जखमी झाले. विकासाच्या नावाखाली सुरू असलेल्या प्रकल्पांमध्ये मानवी जीविताची किंमत किती स्वस्त झाली आहे, याचा हा वेदनादायी पुरावा आहे.
घटना शनिवारी दुपारी सुमारे बारा वाजून वीस मिनिटांच्या सुमारास घडली. ऐन वर्दळीच्या वेळी रस्त्याने जात असलेल्या एका रिक्षा आणि कारवर वरून सिमेंटचा जड तुकडा कोसळला. या अपघातात वाहनांचा चेंदामेंदा झाला. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात हलविण्यात आले; मात्र उपचारादरम्यान एका व्यक्तीचा मृत्यू झाला. मृत व्यक्तीची ओळख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. या दुर्घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त करत घटनास्थळी सुरक्षा उपाययोजनांचा अभाव असल्याचा आरोप केला. पुलाचे काम सुरू असताना आवश्यक अडथळे, संरक्षण जाळी किंवा पर्यायी वाहतूक व्यवस्था योग्यरीत्या उभारण्यात आली होती का, हा प्रश्न उपस्थित झाला आहे. मोठ्या आकाराचे गर्डर आणि स्लॅब उचलण्याचे काम सुरू असताना खाली वाहतूक सुरू ठेवणे कितपत सुरक्षित होते, याची चौकशी होणे आवश्यक आहे.
घटनेनंतर अग्निशमन दल, पोलिस यंत्रणा, मेट्रो प्राधिकरणाचे कर्मचारी आणि आपत्कालीन रुग्णवाहिका सेवा तातडीने घटनास्थळी दाखल झाले. वाहतूक वळविण्यात आली आणि रस्त्यावर पडलेला ढिगारा हटविण्यात आला. अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू करण्यात आला आहे. बांधकामात वापरलेली सामग्री, उचल यंत्रणा, देखरेख व्यवस्था आणि कामगारांच्या सुरक्षिततेचे नियम पाळले गेले होते का, याची छाननी केली जाणार आहे. मुंबई महानगरपालिका प्रशासनाने दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, लाल बहादूर शास्त्री मार्गावर एका औद्योगिक आस्थापनाजवळ मेट्रोच्या खांबाचा काही भाग कोसळून तो खाली उभ्या असलेल्या रिक्षावर पडला. जखमींना तातडीने वैद्यकीय मदत पुरविण्यात आली असून अधिकृत तपशील गोळा करण्याचे काम सुरू आहे. तथापि, प्राथमिक निवेदनापुरती जबाबदारी मर्यादित न ठेवता प्रत्यक्ष जबाबदारांवर कारवाई होणे तितकेच महत्त्वाचे आहे. मुंबईसारख्या महानगरात मेट्रो प्रकल्प हा केवळ वाहतुकीचा पर्याय नसून शहराच्या भविष्यासाठी अत्यावश्यक पायाभूत सुविधा मानली जाते. मात्र अशा प्रकल्पांची अंमलबजावणी करताना सुरक्षा निकषांवर तडजोड केली गेली, तर विकासाचा वेग नागरिकांसाठी घातक ठरू शकतो.

COMMENTS