Homeताज्या बातम्यादेश

मोदी 3.0 नव्या पर्वाला सुरूवात

नरेंद्र मोदी तिसर्‍यांदा पंतप्रधानपदी एनडीएचे जोरदार शक्तीप्रदर्शन

नवी दिल्ली ः राष्ट्रपती भवनाच्या बाहेर अतिशय शानदार समारंभात नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली

शिवसेना भवन, शाखा आणि पक्षनिधीसाठी याचिका
जम्मू-काश्मीरच्या बट्टालमध्ये चकमक
महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पांसाठी 15,940 कोटींची तरतूद

नवी दिल्ली ः राष्ट्रपती भवनाच्या बाहेर अतिशय शानदार समारंभात नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली. सलग तिसर्‍यांदा पंतप्रधानपदी विराजमान होणारे नरेंद्र मोदी पंडित नेहरूनंतर एकमेव पंतप्रधान आहेत. एनडीएकडून जोरदार शक्तीप्रदर्शन करत हा शपथविधी सोहळा पार पडला, यावेळी देश, विदेशातील अनेक प्रमुख उपस्थित होते. यावेळी झालेल्या शपथविधीप्रसंगी नरेंद्र मोदी यांच्यानंतर दुसर्‍या क्रमाकांवर राजनाथ सिंह, अमित शहा, नितीन गडकरी, जे.पी. नड्डा, शिवराजसिंह चौहान, निर्मला सीतारामण, डॉ. सुब्रमण्यम जयशंकर, मनोहरलाल खट्टर, एचडी. कुमारस्वामी, पियुष गोयल, धमेंद्र प्रधान, जीतन राम मांझी, राजीव रंजन सिंग उर्फ लल्लन सिंग, सर्वानंद सोनोवाल, डॉ. वीरेंद्रकुमार खटिक, राम मोहन रायडू,  प्रल्हाद व्यंकटेश जोशी, ज्वेलुराम, गिरीराज सिंह, आश्‍विनी वैष्णव, ज्योतिरादित्य सिंधिया, भुपेंद्र यादव, गजेंद्रसिंह शेखावत, अन्नपूर्णा देवी, किरेन रिजिजू, हरदीपसिंह पुरी, मनसुख मांडविया, गंगापुरम किशन रेड्डी, चिराग पासवान यांनी कॅबिनेट पदाची शपथ घेतली. तर, राज्यमंत्री पदाची शपथ सी.आर. पाटील, इंद्रजित सिंग, जितेंद्र सिंह, अर्जुनराम मेघवाल, प्रतापराव गणपतराव जाधव, जयंत चौधरी, जितीन प्रसाद, श्रीपाद नाईक, पंकज चौधरी, कृष्णपाल गुर्जर, रामदास आठवले, रामनाथ ठाकूर, नित्यानंद रॉय, अनुप्रिया पटेल, व्ही. सोमण्णा, चंद्रशेखर पेम्मासानी, प्रोफेसर एस.पी.सिंग बघेल, शोभा करंदलाजे, कीर्तीवर्धन सिंहांनी, व्ही.एल. वर्मा, शांतनू ठाकूर, सुरेश गोपी, डॉ. एल मृगन, यांच्यासह महाराष्ट्रातील रक्षा खडसे आणि मुरलीधर मोहोळ यांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली.

रविवारी झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारात उत्तरप्रदेशला झुकते माप देत सर्वाधिक 9 खासदारांना मंत्रिपदे देण्यात आली आहेत. त्यापाठोपाठ बिहारमधील 8 खासदारांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात येत आहे. यानंतर महाराष्ट्रातील 6 खासदारांना संभाव्य मंत्रिपदाची जबाबदारी मिळाली आहे. यामध्ये दोन खासदार हे तरुण खासदार आहेत. महाराष्ट्रानंतर गुजरातमधील 5 खासदारांना मंत्रिमंडळात स्थान दिले आहे. राष्ट्रपती भवनातील या सोहळ्याला 7 देशांच्या नेत्यांशिवाय देशातील सिनेतारकांनीही हजेरी लावली होती. यामध्ये अक्षय कुमार, शाहरुख खान, विक्रांत मेस्सी आणि राजकुमार हिरानी यांचा समावेश आहे. रिलायन्स समुहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी हे देखील यावेळी उपस्थित होते. शपथविधीपूर्वी मोदींनी रविवारी सकाळी राजघाटावर जाऊन महात्मा गांधींना आदरांजली वाहिली. यानंतर ते अटलजींच्या समाधी आणि राष्ट्रीय युद्ध स्मारकावर गेले. सकाळी मोदींनी त्यांच्या निवासस्थानी संभाव्य मंत्र्यांची बैठक घेतली.

महाराष्ट्रातील ’या’ खासदारांचा समावेश  
खा. नितीन गडकरी
खा. पियुष गोयल
खा. रामदास आठवले
खा. प्रतापराव जाधव
खा. रक्षा खडसे
खा. मुरळीधर मोहोळ

शिंदेंच्या शिवसेनेला केवळ एकच राज्यमंत्रीपद – शिंदे यांच्या शिवसेनेला एक मंत्रिपद मिळेल याचा अंदाज वर्तवण्यात येत होता, मात्र एका मंत्र्याची कॅबिनेटपदी वर्णी लागेल अशी शक्यता असतांना बुलडाण्याचे खासदार प्रतापराव जाधप यांना केवळ राज्यमंत्रीपद देण्यात आले आहे. तर राज्यमंत्रीपद नको, कॅबिनेट मंत्रीपद हवे म्हणून अजित पवार गटाने राज्यमंत्रीपद स्वीकारण्यास नकार दिल्यानंतर शिंदे गटाने राज्यमंत्रीपद स्वीकारल्याची चर्चा मंत्रिमंडळ विस्तारानंतर सुरू होती.

अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मंत्रिपद नाही – अजित पवारांचा राष्ट्रवादी काँगे्रस पक्ष एनडीएमध्ये सहभागी असला तरी, त्यांच्या खासदाराला मंत्रिपदाची संधी मिळालेली नाही. एक मंत्रिपद मिळावे यासाठी अजित पवार, सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल राजधानी दिल्लीत तळ ठोकून होते, तरीही राष्ट्रवादीला संधी मिळालेली नाही. राष्ट्रवादीला राज्यमंत्रीपद देण्याची तयारी मोदी सरकारने दर्शवली होती. मात्र कॅबिनेट राहिलेल्या प्रफुल्ल पटेल यांना राज्यमंत्री पद नको असा पवित्रा घेत अजित पवार गटाने राज्यमंत्रीपद स्वीकारण्यास नकार दिला आहे.

आठवले यांना पुन्हा संधी – राज्यसभेचे खासदार रामदास आठवले यांना नरेंद्र मोदींनी त्यांच्या मंत्रिमंडळात पुन्हा संधी दिली आहे. यावर बोलतांना आठवले म्हणाले की, माझा पक्ष रिपब्लिकन पक्ष आहे. या पक्षाने सतत 10 वर्षे मोदींना समर्थन दिले आहे. दलित जनतेला भाजपाबरोबर आणण्याचे काम माझ्या पक्षाने केले आहे. विधानसेच्या निमित्ताने महाराष्ट्रात महायुतीची सत्ता येण्यासाठी मी मोदींचे समर्थन केले आहे. मोदींच्या विकासाचे काम आम्ही जनतेसमोर आणले आहे. तसेच संविधान बदलणार हा अपप्रचारही आम्ही रोखला असल्याचे आठवले म्हणाले आहे.

निष्ठेचे फळ रक्षाला मिळाले ः खडसे – भाजपच्या तिसर्‍यांदा खासदार झालेल्या रक्षा खडसे यांची मोदी सरकारमध्ये मंत्रीपदी वर्णी लागल्यानंतर ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे काहीसे भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी बोलतांना एकनाथ खडसे म्हणाले की, भाजपवर ठेवलेल्या निष्ठेचे फळ रक्षाला मिळाले रक्षा खडसे केंद्रीय मंत्री होत असल्याचा मनस्वी आनंद आमच्या कुटुंबाला आणि गावकर्‍यांना आहे. मला वाटते की गेले अनेक वर्षे भाजपात काम करत असताना त्या कामाचे श्रेय आणि रक्षा खडसेंनी भाजपवर ठेवलेल्या निष्ठेचे फळ म्हणून रक्षा यांना मंत्रिपदाची संधी मिळाल्याचा आनंद खडसे यांनी व्यक्त केला.

COMMENTS