पंतप्रधान सनाए ताकाइचींकडून संसद बरखास्तटोकियो : जपानच्या राजकारणात महत्त्वपूर्ण घडामोड घडली असून पंतप्रधान सनाए ताकाइची यांनी संसदच्या खालच्या सभ

पंतप्रधान सनाए ताकाइचींकडून संसद बरखास्त
टोकियो : जपानच्या राजकारणात महत्त्वपूर्ण घडामोड घडली असून पंतप्रधान सनाए ताकाइची यांनी संसदच्या खालच्या सभागृहाचे (हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हज) विघटन केले. या निर्णयामुळे देशात 8 फेब्रुवारी रोजी मध्यावधी निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला आहे. अवघ्या तीन महिन्यांच्या कार्यकाळानंतर संसद बरखास्त करण्याचा हा धाडसी निर्णय घेण्यात आला असून, त्यामागे सत्ताधारी पक्षाची राजकीय पकड अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.
ऑक्टोबरमध्ये जपानच्या पहिल्या महिला पंतप्रधान म्हणून सत्तेवर आलेल्या ताकाइची यांना सध्या सुमारे 70 टक्के इतकी उल्लेखनीय लोकप्रियता लाभत आहे. ही सकारात्मक प्रतिमा निवडणुकीत भांडवलात रूपांतरित करून सत्ताधारी लिबरल डेमोक्रॅटिक पार्टीची (एलडीपी) स्थिती भक्कम करण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचे स्पष्ट दिसून येते. मागील काही वर्षांत पक्षाला राजकीय आणि प्रतिमेच्या पातळीवर मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला असून, त्यातून सावरण्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे. मात्र, संसद बरखास्त झाल्याने देशाच्या अर्थकारणाशी निगडित काही महत्त्वाच्या निर्णयांना विलंब लागला आहे. कमकुवत होत असलेल्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी तसेच वाढत्या महागाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी मांडण्यात आलेल्या अर्थसंकल्पावरील मतदान पुढे ढकलण्यात आले आहे. 465 सदस्यांचे खालचे सभागृह बरखास्त झाल्यानंतर 12 दिवसांची निवडणूक प्रचार मोहीम सुरू होणार असून, तिची अधिकृत सुरुवात मंगळवारपासून होईल. या निर्णयाबाबत प्रतिक्रिया देताना पंतप्रधान ताकाइची यांनी स्पष्ट केले की, मी माझ्या राजकीय भवितव्याचा निर्णय जनतेकडे सोपवत आहे. त्यांनी या निवडणुकीला पंतप्रधानपदावरील आपल्या विश्वासमताशी जोडले असून, जनतेने आपल्याला संधी द्यावी की नाही, हे मतपेटीतून स्पष्ट व्हावे, अशी भूमिका मांडली आहे. कठोर विचारसरणीच्या पुराणमतवादी नेत्या म्हणून ओळखल्या जाणार्या ताकाइची या आपल्या पूर्वसुरी शिगेरु इशिबा यांच्या तुलनेत वेगळा आणि अधिक आक्रमक राजकीय अजेंडा पुढे रेटू इच्छित आहेत. अधिक सरकारी खर्च, लष्करी क्षमता वाढवणे, कडक स्थलांतर धोरणे आणि राष्ट्रीय सुरक्षेला प्राधान्य देणे हे त्यांच्या धोरणांचे प्रमुख मुद्दे आहेत. जपानला मजबूत आणि समृद्ध राष्ट्र बनवण्याचे स्वप्न त्यांनी मांडले आहे. तरुण मतदारांमध्ये ताकाइची यांची लोकप्रियता वाढत असली, तरी एलडीपी अजूनही राजकीय निधी गैरव्यवहारांच्या आरोपांच्या सावटाखाली आहे. यामुळे पारंपरिक मतदारांचा एक वर्ग नव्याने उदयास येणार्या उजव्या विचारसरणीच्या विरोधी पक्षांकडे वळत असल्याचे चित्र दिसून येते.

COMMENTS