मुंबई ः महाविकास आघाडीतील महत्वाच्या नेत्यांमध्ये बुधवारी जागावाटपासंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला काँग्रेस नेते बाळासाहेब थोरा
मुंबई ः महाविकास आघाडीतील महत्वाच्या नेत्यांमध्ये बुधवारी जागावाटपासंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात, खासदार शरद पवार आणि ठाकरे गटाचे उद्धव ठाकरे यांच्यासह वंचित बहुजन आघाडीने नेते अॅड. प्रकाश आंबेडकर उपस्थित होते. बराच वेळ चर्चा झाल्यानंतर अॅड. आंबेडकर यांनी बैठक अर्ध्यावर सोडून बाहेर पडल्यामुळे वंचितची महाविकास आघाडीसोबत बोलणी फिस्कटल्याचे दिसून येत आहे.
अॅड.आंबेडकर बैठकीतून बाहेर पडले तेव्हा त्यांच्यासोबत राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड होते. आंबेडकर यांनी यावेळी पत्रकारांशी बोलण्याचा प्रयत्न केला. पण आव्हाड यांनी मध्येच त्यांना थांबवून दुसर्या बाजूला घेऊन गेले. त्यानंतर गाडीत बसतानाही आंबेडकर पत्रकारांशी बोलण्याच्या मनस्थितीत नव्हते. आजच्या बैठकीत काहीही ठरले नाही. पुढच्या बैठकीत सगळ्या गोष्टी ठरतील असे सांगण्यात आले आहे, अशी संक्षिप्त प्रतिक्रिया यावेळी त्यांनी दिली. यावेळी पत्रकारांनी त्यांना चर्चा सकारात्मक झाली का? असा प्रश्न केला असता त्यांनी माझ्या चेहर्यावर तुम्हाला काय दिसते? असा उलट प्रश्न केला. तेवढ्यात जितेंद्र आव्हाड यांनी स्वतःच सर्वकाही पॉझिटिव्ह सुरू असल्याचे सांगितले. महाविकास आघाडीची पुढील बैठक केव्हा होईल, हे लवकरच कळवण्यात येईल, असेही आव्हाड यांनी यावेळी सांगितले. या घटनाक्रमामुळे मविआची वंचित बहुजन आघाडीसोबतची संभाव्य आघाडी संकटात सापडल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे वातावरण तापले आहे. उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी सायंकाळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांची त्यांच्या ‘सिल्व्हर ओक’ निवासस्थानी भेट घेतली. त्यात महाविकास आघाडीच्या जागावाटपावर चर्चा झाली. त्यात वादाच्या बहुतांश जागांवर मतैक्य झाल्याची माहिती आहे. उद्धव ठाकरे यांच्यासोबत खासदार संजय राऊतही होते. त्यानंतर दुसर्याच दिवशी महाविकास आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक मुंबईत सुरू झाली आहे. मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलात ही बैठक सुरू आहे. त्यात जागावाटपाविषयी ठोस निर्णय होण्याची शक्यता आहे.
बामसेफचा मविआला पाठिंबा – बामसेफच्या वामन मेश्राम यांनी मविआला बिनशर्त पाठिंबा दिल्याची माहिती राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे. महाविकास आघाडीच्या आजच्या बैठकीला बामसेफचे वामन मेश्रामही हजर होते. त्यांनी महाविकास आघाडीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केल्याची माहिती जितेंद्र आव्हाड यांनी दिली. वामन मेश्राम सध्या यांनीही बैठकीतून काढता पाय घेतला आहे.
COMMENTS