बीड : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून त्यांची हत्या केल्यानंतरही या प्रकरणातील आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश मिळत नसल्याने मस्साज
बीड : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून त्यांची हत्या केल्यानंतरही या प्रकरणातील आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश मिळत नसल्याने मस्साजोग गावातील ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेत जलसमाधी आंदोलन बुधवारी सुरू केले होते. तब्बल दोन तास आंदोलन सुरू होते. गावकर्यांनी सामूहिक जलसमाधी घेण्याचा इशारा दिला होता. अखेर पोलिस अधीक्षक नवीन कॉवत यांनी आरोपींना 10 दिवसांत अटक करण्याचे आश्वासन दिल्यानंतर ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतले.
संतोष देशमुख यांच्या मारेकर्यांना तत्काळ अटक करावी आणि त्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी, या मागणीसाठी मस्साजोगच्या गावकर्यांनी सामूहिक जलसमाधी आंदोलन केले. या आंदोलनात महिला, ज्येष्ठ नागरिकांसह मुलेही सहभागी झाले होते. या आंदोलनात संतोष देशमुख यांचे फोटो हातात घेऊन महिला देखील पाण्यात उतरल्या. या आंदोलनावेळी काही महिला आंदोलकांची प्रकृती बिघडली. त्यांना तलावातून बाहेर काढण्यात आले. आंदोलनस्थळी बीडचे पोलिस अधीक्षक नवीन कॉवत हे दाखल झाले. पोलिसांनी आंदोलकांची समजूत काढत असताना ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला. यावेळी ग्रामस्थांनी पोलिसांकडे आरोपींना अटक करण्याची मागणी केली. सामान्य लोकांना ज्या गोष्टी माहीत आहेत, त्या पोलिसांना का माहीत नाहीत? असा सवाल ग्रामस्थांनी केला.
COMMENTS