Homeताज्या बातम्यासंपादकीय

मराठा-ओबीसींतील तणाव !

राज्यात विधानसभा निवडणुकीचा बिगुल कोणत्याही क्षणी वाजू शकतो, अशावेळी कोण सत्तेवर येईल याचे चित्र अजूनही स्पष्ट नाही. मात्र सामाजिक धुव्रीकरण कसे

आपचा राजकीय सूर !
अर्थव्यवस्थेच्या नाड्या आणि हिंडनबर्ग
ब्रिटनमधील सत्तांतराचा अन्वयार्थ

राज्यात विधानसभा निवडणुकीचा बिगुल कोणत्याही क्षणी वाजू शकतो, अशावेळी कोण सत्तेवर येईल याचे चित्र अजूनही स्पष्ट नाही. मात्र सामाजिक धुव्रीकरण कसे घडून येईल याचाच विचार राजकीय पक्षांकडून करण्यात येत आहे, त्याचेच प्रतिबिंब या मराठा-ओबीसी समाजातील तणावातून दिसून येत आहे. मराठा आरक्षणाचा लढा तीव्र करणारे मनोज जरांगे यांनी थेट भाजप आणि मुख्यतः म्हणजे देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करण्याचे प्रयत्न चालवले आहे. तर दुसरीकडे ओबीसी-मराठा या दोन्ही समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे.
राज्यात गेल्या काही वर्षांपासून मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा प्रश्‍न भिजत पडल्याचे दिसून येत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये असणारे ओबीसी आरक्षणाचा पेच सर्वोच्च न्यायालयात अडकला आहे, त्यामुळे राज्यातील महानगरपालिका, जिल्हा परिषदेतील निवडणुका गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. छत्रपती संभाजीनगरची महानगरपालिकेवर प्रशासकराज येवून चार वर्षांचा कालावधी लोटला असला तरी अजूनही महानगरपालिकेची निवडणूक झालेली नाही. ओबीसी आरक्षणाचा पेच निकाली निघाल्याशिवाय या निवडणुका होणे शक्य नाही. तर दुसरीकडे मराठा आरक्षणाचा लढा तीव्र होतांना दिसून येत आहे. कालच जालना जिल्ह्यातील वडीगोद्रीमध्ये मराठा आणि ओबीसी बांधव आमनेसामने आल्यामुळे मोठा तणाव निर्माण झाला होता. मुळातच गेल्या अनेक शतकांपासून ओबीसी आणि मराठा बांधव समन्वयाने गावात, खेड्यात शहरात राहत आला आहे. या बांधवांनी कधीही एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला नाही. गावा-गावांत कुरघोड्या करण्याचे प्रयत्न झाले नाही असे नाही, मात्र त्याचे तो प्रश्‍न सार्वजनिक झाला आहे.

मात्र आजमितीस गावा-गावांमध्ये ओबीसी आणि मराठा बांधवांत एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. ओबीसी बांधवांच्या दुकानातून काही वस्तू घ्यायचा नाही, असे काही छुपे फतवेच मराठा समाजातील गाव पातळीवर नेत्यांनी काढल्याचे काही दिवसांपूर्वी समोर आले होते. याप्रश्‍नी मंत्री छगन भुजबळ यांनी खासदार शरद पवारांची भेट देखील घेतली होती. त्यामुळे मुद्दामहून या दोन्ही समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होतांना दिसून येत आहे. त्यामुळे वडीग्रोदी आणि अंतरवाली सराटीत जो ओबीसी आणि मराठा समाजात तणाव निर्माण झाला, त्याकडे लक्ष देण्याची खरी गरज आहे. राज्यात एक नवा सांस्कृतिक संघर्ष तयार केला जात आहे. खरंतर मराठा हा समाज जसा बहुसंख्य आहे, तसाच ओबीसी समाज देखील बहुसंख्य आहे. मात्र ओबीसी समाज हा विविध जातीमध्ये विखुरला आहे, तर मराठा समाज एकत्र आहे. त्यामुळे या दोन्ही समुहांचा राजकारणात वरचष्मा आहे. त्यामुळे या दोन्ही समाजांना झुंजवत ठेवून आपली राजकीय पोळी भाजण्याचे प्रयत्न सध्या सुरू असल्याचे दिसून येत आहे. वास्तविक पाहता या दोन समाजांना झुंजवत ठेवल्यामुळे ग्रामीण भागात नवा संघर्ष उभा राहू शकतो आणि या संघर्षातून जी पोकळी तयार होणार आहे, ती कधीही भरून निघणार नाही. कारण ग्रामीण भागातील राजकारण वेगळे आहे. भाऊबंदकीचे वाद अनेक दशकांपासून सुरू आहेत, ते अजूनही मिटलेले नाहीत, त्यामुळे या संघर्षांतून काही वाद उद्भवल्यास त्या जखमा भरून येण्यास अनेक दशके लागतील यात शंका नाही. त्यामुळे या दोन्ही समाजातील तणाव निवळण्याची खरी गरज आहे. त्यासाठी राजकारण्यांनी पुढाकार घेण्याची खरी गरज आहे. मराठा समाजातील मनोज जरांगे यांना सत्ताधारी आपल्या मागण्या मान्य करत नसल्याची भावना आहे, तर दुसरीकडे सरकार केवळ मराठा समाजाच्या मागण्या मान्य करत आहे, ओबीसी समाजाकडे दुर्लक्ष करत असल्याची भावना आहे. त्यामुळे या दोन्ही समाजामध्ये तीव्र मतभेद निर्माण होतांना दिसून येत आहे. त्यामुळे या दोन्ही समाजांमध्ये समन्वयातून मार्ग काढण्याची गरज आहे, त्यासाठी राजकीय नेत्यांनी पुढाकार घेण्याची गरज आहे, मात्र राजकीय गरजेपोटी त्यांना यातून मार्ग काढायचा नसल्याचे दिसून येत आहे, या दोन्ही समाजात जेवढे वितुष्ट येईल तेवढा आपला फायदा होईल, असेच या राज्यकर्त्यांना वाटत असावे. 

COMMENTS