देशभरात मणिपूरमध्ये दोन महिलांची विवस्त्र धिंड काढल्यामुळे संताप व्यक्त करण्यात येत आहे. मात्र त्यापेक्षाही लाजिरवाणी बाब म्हणजे ही घटना 04 मे 2023 च
देशभरात मणिपूरमध्ये दोन महिलांची विवस्त्र धिंड काढल्यामुळे संताप व्यक्त करण्यात येत आहे. मात्र त्यापेक्षाही लाजिरवाणी बाब म्हणजे ही घटना 04 मे 2023 ची आहे. या महिलांवर सामूहिक बलात्कार करून, त्यांची विवस्त्र धिंड काढण्यात आली, त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर संपूर्ण देशभरात संतापाची लाट उसळली. एक जमाव दोन महिलांची धिंड काढतो, त्याचे चित्रण करतो, सामूहिक बलात्कार करतो, तरी त्यांच्याविरूद्ध कुणी बोलत नाही, ही लोकशाही नसल्याची चिन्हे आहेत. कायदा व सुव्यवस्था अस्तित्वात नसल्याची चिन्हे आहेत. ही वाटचाल हुकूमशाहीकडे सुरू असल्याची ही चिन्हे आहेत. कारण गुन्हेगाराला कायद्याचा धाक असला पाहिजे, मात्र हा धाक नाहीसा होतांना दिसून येत आहे. ज्या जमावाने या महिलांची, या भगिनींची धिंड काढली, त्यातील एकाही व्यक्तीमध्ये मानवी संवेदना जिंवत नव्हती का ? त्यांचे मानवी मन एवढे कठोर झाले होते का ? की त्या भगिनी विव्हळत असतांना, त्यांची धिंड काढतांना त्यांच्या मनाला काहीच कसे वाटले नाही ? त्या जमावाला आपली बहिण, आईची आठवण आली नसेल का ? या प्रसंगात त्या जमावातील एकाही व्यक्तीने ही नग्न धिंड काढण्यास मज्जाव का केला नाही? या सर्व प्रश्नांचे उत्तर शोधण्याची गरज आहे. तब्बल 80 दिवस उलटूनही आरोपींना अटक झाली नाही, मूळातच ही घटना समोर येवू दिली नाही. या संपूर्ण प्रकरणाचा शोध घेण्याची गरज आहे. तिथल्या जिल्ह्यातील पोलिस अधीक्षकाला बडतर्फ करण्याची करण्याची गरज आहे. कारण आपल्या जिल्ह्यात ही घटना घडली, त्याची खबरबात पोलिस अधीक्षकाला नसेल, असे नाही. मात्र कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी असणार्यांनी या प्रकरणाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. त्यामुळे ती झुंड, तो जमाव जितका दोषी आहे, तितकेच दोषी तिथले पोलिस अधीक्षक, कलेक्टर, लोकप्रतिनिधी आणि स्वतः मुख्यमंत्री या प्रकरणात दोषी आहे. जर हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला नसता, तर कदाचित या महिलांना अजूनही न्याय मिळाला नसता, ही घटना दाबली होती, मात्र त्या व्हिडिओमुळे या घटनेला वाचा फुटली. काय दोष असेल त्या महिलांचा, की त्या महिलांना इतकी गंभीर शिक्षा या जमावाने दिली. त्यांच्यावर सामूहिक बलात्कार करून त्यांच्या देहाची विटंबना केली, त्याचबरोबर त्यांच्या विवस्त्र देहाची धिंड काढली. किती ही विकृती, किती हा अमानवीयपणा. आणि त्याचबरोबर इतकी मोठी घटना घडूनदेखील त्याचा सुगावा इतरांना लागू शकत नाही, असे होवूच शकत नाही. मात्र सगळ्यांनी चुप्पी साधत या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे या प्रकरणात सगळेच दोषी ठरतात. असा प्रकार देशात होवू नये, यासाठी अशा गुन्हेगारांना जबर शिक्षा होण्याची गरज आहे. कारण या घटनेमुळे देशातील 143 कोटी जनतेची मान शरमेने खाली झुकली आहे. या घटनेची दखल सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी घेतली आहे. त्यांनी सरकारला फटकारतांना म्हटले आहे की, आरोपीला शिक्षा देणे तुम्हाला जमत नसेल तर, आम्ही शिक्षा देतो, त्यामुळे हा संताप आहे. देशातील प्रत्येक नागरिकांच्या तोंडून तो संताप व्यक्त होत आहे. इतकी कू्रर परिसीमा या आरोपींनी गाठलीच कसी ? कारण त्यांना कायद्याचा धाक नाही. आपण कायदा मोडला, बलात्कार केला, विवस्त्र धिंड काढली तरी, आपले कुणी वाकडे करू शकणार नाही, ही त्यांची मानसिकता मोडीत काढण्याची खरी गरज आहे. तरच अशा घटनांना चाप बसेल. पुरुषप्रधान संस्कृतीकडून नेहमीच महिलांना दुय्यम वागणूक देण्यात आलेली आहे. मात्र भारतीय संविधानाच्या माध्यमातून ही दुय्यम वागणूक मोडीत काढण्यात आलेली आहे. महिला आज सर्वच क्षेत्रात लिलयापणे वावरतांना दिसून येत आहे. आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर ती एक-एक क्षेत्र पादाक्रांत करतांना दिसून येत आहे. असे असतांना मणिपूर राज्यात दोन महिलांची विवस्त्र धिंड काढण्यात येते, यावरून आपला समाज कुठे चालला आहे ? असा प्रश्न पडतो. त्याचबरोबर या घटनेकडे बघतांना काही बाबींकडे लक्ष देण्याची गरज आहे. तब्बल अडीच महिन्यानंतर ही बाब उजेडात आली आहे. मणिपूर राज्याचे मुख्यमंत्री मुख्यमंत्री एन. बिरेन सिंह भाजपचे आहेत. त्यांना ही घटना होवून 80 दिवसांचा कालावधी उलटल्यानंतरही त्यांनी या प्रकरणाची दखल घेतली नाही, त्यामुळे त्यांचे हे अपयश असून, सर्वप्रथम त्यांचा राजीनामा घेण्याचे धारिष्टय पक्षाने दाखवण्याची गरज आहे. मुळातच मणिपूर राज्य जळतंय, तिथले अनेकजण टाहो फोडत आहेत, आमचे मणिपूर वाचवा, मीरा चानू, मेरी कोम सारखे खेळाडू ट्विट करताहेत, आवाहन करताहेत, मणिपूर वाचवा, मात्र सत्तेच्या नशेत धुंद असलेल्या सत्ताकर्त्यांना या राज्यांकडे लक्ष देणे गरजेचे वाटले नाही. हे राज्य या अपयशी राज्यकर्त्यांनी जळू दिले. खरंतर इतका मोठा हिंसाचार उसळला असतांना, केंद्र सरकारने तिथले सरकार बरखास्त करून, राष्ट्रपती राजवट लागू करण्याची गरज होती. कारण मुख्यमंत्री बिरेन सिंह तिथला हिंसाचार रोखण्यात अपयशी ठरले होते. तब्बल 150 पेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाल्यानंतर देखील केंद्र सरकारला जाग आली नाही, त्यामुळे हा हिंसाचार वाढतच गेला. या दोन महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एकही शब्द न काढता, आपल्या संवेदना काही केल्या प्रकट केल्या नाहीत. मात्र आज दोन महिलांची नग्न धिंड काढल्याचे समोर आल्यानंतर त्यांच्यावर टीकेची झोड उठवण्यात आल्यानंतर मात्र त्यांनी आपले मौन सोडले आणि आरोपींना सोडणार नसल्याचे ठणकावून सांगितले. मात्र हाच बाणा त्यांनी दोन महिन्यापूर्वी दाखवला असता, मणिपूरचा दौरा केला असता, आणि तिथल्या जनतेला आश्वस्त केले असते, तर या हिंसाचाराचा भडका उडालाच नसता. मात्र पंतप्रधानांनी मौन बाळगणे पसंद केले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देखील दौरा केला, मात्र त्यांचा दौरा अपयशी ठरला. आज केंद्राकडे इतके मोठे सैन्य आहे, सीआरपीएफचे जवान आहेत, त्यांना या राज्यात पाठवून, हा हिंसाचार मोडीत काढता आला असता, मात्र सरकारचे हे अपयश आहे. त्यामुळे सरकारने आतातरी मणिूपर वाचवण्याची गरज आहे. दोन महिलांची विवस्त्र धिंड काढणार्या एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. त्यातील इतर आरोपी देखील अटक होईल, मात्र त्या महिलांचे काय ? त्यांच्यावर अन्याय, अत्याचार होवून देखील त्या अडीच महिन्यांपासून कोलाहाल सोसत होत्या, त्यांचा या लोकशाहीवरील विश्वास उडाला असेल ? त्यांचा देशातील कायदा व सुव्यवस्थेवरील विश्वास उडाला असेल ? आपला कुणीच वाली नसल्याची त्यांच्यामध्ये भावना निर्माण झाली असेल ? तर याला जबाबदार कोण ? हीच व्यवस्था त्याला जबाबदार आहे. त्यामुळे राज्यकर्त्यांनी आतातरी या व्यवस्थेत कठोर आणि आमूलाग्र बदल करण्याची गरज आहे.
लेखक – बाळकुणाल सांडूजी अहिरे
मोबाईल नंबर ः 9850731777
COMMENTS