Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मणिपूर प्रकरणी मुक निषेध मोर्चा काढून व्यक्त केल्या संवेदना

अंबाजोगाई प्रतिनिधी - मणिपूर येथे होत असलेल्या अमानवीय अत्याचार, स्रियांच्या नग्न धिंडी, बलात्कार, खून, दंगली आणि राज्य व केंद्र सरकारची बघ्याची

शेतीच्या दिवसा वीजपुरवठ्यासाठी ग्रामपंचायतींनी अधिकाधिक गायरान जमीन द्यावी: महावितरण
मनोरुग्ण मुलाची पालकांना अमानुष मारहाण, आईचा मृत्यू, l पहा LokNews24
 महाविकास आघाडीत बिघाडीचे संकेत  

अंबाजोगाई प्रतिनिधी – मणिपूर येथे होत असलेल्या अमानवीय अत्याचार, स्रियांच्या नग्न धिंडी, बलात्कार, खून, दंगली आणि राज्य व केंद्र सरकारची बघ्याची भूमिका याचा निषेध म्हणून आंबाजोगाईत सामाजिक कार्यकर्त्यांच्या पुढाकारातून आम्ही अंबाजोगाईकरांच्या वतीने मुक निषेध मोर्चा आणि दोन दिवसीय धरणे आंदोलन उपजिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर करण्यात आले. यावेळी आंदोलनाचे निमंत्रक किसानपुत्र आंदोलनाचे प्रणेते अमर हबीब, मेडीकल असोसिएशनचे महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक सचिव डॉ.राजेश इंगोले, मसापचे दगडू लोमटे, माजी मुख्याध्यापिका प्रतिभा देशमुख, मानवलोकच्या प्रा.अरूंधती पाटील, अनिकेत लोहिया, आंतरभारतीचे वैजेनाथ शेंगुळे यांनी आंदोलनाची रूपरेषा ठरवून आंदोलन यशस्वी होण्यासाठी प्रयत्न केले.
यावेळी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकातून निषेध मार्च काढण्यात आला. बाळासाहेब ठाकरे चौक, सावरकर चौक, अब्दुल कलाम, छत्रपती शिवाजी महाराज चौक यामार्गाने अत्यंत शांतपणे, शिष्टबद्ध रीतीने हा मोर्चा उपजिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. यावेळी आंदोलनात सहभागी डॉ.सुरेश खुरसाळे, प्रा.अरूंधती पाटील, प्रतिभा देशमुख, प्रा.शैलजा बरूरे, अमृता काळदाते, दगडू लोमटे, प्रज्ञा सरवदे, डॉ.नरेंद्र काळे व डॉ.राजेश इंगोले यांनी आंदोलकांच्या वतीने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान, मानवी हक्क आयोग, महिला आयोग तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाला निषेध निवेदनाच्या प्रति देत निषेध नोंदविला. यावेळी बोलताना सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ.राजेश इंगोले यांनी देशात जे काही घडत आहे ते योग्य नाही, या देशाच्या संस्कृतीला साजेसं नाही त्यामुळे या अमानवीय घटना घडत असतांना सरकार शांत कसे राहू शकते, ज्यांच्या हातात सर्वसामान्य लोकांची सुरक्षितता आहे ते सरकारच जर मूक, अंध आणि बहिर्‍याचे सोंग घेऊन शांत बसत असेल तर ही दुर्दैवाची गोष्ट असल्याचे मत व्यक्त करत केंद्र सरकारने या प्रकरणी तात्काळ हस्तक्षेप करीत माणिपूरची परिस्थिती तात्काळ आटोक्यात आणली पाहिजे हे सरकार दरबारी सांगण्यासाठी आम्ही आलोत हे प्रशासनाला ठणकावून सांगितले. निवेदन दिल्यावर उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आली. यावेळी बोलताना योगेश्वरी शिक्षण संस्थेचे डॉ.सुरेश खुरसाळे यांनी जे माणिपूरला घडत आहे ते अत्यंत चुकीचे आहे, तिथले राज्य सरकार तात्काळ बरखास्त करून तिथे राष्ट्रपती राजवट लागू केली पाहिजे. तिथे त्वरित कायदा सुव्यवस्था प्रस्थापित करून सर्वसामान्य माणसाला सुरक्षित कसे वाटेल याकडे प्राधान्य दिले पाहिजे. केंद्र सरकारची भूमिका चुकीची आहे यात त्वरित त्यांनी हस्तक्षेप केला पाहिजे असे मत व्यक्त केले. प्रा.अरूंधती पाटील, प्रा.शैलजा बरूरे, माजी मुख्याध्यापिका प्रतिभा देशमुख, प्रज्ञा सरवदे, दगडू लोमटे यांनीही यावेळी तीव्र भावना व्यक्त करीत निषेध नोंदवला. यावेळी मानवलोकच्या एम.एस.डब्ल्यूच्या विद्यार्थ्यांनी ही उपस्थिती दर्शवित मणिपूर येथील घटनेचा निषेध व्यक्त केला. सलग दोन दिवस चाललेल्या या धरणे आंदोलनात विविध पक्षाचे नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी, डॉक्टर्स असोसिएशन, रोटरी क्लब, रोट्रॅक्ट क्लब, इनरव्हील क्लब, पत्रकार संघ, नागरिक यांनी उस्फूर्तपणे सहभाग घेत आपली संवेदनशीलता दाखवली. या आंदोलनात माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी, ज्येष्ठ समाजसेवक नंदकिशोर मुंदडा, डॉ.नरेंद्र काळे, महादेव आदमाने, डॉ.निशिकांत पाचेंगावकर, स्वप्नील परदेशी, संतोष मोहिते, ऍड.संतोष लोमटे, रवी देशमुख, सुनिल व्यवहारे, मुजीब काजी, सुरेखा सिरसाट, वंदना कात्रेला, चारूशीला देशमुख, किरण आसरडोहकर इत्यादी मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली. या धरणे आंदोलनाची सांगता सोमवार, दिनांक 24 जुलै 2023 ला संध्याकाळी पाच वाजता झाली. आंदोलनात सहभागी सर्वांचे आभार सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ डॉ.राजेश इंगोले यांनी मानून या धरणे आंदोलनाची सांगता केली.

COMMENTS