Homeताज्या बातम्यादेश

महाराष्ट्राला विदेशी पर्यटकांची पहिली पसंदी

देशातील एकूण विदेशी पर्यटकांपैकी जवळपास 18 टक्के वाटानवी दिल्ली : महाराष्ट्राच्या पर्यटन क्षेत्रासाठी दिलासादायक आणि उत्साहवर्धक अशी आकडेवारी समोर

सुवेंदू अधिकारी यांच्या भावावर मतदानाच्या दिवशी हल्ला
मोतीबिंदू मुक्त राज्याच्या स्वप्नपूर्तीसाठी सदैव प्रयत्नशील-मुख्यमंत्री फडणवीस
समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न झाला तर महाराष्ट्रात त्याला थारा मिळणार नाही

देशातील एकूण विदेशी पर्यटकांपैकी जवळपास 18 टक्के वाटा
नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या पर्यटन क्षेत्रासाठी दिलासादायक आणि उत्साहवर्धक अशी आकडेवारी समोर आली असून, गेल्या तीन वर्षांत राज्याला भेट देणार्‍या विदेशी पर्यटकांच्या संख्येत तब्बल दुप्पटीहून अधिक वाढ झाली आहे. 2022 मध्ये महाराष्ट्रात आलेल्या विदेशी पर्यटकांची संख्या 15.12 लाख इतकी होती. कोविडनंतरच्या काळात पर्यटन क्षेत्र सावरत असताना 2023 मध्ये ही संख्या लक्षणीयरीत्या वाढून 33.88 लाखांवर पोहोचली, तर 2024 मध्ये ती 37.05 लाखांपर्यंत गेली आहे.
या वाढत्या आकडेवारीमुळे महाराष्ट्र हे विदेशी पर्यटकांच्या दृष्टीने देशातील सर्वाधिक पसंतीचे राज्य ठरले आहे. 2024 मध्ये भारतात आलेल्या एकूण विदेशी पर्यटकांपैकी तब्बल 17.69 टक्के पर्यटकांनी महाराष्ट्राला भेट दिली. देशातील इतर राज्यांच्या तुलनेत हा वाटा सर्वाधिक आहे. महाराष्ट्रात पर्यटनाच्या विविध अंगांचा समतोल विकास झाला आहे. मुंबईसारखी आंतरराष्ट्रीय महानगरी, अजिंठा-वेरूळसारखी जागतिक वारसास्थळे, कोकण किनारपट्टी, सह्याद्री पर्वतरांगांतील निसर्ग पर्यटन, तसेच धार्मिक व आध्यात्मिक पर्यटनस्थळे यामुळे राज्याचा पर्यटन नकाशा समृद्ध झाला आहे. याशिवाय, उत्तम दळणवळण व्यवस्था, आंतरराष्ट्रीय विमानतळांची संख्या, दर्जेदार हॉटेल्स आणि सेवा सुविधा यांचाही मोठा फायदा राज्याला झाला आहे.
भारताचा एक परिपूर्ण पर्यटनस्थळ म्हणून जागतिक बाजारपेठेत प्रचार करण्यासाठी केंद्र सरकारकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. पर्यटन मंत्रालयाकडून विविध आंतरराष्ट्रीय पर्यटन व्यापार प्रदर्शनांमध्ये भारताचा सहभाग सुनिश्‍चित केला जातो. परदेशातील पर्यटन मेळावे, रोड-शो, तसेच भारतीय खाद्य महोत्सवांच्या माध्यमातून भारताची सांस्कृतिक ओळख अधिक ठळकपणे मांडली जात आहे. परदेशी पर्यटन नियोजक, आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी आणि सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर्ससाठी ‘एफएएम टूर’ आयोजित करून भारतातील विविध पर्यटनस्थळांचा प्रत्यक्ष अनुभव दिला जातो. यामुळे भारताबाबत सकारात्मक प्रतिमा तयार होण्यास मोठी मदत होत आहे. या प्रचार मोहिमेत भारतीय दूतावास, पर्यटन उद्योग, महाराष्ट्र सरकारसह अन्य राज्य सरकारे आणि केंद्रशासित प्रदेश प्रशासन सक्रियपणे सहभागी आहेत. पर्यटन विकासासाठी केवळ प्रसिद्धी नव्हे, तर भक्कम पायाभूत सुविधाही तितक्याच महत्त्वाच्या असल्याचे केंद्र सरकारचे धोरण आहे. त्यानुसार पर्यटन मंत्रालयाकडून ‘स्वदेश दर्शन’ आणि ‘स्वदेश दर्शन 2.0’ या योजनांच्या माध्यमातून पर्यटन सर्किट्सचा विकास केला जात आहे. त्याचबरोबर आव्हानाधारित स्थळ विकासासाठी ‘सीबीडीडी’ स्पर्धा राबवण्यात येत आहे. राज्यांना भांडवली गुंतवणुकीसाठी विशेष सहाय्य (एसएएससीआय) तसेच ‘प्रसाद’ योजनेअंतर्गत धार्मिक आणि आध्यात्मिक पर्यटनस्थळांचा विकास करण्यासाठी आर्थिक मदत दिली जात आहे. या योजनांमुळे पर्यटनस्थळांवरील सुविधा सुधारत असून पर्यटकांचा अनुभव अधिक समृद्ध होत आहे.

राज्य-केंद्र समन्वयावर भर
देशातील पर्यटन क्षेत्राचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी पर्यटन मंत्रालयाकडून महाराष्ट्रासह सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या पर्यटन विभागांसोबत नियमित सल्लामसलत बैठकांचे आयोजन केले जात आहे. या बैठकींमधून धोरणात्मक मुद्दे, स्थानिक गरजा आणि भविष्यातील संधी यांवर सविस्तर चर्चा केली जाते. केंद्रीय पर्यटन व संस्कृती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी 5 फेब्रुवारी 2026 रोजी राज्यसभेत दिलेल्या लेखी उत्तरात ही माहिती दिली. महाराष्ट्रातील पर्यटन क्षेत्राचा वेग पाहता, आगामी काळात राज्याचा विदेशी पर्यटकांमधील वाटा आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

COMMENTS