इचलकरंजी / प्रतिनिधी : वीजतज्ज्ञ म्हणून राज्यभर ख्याती असणारे तसेच मनोरंजन मंडळाचे संस्थापक, महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष प्रताप गणपत
इचलकरंजी / प्रतिनिधी : वीजतज्ज्ञ म्हणून राज्यभर ख्याती असणारे तसेच मनोरंजन मंडळाचे संस्थापक, महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष प्रताप गणपतराव होगडे (वय 74) यांचे सोमवारी (दि. 18) सकाळी हृदय विकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. ते समाजवादी पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशचे विद्यमान कार्याध्यक्ष होते. त्यांच्या निधनामुळे वीज क्षेत्रामध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या निधनाने पुरोगामी चळवळीची अपरिमित हानी झाली आहे.
प्रताप होगाडे हे जनता दलाच्या माध्यमातून प्रदीर्घकाळ राजकारणात कार्यरत होते. वीज ग्राहक संघटनेच्या माध्यमातून त्यांनी सातत्याने वीज प्रश्नासंदर्भात वाचा फोडली. सन 1974 साली लोकनायक जयप्रकाश नारायण यांच्या लोक संघर्ष समितीमध्ये ते सक्रिय होते. सन 1975 ते 76 या काळात आणीबाणी विरोधी सत्याग्रहात त्यांना 16 महिन्यांचा तुरुंगवास भोगावा लागला होता.
होगाडे यांचे डीएमई, बीई मेकॅनिकलमध्ये शिक्षण झाले होते. त्यांनी राज्य जनता दलाचे सरचिटणीस, प्रधान महासचिव, प्रदेश उपाध्यक्ष आदी पदाची जबाबदारी पार पाडली आहे. इचलकरंजी शहरात शिवसेना स्थापन करण्यात त्यांचा मोठा पुढाकार होता आणि ते इचलकरंजी शहराचे पहिले अध्यक्ष होते. सन 1985 मध्ये ते इचलकरंजी नगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले होते. यंत्रमाग विजेच्या प्रश्नाला त्यांनी सातत्याने वाचा फोडली. सन 2000 मध्ये निर्माण झालेला एन्रॉन वीज प्रकल्प, वीज नियामक आयोग, वीजदर याबाबत त्यांनी महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेच्या माध्यमातून आवाज उठवत अनेकवेळा आंदोलनेही केली.
पारिजात को-ऑप. हौसिंग सोसायटी, आनंद सहकारी गृह संस्था, कोल्हापूर जिल्हा सहकारी वसुदेव महासंघ, इचलकरंजी को-ऑप. टेस्ट लिमिटेड आदींचे ते संस्थापक चेअरमन होते. इचलकरंजी शहराच्या पाणी प्रश्नावर त्यांनी लढा सुरु केला होता. इचलकरंजी सुळकूड पाणी योजना कृती समितीचे ते समन्वयक होते.
त्यांच्या पश्चात पत्नी आणि मिथिला आणि जेनिस मुली आहेत.
COMMENTS