Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महाराष्ट्र भूषण राम सुतार !

बारा बलुतेदार समाज हा तसा निर्मिती करणारा समाज. प्राचीन इतिहासात देखील या समुहाचे अस्तित्व प्रभावी राहिले.‌परंतु काळ बदलत गेला आणि आज आधुनिक काळा

ओबीसींच्या राजकीय शक्तीला भुजबळांचा शह ?
ट्रक ड्रायव्हर रस्त्यावर! 
ब्राझीलचा सत्ता संघर्ष ! 

बारा बलुतेदार समाज हा तसा निर्मिती करणारा समाज. प्राचीन इतिहासात देखील या समुहाचे अस्तित्व प्रभावी राहिले.‌परंतु काळ बदलत गेला आणि आज आधुनिक काळात हा समाज बदहाल झाला! मात्र, अशा अवस्थेत असूनही या समाजातील अनेक व्यक्तिमत्व राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय पातळीवर ख्यातकीर्त झाली. त्यातील एक नाव अभिमानाने घ्यावं, ते म्हणजे आंतरराष्ट्रीय किर्तीचे शिल्पकार राम सुतार. 

    राम सुतार यांनी वयाची शंभरी पूर्ण केली. गेल्या महिन्यात १९ तारखेला त्यांच्या वयाला शंभर वर्षे पूर्ण होऊन १०१ व्या वर्षात पदार्पण करूनही ते केवळ चालते फिरते आहेत, असे नाही; तर, याही वयात रायगडावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारण्याची त्यांची इच्छा आहे. महाराष्ट्र शासनाने त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर केला. अर्थात, राम सुतार यांना यापूर्वीच पद्मश्री, पद्म भूषण त्यांना देण्यात आले आहेत. आता महाराष्ट्र शासनाने त्यांची विशेष दखल घेतली आहे. त्यांचा जन्म इ.स. १९२५ मध्ये धुळे जिल्ह्यातील गोंदूर येथे झाला. राम सुतार यांनी २०० हून अधिक शिल्पे बनवली आहेत. जगातील पाच खंडांत त्यांनी बनवलेली शिल्प विराजमान आहेत. दिल्ली येथे संसद भवनाच्या प्रांगणात सुध्दा राम सुतार यांनी बनवलेली शिल्पे आहेत. सर जे.जे.स्कूल ऑफ आर्ट मध्ये सन १९५२ प्रवेश घेऊन १९५३ साली शिल्पकलेत प्रथम वर्गात त्यांनी पदविका मिळविली. त्यांच्या शिल्पकार म्हणून कारकिर्दीला खरा प्रारंभ झाला १९६० मध्ये.  चंबळ नदीच्या सीमेंट-कॉन्क्रीटच्या प्रतिकात्मक शिल्पाकृती बनवून त्यांनी आपल्या शिल्पकलेची सुरूवात केली. हे शिल्प चंबळ नदीवरील गांधीसागर धरणाच्या ठिकाणी आजही दिमाखात उभे आहे. त्यांच्या पंचाहत्तर वर्षाच्या शिल्प घडविण्याच्या कारकिर्दीत त्यांनी व्यक्तिशिल्पे, म्युरल्स, एखाद्या संकल्पनेला धरून शिल्प, असे अनेक शिल्पकलेचे प्रकार हाताळले आहेत. दिल्लीत त्यांनी जी व्यक्तीशिल्प बनवली त्यांची संख्या सुमारे पन्नास आहे. त्यांनी बनविलेल्या शिल्पाकृती संसद भवन, राष्ट्रपती भवन आणि विविध राज्ये, आणि देशविदेशात आहेत.  त्यांनी गुणवत्तेशी कधीही तडजोड केली नाही.  विचारमग्न अवस्थेत असलेले महात्मा गांधी यांचा राम सुतार यांनी बनवलेला पुतळा आजही संसद भवन परिसरात लक्ष वेधून घेतो. सरदार  वल्लभभाई पटेल ह्यांचे सरदार सरोवर येथे उभारले गेलेले ” स्टॅच्यू ऑफ युनिटी ”  हे उत्तुंग शिल्प ही त्यांच्या सर्वात मोठी आणि ऐतिहासिक निर्मिती आहे. या निर्मितीत त्यांना चीनच्या शिल्पकारांचीही मोठी मदत झाली. चीनमध्ये उभारण्यात आलेल्या बुध्द मूर्ती अतिभव्य आहेत. तेच तंत्र वापरून त्यांनी ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ हा पुतळा उभारला. राम सुतार यांनी बनवलेल्या पुतळ्यांचा संक्षिप्त उल्लेख करताना आपल्याला, पुढील पुतळ्यांचा उल्लेख जरूर केला पाहिजे; ज्यात दिल्ली येथील संसद भवनाच्या आवारातील मौलाना आझाद  (१८ फूट), इंदिरा गांधी (१७ फूट), राजीव गांधी (१२ फूट), गोविंदवल्लभ पंत (१० फूट) आणि जगजीवनराम (९ फूट) या पुतळ्यांचा उल्लेख केला पाहिजे. महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचेही अनेक पुतळे त्यांनी घडविलेले आहेत. रवीन्द्रनाथ टागोर यांचा टोकिओतील पुतळा राम सुतार यांनी बनवला आहे. तसेच गांधीजींचे त्यांच्या स्टुडिओत बनवलेले गेलेले अनेक अर्धपुतळे भारत सरकारने परदेशांना भेट म्हणून दिलेले आहेत. अशा प्रतिभावान शिल्पकार असलेल्या राम सुतार यांना मिळत असलेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कारानिमित्त आम्ही त्यांचे विशेष अभिनंदन करतो.

COMMENTS