शिर्डीत हरवली…पण पोलिसांमुळे सुख़रूप घरी पोहोचली…

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शिर्डीत हरवली…पण पोलिसांमुळे सुख़रूप घरी पोहोचली…

अहमदनगर/प्रतिनिधी ः शिर्डीच्या साईसमाधी दर्शनासाठी ती कुटुंबियांसह आली होती. पण मंदिर परिसरात फिरताना कुटुंबाची व तिची हुकाचूक झाली…तिची दाक्षिणात्य

पारनेर तालुका शिक्षण क्षेत्रात अग्रेसर ठरेल. – ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ
दुर्लक्षित घटकांचा सन्मान करण्यात वेगळाच आनंद ः माजी खा. तनपुरे
श्री स्वामी समर्थ महाराज चरित्र | Shri Swami Samarth Maharaj | LokNews24 |

अहमदनगर/प्रतिनिधी ः शिर्डीच्या साईसमाधी दर्शनासाठी ती कुटुंबियांसह आली होती. पण मंदिर परिसरात फिरताना कुटुंबाची व तिची हुकाचूक झाली…तिची दाक्षिणात्य भाषाही कोणाला कळेना..मदत करायची कशी हाही प्रश्‍न..पण तो तिनेच सोडवला…शिर्डीतून चालत चालत चक्क सुमारे 90 किलोमीटर अंतरावर असलेल्या नगर-पुणे रस्त्यावरील कामरगावला (ता. नगर) ती आली व तेथील संवेदनशील मंडळींनी नगर तालुका पोलिसांच्या मदतीने तिला तेलंगणातील तिच्या घरी सुखरूप पोहोचवले…तब्बल चार महिन्यांनी घरच्यांची अखेर भेट झाली आणि तिच्या डोळ्यांत पाणी तरळले…त्यानंतर मागे वळत तिला घरी पोहोचवणार्‍यांकडे पाहून तिने हात जोडून कृतज्ञता व्यक्त केली.
याबाबतची माहिती अशी की, तेलंगणातील एक महिला शिर्डी येथील साईबाबा समाधीच्या दर्शनासाठी आल्या होत्या. परिवाराची आणि त्यांची हुकाचूक झाली त्या नगर-पुणे महामार्गाने तेलंगणा राज्यातील आपले गाव शोधत होत्या. परंतु त्यांना त्यांचे गाव सापडत नव्हते. अखेर या असाह्य व निराधार महिलेला चार महिन्यानंतर घरी सुखरूप पोहोचविले गेले. नगर तालुका पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांच्यासह कामरगावचे तुकाराम कातोरे व अरणगाव येथील मानवसेवा केंद्राचे संचालक दिलीप गुंजाळ यांनी ही कौतुकास्पद कामगिरी केली.
संबंधित महिला चार महिन्यापूर्वी शिर्डी येथे साईबाबाचे दर्शन घेण्यासाठी आपल्या परिवारासोबत आल्या होत्या. या महिलेची हुकाचूक झाल्यावर तिच्या घरच्यांनी सगळीकडे शोधाशोध केली, तेलंगणा पोलिसांनी कर्नाटक, आंध्र आणि महाराष्ट्रामध्ये शोधमोहीम राबविली पण त्यांना त्या मिळून आल्या नाही. पण, नगर तालुका पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या व सामाजिक कार्यकर्त्याच्या पाठपुराव्याने अखेर या महिलेला आपल्या घरी जाता आले. तेलंगणा राज्यातील या महिलेचे नाव ब्यागरी बक्म्मा रामचंद्रह (वय 60) होते. तेलंगणा राज्यातील विक्राबाद जिल्ह्यातील कोतलापूर या गावातील त्या राहणार्‍या. चार महिन्यांपूर्वी त्या शिर्डी येथे नातेवाईकांसोबत देवदर्शनासाठी आल्या होत्या. तेथेच कुटुंबांची आणि त्यांची चुकामूक झाली. त्या नगर-पुणे महामार्गावरून पायी चालत चालत कामरगाव (ता. नगर) येथे आल्या. सामाजिक कार्यकर्ते सरपंच तुकाराम कातोरे यांनी या महिलेची आस्थेवाईकपणे विचारपूस करून चंद्रकला दारकुंडे यांच्याकडे तीन ते चार दिवस त्यांची राहण्याची व्यवस्था केली. त्यांनतर नगर तालुका पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक सानप यांच्याशी त्यांनी संपर्क साधला. सानप हे संबंधित ठिकाणी तात्काळ दाखल झाले व त्यांनी त्या महिलेची आस्थेने चौकशी करून सर्व माहिती गोळा केली व पुढील तपास चालू केला. तपासामध्ये ही महिला तेलंगणा राज्यातील विक्राबाद जिल्ह्यातील कोतलापूर या गावातील असल्याची माहिती मिळाली. सानप यांनी तेथील पोलीस निरीक्षक जी.व्ही.श्रीणु यांच्याशी संपर्क करून संबंधित महिला महाराष्ट्रातील अहमदनगर पोलिसांच्या ताब्यात सुखरूप आहेत, अशी माहिती त्यांनी तेथील पोलिसांना दिली. त्यानंतर सानप यांनी सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता करून अरणगाव येथील मानवसेवा केंद्रात या महिलेला दाखल केले. तेथील संचालक गुंजाळ यांनी या महिलेला घरचे नातेवाईक येईपर्यंत आपल्या केंद्रात आश्रय दिला. त्यानंतर या सर्वांनी तिला तिच्या घरी सुखरूप पोहोच केले.

सानप व गुंजाळ यांचा सत्कार
नगर तालुका पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सानप तसेच आई-वडिलांच्या ममतेने सांभाळ करणारे मानव सेवा केंद्राचे प्रकल्प संचालक गुंजाळ यांच्या प्रयत्नातून घरापासून दुरावलेली महिला सुखरूप पोचल्याने सामाजिक कार्यकर्ते कातोरे यांनी सानप व गुंजाळ यांचा सत्कार केला. यावेळी बोलताना सानप यांनी, पोलीस विभागामध्ये काम करत असताना कायदा व सुव्यस्था सांभाळून असहाय व निराधार महिलेला आधार देण्याचेही काम करता आले, तसेच कातोरे व गुंजाळ यांच्या सहकार्यामुळे या महिलेला त्यांच्या घरी सुखरूप पोहोचविता आले मोठे समाधान वाटते, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

COMMENTS