अहिल्यानगर : शनिवारी-रविवारी (दिनांक ८ आणि ९ नोव्हेंबर २०२५) नगरमध्ये स्वातंत्र्यसैनिक सेनापती बापट साहित्य संमेलनाचे आयोजन केले आहे. या संमेलना
अहिल्यानगर : शनिवारी-रविवारी (दिनांक ८ आणि ९ नोव्हेंबर २०२५) नगरमध्ये स्वातंत्र्यसैनिक सेनापती बापट साहित्य संमेलनाचे आयोजन केले आहे. या संमेलनात जिल्ह्यातील ज्येष्ठ साहित्यरसिक, वाचनालये, लेखक, पालक आणि विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात येणार असल्याची माहिती आयोजक संस्था आत्मनिर्धार फाऊंडेशनचे (निंबळक) अध्यक्ष महादेव गवळी यांनी दिली.
याबद्दल अधिक माहिती देताना महादेव गवळी यांनी सांगितले की, कोणतेही साहित्य संमेलन हे वाचक-साहित्यिक यांना जोडणारा दुवा असते. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळांच्या मार्गदर्शनाखाली संमेलनाची तयारी अंतिम टप्प्यात आहे. एकूण साहित्य चळवळीचा केंद्रबिंदू हा साहित्यरसिक आणि वाचनालये आहेत. त्यामुळे अशा घटकांचा प्रातिनिधिक सन्मान साहित्य संमेलनात करण्याचे संयोजन समितीने ठरवले आहे. त्यानुसार नगर जिल्हा साहित्यसूची तयार करणारे साहित्यिक शब्बीरभाई शेख यांच्यासह पिंटो वाचनालय (पाडळी आळे, ता. पारनेर) व स्वस्तिक वाचनालय (पाथर्डी) यांचा संमेलनात सत्कार केला जाणार आहे. यासह साहित्यरसिक श्रीगोंदा तालुक्यातील गेणा भागुजी शेळके (रुईखेल), संतोष भूतकर (मांडवगण), अशोक शर्मा व श्रीमती रंजनाताई शर्मा (बेलवंडी) यांच्यासह नगरमधील संजीवनी बर्डे व शारदा परदेशी (सभासद, अहिल्यानगर जिल्हा वाचनालय) आणि गुलाबराव चोभे (बाबुर्डी बेंद, ता. नगर) यांचाही सत्कार केला जाणार आहे.
उद्घाटन सत्रात साहित्यिक चळवळीसाठी वाहून घेतलेल्या कुटुंबियांचा सन्मान करण्यात येणार असल्याची माहिती संयोजन समितीचे कार्याध्यक्ष हभप सिद्धीनाथ मेटे महाराज यांनी दिली. त्यानुसार दिवंगत साहित्यिक मुबारक तांबोळी कुटुंबीय (सारोळा कासार, ता. नगर), दिवंगत साहित्यरसिक संतोष शिंदे कुटुंबीय (दगडवाडी, ता. पाथर्डी), दिवंगत साहित्यिक योगेश गेरंगे-पाटील कुटुंबीय (इसळक, ता. नगर) यांचाही विशेष सत्कार करण्यात येणार आहे. संमेलनाध्यक्ष सुप्रसिद्ध लेखक-कवी इंद्रजीत भालेराव यांच्यासह अनेक साहित्यिकांना भेटणे, ऐकणे व संवाद साधण्यासाठी संमेलनास नक्कीच हजारो वाचक भेट देतील याचा विश्वास वाटतो. एकूणच जिल्ह्यातील वाचक, वाचनालये आणि साहित्यिक अशा सर्वांना एकाच व्यासपीठावर एकत्र येण्याची पर्वणी सेनापती बापट साहित्य संमेलनाच्या निमित्ताने साधली जाणार आहे.
संमेलनाच्या निमित्ताने विविध स्पर्धा घेतल्या होत्या. त्यातील सहभागी अशा सर्वांचा गौरव यानिमित्ताने केला जाणार असल्याची माहिती संयोजन समितीच्या सह-समन्वयक कवयित्री स्वाती पाटील यांनी दिली. त्यानुसार निबंध लेखन स्पर्धेतील प्राची शैलेंद्र नवले, दिपाली राहुल तवले, देवकी भाऊसाहेब ढोकणे, रेणुका भाऊसाहेब ढोकणे, अक्षय अंकुश होळकर, ईश्वरी सुरज साळुंखे, निमसे श्रावणी अंकुश, महेश्वरी रामदास शिंदे, मानसी सचिन साळवे, पायल धनंजय गायकवाड यांचा; तर कविता लेखन स्पर्धेतील शरद धलपे, दाणे संतोष दत्तात्रय, शामल अविनाश कामत, रमेश सिद्धेश्वर आमले आणि चित्रकला स्पर्धेतील गोसावी निधी शेखर व शिल्पा जोशी यांचाही गौरव विविध सत्रात केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

COMMENTS