देवळाली प्रवरा : राहुरी तालुक्यात बिबट्यांनी अक्षरशः दहशत माजवली असून शेतकरी आणि शेतमजूर जीव मुठीत धरून जगत आहेत. दिवसाढवळ्या बिबट्यांकडून पाळीव प

देवळाली प्रवरा : राहुरी तालुक्यात बिबट्यांनी अक्षरशः दहशत माजवली असून शेतकरी आणि शेतमजूर जीव मुठीत धरून जगत आहेत. दिवसाढवळ्या बिबट्यांकडून पाळीव प्राण्यांवर तसेच थेट माणसांवर हल्ले होत असताना प्रशासन आणि वनविभाग मात्र बघ्याची भूमिका घेत असल्याचा संताप व्यक्त होत आहे. त्यामुळे आता शेतीचे काम करताना शेतमजूराच्या संरक्षणासाठी शेतकरीच बंदूक घेऊन संरक्षण करतायेत.
बिबट्यांच्या वाढत्या वावरामुळे शेतमजूर कामावर येण्यास तयार नाहीत. परिणामी शेतीची कामे ठप्प होण्याच्या मार्गावर आहेत. परिस्थिती इतकी भयावह झाली आहे की, आता शेतकरी स्वतःच्या सुरक्षेसाठी बंदूक हातात घेऊन शेताच्या बांधावर पहारा देताना दिसत आहेत. खुडसरगाव ता.राहुरी येथील शेतकरी सतीश पवार हे बंदूक घेऊन उभे असलेले दृश्य संपूर्ण तालुक्यात खळबळ उडवणारे ठरले आहे.
“आज पाळीव प्राणी, उद्या माणूस!” अशी भीती शेतकऱ्यांच्या मनात घर करून बसली आहे. बिबट्यांचा मोकळा संचार पाहता केव्हाही अनर्थ घडू शकतो. रात्रीचा विजपुरवठा, ऊस व इतर पिकांमुळे निर्माण झालेली दाट झाडी आणि जंगलालगतची शेती यामुळे धोका आणखीनच वाढला आहे. शेतकरी व शेतमजूर प्रचंड मानसिक तणावाखाली आहेत.
या पार्श्वभूमीवर शेतकरी सतीश पवार यांनी प्रशासनाला थेट इशारा दिला आहे. दिवसा वीजपुरवठा करा, बिबट्यांना पकडण्यासाठी तातडीने पिंजरे लावा, वनविभागाने नियमित गस्त वाढवा अन्यथा परिस्थिती हाताबाहेर जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
वेळीच ठोस उपाययोजना न झाल्यास शेती व्यवसायासह मानवी जीवितालाही गंभीर धोका निर्माण होणार असून त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासन आणि वनविभागावर राहील, असा इशाराही शेतकऱ्यांकडून देण्यात येत आहे.
राहुरी तालुक्याचे नागरिक आता एकच प्रश्न विचारत आहेत. “प्रशासन एखादी जीवघेणी घटना घडल्यावरच जागे होणार का?” बिबट्याच्या भितीने शेतमजूर शेतात काम करण्यास येत नाही. पवार या शेतकऱ्यांने शेतात कांदा लागवड करताना हातात बंदूक घेवून शेतमजूरांचे संरक्षणासाठी शेताच्या बांधावर उभे ठाकले आहेत.

COMMENTS