बिहार राज्यातील मतदार हा राजकीय दृष्ट्या सर्वात सुज्ञ आणि जागृत मतदार मानला जातो. असं असलं तरी, बिहारमध्ये आतापर्यंत झालेल्या मतदानात एकूण ६५ टक

बिहार राज्यातील मतदार हा राजकीय दृष्ट्या सर्वात सुज्ञ आणि जागृत मतदार मानला जातो. असं असलं तरी, बिहारमध्ये आतापर्यंत झालेल्या मतदानात एकूण ६५ टक्के पेक्षा अधिक मतदान झाल्याची शक्यता आहे. दुपारी तीन वाजेपर्यंत जवळपास ५५ टक्के मतदान बिहारमध्ये झालेलं होतं. दोन तासानंतर म्हणजे संध्याकाळी ६ वाजता मतदानाची ही टक्केवारी ६५% पर्यंत गेलेली आहे. यापूर्वी, ज्याही वेळा ६०% पेक्षा अधिक मतदान झालेलं आहे; त्या त्यावेळी लालूप्रसाद यादव हे सत्तेवर आलेले आहेत. १९९० ला प्रथमच ६२% मतदान बिहारमध्ये झालं होतं. त्यावेळी, लालूप्रसाद यादव यांची सत्ता बिहारमध्ये आली होती. १९९५ मध्ये देखील ६१% च्या वर मतदान बिहारमध्ये झालं होतं; तेव्हाही, लालूप्रसाद यांची सत्ता आली होती. त्यानंतर २००० मध्ये ही ६०% मतदान बिहारमध्ये झालं होतं; आणि त्याहीवेळी लालूप्रसाद यादव यांची सत्ता होती. नितीश कुमार हे २००५ च्या निवडणुकीपासून सत्तेत आले. मात्र, त्या निवडणुकीत अवघे ४६% मतदान बिहारमध्ये झाले होते. त्यानंतर २०२० पर्यंतच्या जाहीर निवडणुका बिहारमध्ये झाल्या. नितीशकमार यांच्या नेतृत्वाखाली त्या सर्व निवडणुकांमध्ये मतदानाची टक्केवारी ही ५० ते ५४ च्या दरम्यान सरासरी राहिलेली आहे. मात्र, पंचवीस वर्षानंतर प्रथमच बिहार मधील मतदानाची टक्केवारी ही ६०% च्या वर गेली आहे. या वाढलेल्या मतदानाचा अर्थ जे बिहारच्या निवडणुकीतील पारंपारिक आणि आधुनिक विश्लेषक आहेत, या सगळ्यांना मान्य आहे की, सत्ता बदल होण्यासाठी हे मतदान आहे! मात्र, दुसऱ्या बाजूला देशाच्या अनेक राज्यातील मतदानाची टक्केवारी गेल्या काही वर्षांत वाढलेली दिसते आहे; आणि त्या वाढलेल्या टक्केवारीतून सत्तेत असलेला पक्ष पुन्हा सत्तेत येण्याची एक परंपरा दिसून येते आहे! तज्ञांच्या मते ज्याही वेळी मतदार हा उत्स्फूर्तपणे मतदान करतो, त्यावेळी सत्तेवर असणाऱ्या पक्षाला सत्तेतून बाहेर जावं लागण्याच्या घटना घडतात! परंतु, गेल्या चार ते पाच वर्षाचा अनुभव या विपरीत आहे! तो विपरीत कसा आहे, या संदर्भात राहुल गांधी यांनी ज्या दोन ते तीन पीपीटी सादर केल्या, त्यातून या वाढलेल्या टक्केवारी मध्ये केंद्रीय निवडणूक आयोगाचा कसा सहभाग असतो, ही गोष्ट प्रामुख्याने पुढे आलेली आहे. त्यामुळे हा बदल केवळ टक्केवारी चा बदल नाही; तर, यामध्ये नेमकं काय घडलं, या संदर्भातलं सत्य आता संपूर्ण देशामध्ये कळलेले आहे. कारण, ६०% च्या वर ज्या ज्या वेळी मतदान झालं त्या त्यावेळी लालूप्रसाद यादव यांची सत्ता बिहारमध्ये आलेली आहे. पंधरा वर्षे राज्य केल्यानंतर गेली २० ते २२ वर्ष नितेश कुमार यांची सत्ता आहे. मात्र, २० ते २२ वर्षे नितिश कुमार यांची सत्ता चालल्यानंतरही या निवडणुक प्रचारात भारतीय जनता पक्ष १५ वर्षाच्या सत्तेला जंगलराज म्हणण्याचे पालूपद अजूनही सोडायला तयार नाहीत. मात्र, मतदारांनी ही बाब नाकारलेली दिसते आहे! बिहारचा मतदार हा भर दुपारीच मोठ्या प्रमाणात मतदानाला निघालेला आहे. अर्थात, बिहारच्या मतदान केंद्रामध्ये दोन प्रकारच्या वेळा होत्या. काही मतदान केंद्रांवर संध्याकाळी सहा वाजेपर्यंत तर काही मतदान केंद्रावर संध्याकाळी पाच वाजेपर्यंतच मतदान होते. अर्थात, बिहारमध्ये थंडी आता वाढायला लागली असल्यामुळे, दुपारी मतदानाची टक्केवारी निश्चितपणे वाढली; त्याचा तो परिणाम आहे! एकंदरीत,, बिहारच्या निवडणुका या खूप दीर्घ काळानंतर चुरशीच्या झालेल्या दिसत आहेत. यामध्ये आख्या देशाला निकालांचं औत्सुक्य लागलेलं आहे. बिहार निवडणुकीच्या अवघ्या एक दिवसांआधी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी देशासमोर हरियाणाच्या मतदान चोरीवर थेट पीपीटी सादर केली आणि त्याचे परिणाम थेट जागतिक पातळीवर उमटले. या सगळ्या बाबी बघता बिहारच्या निवडणुकीतही राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर संशय व्यक्त केलेला आहे. ही बाब निवडणूक आयोग किती संवेदनशीलपणे घेतो, हे तर येणाऱ्या काही काळात स्पष्ट होईलच. परंतु, बिहारच्या जनतेने मतदानासाठी दाखवलेला उत्स्फूर्त प्रतिसाद निश्चितपणे कौतुकास्पद आहे. याही निर्णयावरून ही गोष्ट पुन्हा एकदा बिहारच्या मतदारांनी स्पष्ट केली आहे की, बिहारचा मतदार हा जागृत तर आहेच पण तेवढाच तो राजकारणाची समीक्षा करणारा बुद्धिमान मतदारही आहे.

COMMENTS