नाशिक प्रतिनिधी - सन २०२७ मध्ये पार पडणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी महापालिकेच्या वतीने जवळपास ११ हजार कोटींचा आराखडा तयार केला असून, त्यात तीन ह
नाशिक प्रतिनिधी – सन २०२७ मध्ये पार पडणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी महापालिकेच्या वतीने जवळपास ११ हजार कोटींचा आराखडा तयार केला असून, त्यात तीन हजार कोटी रुपये विविध विकासकामे व साधुग्रामसाठी तरतूद करण्याची मागणी नोंदविण्यात आली आहे. राज्य शासनाकडून समन्वय समिती गठित केली जाईल. समितीच्या भूमिकेवर आराखड्याचे भवितव्य ठरणार आहे. मागील सिंहस्थात जवळपास तीन हजार कोटींचा आराखडा तयार करण्यात आला होता. शासनाने एक हजार कोटींच्या आराखड्याला मंजुरी दिली. त्यामुळे महापालिकेने अकरा हजार कोटींचा आराखडा तयार केला असला तरी समितीकडून किती कोटींचा आराखडा मंजूर होईल, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल
२०२७-२८ मधील सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी भाविक व साधूमहंतांना सुविधा पुरविण्यासाठी विकास आराखडा तयार करावा लागतो. नाशिकमधील सिंहस्थ कुंभमेळ्यात नाशिक महापालिकेची महत्त्वाची भूमिका असते. त्यामुळे महापालिकेकडून विकासाचा आराखडा तयार करण्यात आला आहे. आराखडा तयार करण्यासाठी महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. अशोक करंजकर यांच्या नेतृत्वाखाली अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली सिंहस्थ आराखडा समन्वय समिती स्थापन करण्यात आली.
समितीकडून ४२ विभागांकडून विकास आराखडा मागविण्यात आला. त्यात बांधकाम विभागाने २,५०० कोटी रुपये, मलनिस्सारण विभागाकडून ६२७ कोटींचा प्राथमिक आराखडा सादर करण्यात आला. आरोग्य व वैद्यकीय, अग्निशमन, उद्यान, पाणीपुरवठा, जनसंपर्क, घनकचरा विभागांकडूनही खर्चाची आकडेवारी सादर करण्यात आली. त्या वेळी आठ हजार कोटींचा सिंहस्थ आराखडा होता. भूसंपादन विभागाकडून खर्चाची आकडेवारी सादर होत नव्हती. परंतु मागील आठवड्यात अंतिमतः तीन हजार कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला. त्यामुळे एकूण आराखडा अकरा हजार कोटी रुपयांवर पोचला आहे. भूसंपादनामध्ये अस्तित्वात असलेले रिंगरोडचे मिसिंग रोड व साधुग्रामसाठी भूसंपादन केले जाणार आहे.
वाराणसीच्या धर्तीवर नियोजन:– वाराणसी येथे २०२५ मध्ये सिंहस्थ कुंभमेळा होणार आहे. तेथील उपाययोजनांच्या धर्तीवर नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याचे नियोजन करण्यात आले आहे. महापालिकेचे पथक यापूर्वी एकदा भेट देऊन गेले. कामे सुरू होण्यापूर्वी आणखी एक भेट पथक देणार आहे. गोदावरी नदीकाठी घाट विकास, प्रदूषणमुक्ती, मलनिस्सारण केंद्रांच्या सक्षमीकरणावर या माध्यमातून भर दिला जाणार आहे.
सिंहस्थासाठी अकरा हजार कोटींचा आराखडा तयार करण्यात आला असून, सिंहस्थ समन्वय समितीसमोर आराखडा सादर केला जाईल. त्यानंतर प्रत्यक्षात कामाला सुरवात होईल.” – डॉ. अशोक करंजकर, आयुक्त
COMMENTS