कोपरगाव शहर ः महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यांच्या वतीने घेण्यात आलेल्या हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बस स्थानक अभियान
कोपरगाव शहर ः महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ यांच्या वतीने घेण्यात आलेल्या हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बस स्थानक अभियान अंतर्गत अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव बस स्थानकाने तृतीय क्रमांक मिळवत कोपरगावच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
सविस्तर वृत्त असे की, राज्याचे मुख्यमंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून 1 मे 2023 ते 30 मे 2024 या काळामध्ये राज्य परिवहन मंडळाच्या सर्व बस स्थानकावर हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बस स्थानक अभियान राबवले गेले होते. यात लोकसभागातून बस स्थानकाचा विकास या संकल्पनेवर आधारित राबवण्यात आलेल्या अभियानामध्ये स्थानिक लोकांच्या सहकार्यातून बस स्थानक व बस स्थानक परिसराचे सुशोभीकरण, आकर्षक रंगरंगोटी, मोकळ्या जागेमध्ये बाग बगीचा, वृक्षारोपण, प्रवाशांसाठी बस स्थानकावर वॉटर कुलर, घड्याळ, सेल्फी पॉईंट ही कामे करण्यात आली. याबरोबरच प्रवाशांना मिळणार्या सेवा सुविधा, बसेसच्या स्वच्छतेबरोबर त्यांची तांत्रिक दुरुस्ती देखभाल या सर्व घटकांचा विचार करून वर्षभरात वेगवेगळ्या सर्वेक्षण समितीच्या माध्यमातून बस स्थानकाचे मूल्यांकन करण्यात आले या मूल्यांकनावर आधारित दिलेल्या गुणांच्या सरासरी द्वारे राज्यभरातील बस स्थानकांची बक्षिसासाठी निवड करण्यात आली होती याच अभियानात नाशिक प्रादेशिक विभागात अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव बस स्थानकाने 78 गुण मिळवत तिसरा क्रमांक मिळवला असून 2 लाख 50 हजार रुपयांचे बक्षीस मिळविले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या बस स्थानक स्वच्छता व सुशोभीकरण अभियानांतर्गत कोपरगाव आगारद्वारे आवाहन केल्यानंतर समता चॅरिटेबल ट्रस्ट, व्यापारी महासंघ, किराणा मर्चंट असोसिएशनचे पदाधिकारी एकत्र येत बस स्थानकात स्वच्छता मोहिमेबरोबरच प्रवाशासाठी विविध सुविधा आणि उपक्रम राबवत होती आज त्याचे फलित झाले.
काका कोयटे, संस्थापक समता पतसंस्था
या यशामागे विभाग नियंत्रक मनीषा सपकाळ, विभागीय वाहतूक अधिकारी धनराळे, यंत्र अभियंता पंडित यांच्यासह समता नागरी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष काका कोयटे, सर्व बस आगारातील अधिकारी, चालक, वाहक, कर्मचारी प्रवासी तसेच पत्रकार बांधवांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.
अमोल बनकर, आगर व्यवस्थापक कोपरगाव
COMMENTS