रत्नागिरी जिल्यातील चिपळूण शहरापासून साधारण १० कि.मी अंतरावर कोळकेवाडीच धरण आहे. या धरणाच्या मागे सह्याद्रीच्या मुख्य रांगेला काटकोनात असलेल्या डोंगर
रत्नागिरी जिल्यातील चिपळूण शहरापासून साधारण १० कि.मी अंतरावर कोळकेवाडीच धरण आहे. या धरणाच्या मागे सह्याद्रीच्या मुख्य रांगेला काटकोनात असलेल्या डोंगरावर कोळकेवाडीदूर्ग हा किल्ला आहे. दूर्गम प्रदेशात असलेल्या या किल्ल्यावर चढाई करताना एक वेगळाच अनुभव येतो. या गडाची उंची साधारण 2625 असून हा गिरिदुर्ग या प्रकारातील गड आहे.
गडाचा इतिहास :
या गडावरील खोदीव लेणी व टाक पहाता शिलाहार राजांच्या काळातील हा गड असावा.अस अंदाजे वाटते . या गडाचा उपयोग टेहाळणीसाठी होत असावा.
गडाचा परिचय :
चिपळूण – कराड या रस्त्यावर चिपळूणपासून साधारण ५ किमी वर “अलोरे” गाव आहे. या गावातून एक रस्ता ५ किमी वरील “कोकळेवाडी” या गावात जातो. कोकळेवाडी गावाच्या टोकाला बुध्दवाडी आहे. येथून एक कच्चा रस्ता धनगरवाडीकडे जातो. खाजगी जीप सारख्या वाहनाने आपण धनगरवाडीच्या १ किमी अलिकडे असलेल्या टेकडीच्या पायथ्याशी जाऊ शकतो. येथे गाडी ठेऊन उजव्याबाजूच्या कच्च्या रस्त्याने अर्धी टेकडी चढल्यावर, डाव्या बाजूला एक पायवाट गर्द रानात शिरते. या पायवाटेने आपण किल्ल्यावर पोहोचतो.
या गडावर जाणारी पायवाट दाट झाडीतून जाते. या झाडीतून वर आल्यावर आपण डोंगराच्या दांडावर येतो. समोर दुर्गाचा माथा साधारण १०० फूट उंचावर दिसतो, तर उजव्या हाताला एक पायवाट डोंगराच्या कडेकडेने डोंगराला वळसा घालून गेलेली दिसते. या पायवाटेने चालत गेल्यावर पाण्याच टाक लागत या टाक्याच्या पुढे चालत जाऊन डोंगराला वळसा घातल्यावर एक छोटासा दगडांचा टप्पा उतरावा लागतो. तो उतरल्यावर आपण किल्ल्याचा डोंगर व त्याच्या मागील सह्याद्रीची मुख्य रांग यांच्या मधील घळीत येतो. तेथून सह्याद्रीच्या मुख्य रांगेतील डोंगरावर चढल्यावर दगडात खोदलेल पाण्याच टाक लागत. आलेल्या मार्गाने परत डोंगर सोंडेवर येऊन किल्ल्याचा मुख्य डोंगर चढायला सुरुवात केल्यावर साधारणत: अर्ध्या उंचीवर एक पायवाट डावीकडे उतरते. या पायवाटेने गेल्यावर आपल्याला दगडात खोदलेल्या दोन गुंफा दिसतात. त्यांच्या समोर डोंगराच्या कड्यापर्यंत जाणारा कातळात खोदलेला अरुंद मार्ग दिसतो. पूर्वी या ठिकाणी किल्ल्याचे प्रवेशद्वार असावे. दोन गुंफापैकी एकीचे छत कोसळलेले आहे, तर दुसरी गुंफा सुस्थितीत आहे. प्रकाश व हवा येण्यासाठी गुंफेत झरोका ठेवलेला आहे. आतील रचनेवरुन येथे पहारेकर्यांसाठी देवड्या असाव्यात.
छत तुटलेल्या गुंफेला वर चढून जाण्यासाठी खाचा केलेल्या आहेत. या खाचेंतून चढून गेल्यावर आपण एका लेण्यापाशी पोहचतो. या लेण्याचे छत दोन खांबावर तोललेले आहे. तसेच पुढे गेल्यावर दुसरे लेणे लागते. याच्या प्रवेशद्वारावर कोरीव काम केलेले आहे. प्रवेशद्वाराच्या आतील बाजूस दगडात कोरलेला माळा आहे. येथून पूढे गेल्यावर अजून दोन गुहा लागतात.आलेल्या मार्गाने परत किल्ल्याच्या प्रवेशद्वाराशी येऊन किल्ल्याच्या सर्वोच्च टोकावर जाता येते. या किल्ल्यावरुन जंगली जयगड, कोकळेवाडी धरण, मठ नावाचा डोंगर व सह्याद्रीची उत्तुंग रांग फारच सुंदर दिसते.
लेखक : साईप्रसाद प्रमोद कुंभकर्ण
COMMENTS