नाशिक : ज्या व्यक्तींना उच्च रक्तदाब, मधुमेह यासांरख्या आजारांचा त्रास असतो त्या व्यक्तींना किडनीचे गंभीर आजार होण्याचा धोका मोठ्या प्रमाणात असतो
नाशिक : ज्या व्यक्तींना उच्च रक्तदाब, मधुमेह यासांरख्या आजारांचा त्रास असतो त्या व्यक्तींना किडनीचे गंभीर आजार होण्याचा धोका मोठ्या प्रमाणात असतो. त्यामुळे किडनीचं कार्य सुरळीत सुरु ठेवण्यासाठी किडनीच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं असल्याचे प्रतिपादन देवगांवकर हॉस्पीटलचे किडनीविकार तज्ञ डॉ. पार्थ देवगांवकर यांनी केले. एकता ज्येष्ठ नागरिक संघातर्फे आयोजित किडनविकारावरील जनजागृतीपर व्याख्यान कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर अध्यक्ष प्रताप वाढणे, गोबजी जाधव, अनिल विभांडीक, सुधाकर भोई, एकनाथ पगार उपस्थित होते. डॉ. देवगांवकर म्हणाले की, आहारातील मिठाचे प्रमाण कमी करून फास्टफूड टाळावे. तसेच मधुमेह नियंत्रणात ठेवल्यास किडनी विकाराचा त्रास टाळता येऊ शकतो.
मूत्रपिंड विकाराची कारणे व प्रकार खूप आहेत. या सर्वात महत्वाचे लघवीचे प्रमाण कमी होते. डायबेटीस, उच्चरक्तदाब, मुत्रपिंडांचा संसर्ग आदी कारणामुळे मुत्रपिंडाच्या कामावर परिणाम होऊ शकतो. यावर तातडीने उपचार केले नाही तर मूत्रपिंडाचे काम पूर्ण थांबू शकते. यासाठी ज्येष्ठांनी वेळीच काळजी घेणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले. किडनीचं कार्य उत्तम राहण्यासाठी भरपूर प्रमाणात पाणी पिणं गरजेचं आहे. डिहाड्रेशनचा धोका टाळण्यासाठी ७० किलोच्या व्यक्तीने दिवसाला २५०० मिली पाणी प्यायलं पाहिजे. जर तुमच्या लघवीचा रंग फिक्कट पिवळा असेल तर तुम्ही योग्य प्रमाणात पाणी पित आहात. मात्र जर लघवीचा रंग गडद असेल तर तुम्हाला पिण्याच्या पाण्याचं प्रमाण वाढवणं गरजेचं असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने परिसरातील ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.
COMMENTS