Homeताज्या बातम्यासंपादकीय

खडसे अडकले राजकीय चक्रव्युहात

राज्यातील ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचा भाजपप्रवेश अजूनही झालेला नाही. त्यामुळे खर्‍या अर्थाने खडसे राजकीय चक्रव्युहात कसे अडकले याचीच चर्चा होता

काँगे्रस-ठाकरेंतील कुरघोडीचे राजकारण
कथनी आणि करणीतील फरक
सत्ताधारी आणि विरोधकांची ‘दिशा’  

राज्यातील ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचा भाजपप्रवेश अजूनही झालेला नाही. त्यामुळे खर्‍या अर्थाने खडसे राजकीय चक्रव्युहात कसे अडकले याचीच चर्चा होतांना दिसून येत आहे. भाजपमध्ये कोंडी होत असल्यामुळे खडसे यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँगे्रसमध्ये प्रवेश केला होता. खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला तेव्हा राज्यात महाविकास आघाडीचे सरकार होते, त्यामुळे खडसे यांना विधानपरिषदेवर घेऊन त्यांना मंत्रीपद मिळेल अशी अपेक्षा होती, मात्र राज्यपाल नियुक्त सदस्य म्हणून खडसे यांची तेव्हा नियुक्ती होवू शकली नाही. कारण तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी 12 आमदारांच्या नावांना संमती दिली नाही. त्यामुळे खडसे लवकर आमदार होवू शकले नाही, आणि पुढील काही दिवसांतच महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. त्यामुळे खडसेंचा राष्ट्रवादीतील प्रवेश आणि काही दिवसांतच सरकार कोसळल्यामुळे खडसे यांचा राजकीय विजनवास सुरूच होता. नंतरच्या काळात राज्यात महाविकास आघाडीला चांगले वातावरण असतांना खडसे यांनी आपली सुन रक्षा खडसे यांच्यासाठी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्यांनी थेट राजधानीत जावून भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी भेटी घेतल्या. त्यानंतर नाथाभाऊंनी राष्ट्रवादीचा राजीनामा दिला.

तसेच पुढील 15 दिवसांमध्ये आपला राजधानीत वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीमध्ये भाजप प्रवेश होणार असल्याचे खडसे यांनी जाहीरपणे जळगावमध्ये पत्रकार परिषद घेवून सांगितले. त्यामुळे खरंच खडसे यांचा भाजपप्रवेश होणार असल्याचे दिसत होते, तरी राज्यातील भाजप नेते नाराज होते. त्यानंतर जादूची कांडी फिरली आणि खडसे यांचा भाजपप्रवेश रखडलाच. त्यामुळे खडसे आता बिनपक्षाचे नेते झाले आहेत. शरद पवारांच्या पक्षाचा आधीच राजीनामा दिला असून, आता भाजपप्रवेशही होत नाही, त्यामुळे खडसे पुरते राजकीय चक्रव्युहात अडकल्याचे दिसून येत आहे. वास्तविक पाहता खडसे यांनी इतर राजकीय नेत्यांचे उदाहरण डोळ्यासमोर ठेवण्याची गरज होती. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अनेक राजकीय पक्षांतर होत असतांना या कानाची त्या कानाला खबर लागत नाही. ऐनवेळी पक्षांतराचा निर्णय घेतला जातो. अशावेळी खडसे यांनी भाजपप्रवेशाचा दिवस आणि ठिकाण ठरवल्यानंतरच राष्ट्रवादीतून बाहेर पडायचे होते. मात्र आता खडसे बिनपक्षाचे नेते झाले आहेत. खडसे यांचा स्वभाव मोकळा-ढाकला आहे. त्यांनी आपली उभी ह्यात भाजपमध्ये घालवली आहे, मात्र सत्ता येताच त्यांना दूर करण्यात आले. आतातर खडसे जरी भाजपमध्ये दाखल झाले तरी, त्यांना राज्यपालपदावर संधी देत त्यांच्या राजकीय कारकीर्दीला लगाम लावणार असल्याच्या चर्चा देखील मध्यंतरीच्या काळात सुरू होत्या. कोणत्याही राजकीय पक्षात उघडपणे राजकीय महत्वाकांक्षा दाखवणे आपल्या पुढील राजकीय कारकीर्दाला धोक्यात घालण्यासारखे आहे.

पंकजा मुंडे यांनी आपण जनतेच्या मनातील मुख्यमंत्री असल्याचे विधान केल्यानंतर त्यांची 2019 नंतर काय अवस्था झाली, याचे उत्तम उदाहरण महाराष्ट्रासमोर आहे. 2014 मध्ये भाजपचे सरकार सत्तेवर येणार असतांना आपण मुख्यमंत्रीपदाचे दावेदार असल्याचे वक्तव्य खडसे यांनी केले होते, त्यानंतर खडसे यांची काय अवस्था झाली हे महाराष्ट्र जाणून आहेच. खरंतर महत्वाकांक्षेला लगाम केवळ भाजपमध्येच घातला जातो, असे नाही, तर तो काँगे्रसमध्ये देखील घातला जातो. काँगे्रसमध्ये बंड करून शरद पवार यांनी 1978 मध्ये पुलोदचे सरकार स्थापन केल्यानंतर काँगे्रसने कधीही शरद पवारांना पंतप्रधान पदाची संधी दिली नाही. 1991 मध्ये ते संधी देवू शकत होते, मात्र ती संधी नाकारण्यात आली. त्यामुळे महत्वाकांक्षा असावी, मात्र ती जाहीरपणे बोलून दाखवली की, राजकीय आत्मघात होतो, तसेच काहींसे खडसेंच्या बाबतीत दिसून येत आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजपला कितपत यश मिळते, त्यानंतरच खडसे यांचे राजकीय महत्व ठरणार आहे. कारण जर भाजपला जर अपेक्षेपेक्षा कमी जागा मिळाल्यातर खडसेंना पक्षात घेवून भाजप आपली ताकद वाढवण्याचा प्रयत्न करू शकतो. त्यासाठी खडसे यांना राज्यातील भाजप नेत्यांशी जुळवून घ्यावे लागणार आहे.

COMMENTS