अवकाळीच्या कळा शेतकर्यांना आता सोसवेना अशीच शेतकर्यांची गत झाली आहे. राज्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला असून, अवकाळीच्या या कळा शेतकर्यांन

अवकाळीच्या कळा शेतकर्यांना आता सोसवेना अशीच शेतकर्यांची गत झाली आहे. राज्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला असून, अवकाळीच्या या कळा शेतकर्यांना सोसवेल का? हा कळीचा प्रश्न आहे. गतवर्षी कोरडा दुष्काळ आणि यंदा होत असललेल्या अतिवृष्टीने शेतकर्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास पाऊस हिरावून नेतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. यावर्षी शेतकर्यांसमोर एकीकडे हसू तर दुसरीकडे अश्रू असल्याचे दिसून येत आहे. चांगला पाऊस होत असल्याने यंदा रब्बी हंगाम चांगला होण्याची शक्यता आहे. यासोबतच नद्या, नाले, ओढे भरून वाहतांना दिसून येत आहे. त्यामुळे पिण्याचा प्रश्न जवळपास मिटला आहे. जनावरांच्या पाण्याचा प्रश्न देखील मिटला आहे. त्यामुळे एकीकडे शेतकर्यांच्या डोळ्यात हसू आहे. तर दुसरीकडे सोयाबीन, कपाशी, मूग, उडीद यासारखे पिके पाण्यात गेली आहे. सातत्याने होत असलेल्या पावसामुळे पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हाता-तोंडाशी आलेला घास निसर्ग हिरावून घेत असल्यामुळे शेतकर्यांच्या दुसर्या डोळ्यात अश्रू आहे. शेतकरी वर्गाला नेहमीच खडतर परीक्षेतून जावे लागते. कधी उत्पादन चांगले झाले तर, बाजारभाव मिळत नाही. त्यामुळे त्याला कधी व्यवस्था नागवते, तर कधी निसर्ग. त्यामुळे शेतकरी स्वयंपूर्ण होण्याची खरी गरज आहे. कोणत्याही परिस्थितीत शेतकरी कोलमोडून गेला नाही पाहिजे, यासाठी धोरण आखण्याची गरज आहे. शेतकर्यांना अनुदानाची गरज नसून त्याला स्वयंपूर्ण होण्यासाठी प्रयत्न करण्याची खरी गरज आहे. वास्तविक पाहता शेतकर्यांचा प्रश्न हा आजचा नाही. शेतकर्यांच्या उत्पादनावर, अन्ननधान्यांवर देशाची अर्थव्यवस्था चालते. कारण त्यातून सेवाक्षेत्राला मोठा फायदा होता. मात्र शेतकर्यांचे प्रश्न कधीही सोडवण्याचे प्रयत्न झाले नाही.
शेतकर्याला कायमच नागवण्यात आले. वास्तविक पाहता शेतकर्यांनी शेतीसोबतच इतर जोडधंदे करणे अत्यावश्यक बनले आहे, किंबहुना ती आजची गरज आाहे. निसर्गाच्या लहरीपणाला मानवच जबाबदार आहे. तापमानवाढीमुळे निसर्गाचा समतोल बिघडतांना दिसून येत आहे. खरंतर शेती ही पुरातन काळापासून ती आजपर्यंत सुरू आहे. शेती ही पोटभरण्याचे साधन होते. मात्र इंग्रज भारतात आल्यानंतर शेतीचे रूपडे पालटले. शेतकरी हळूहळू आपली पिके बाजारात विक्रीसाठी आणू लागला. अर्थव्यवस्थेत पैशाच्या माध्यमातून होणार्या व्यवहारांचे महत्व वाढत गेल्यामुळे शेतीवरही वाणिज्यीकरणाचा प्रभाव पडू लागला. सरकारी महसूल पैशाच्या रूपाने द्यावा लागत होता, त्यामुळे कर्जाची गरज वाढून रोकडची तरतूद करणे शेतकर्यांना भाग पडले. त्यातूनच शेती विक्री करू लागले. तेव्हापासून शेतकर्यांना ज्या अवकळा सुरू आहेत, त्या स्वातंत्र्यांच्या पंच्याहत्तरीनंतर देखील थांबवता आलेल्या नाहीत. रात्रंदिवस काबाडकष्ट करून शेतकरी अन्नधान्य पिकवतो. शेतकरी शेतात राबतो म्हणून अर्थव्यवस्थेची चाके चालतात.कारण भारतातील अर्थ व्यवस्था देखील शेती उद्योगाशी निगडित आहे. भारतीय समाज व्यवस्थेतील शेतकरी हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. शेतीवर उद्योगधंदे, पशुधन आणि मानवी जीवन अवलंबून असते. शेतीचे चाके थांबल्यास सर्व जनजीवन उध्वस्त होण्या शिवाय पर्याय नसतो. कारण अन्नधान्य, भाजीपाला, दुग्धजन्य पदार्थ या सारखे जिवनाश्यक बाबीचा निर्माता हा शेतकरी आहे म्हणून शेतकर्याला ’जगाचा पोशिंदा’ म्हटल्या जाते. समाजव्यवस्था अबाधित रहावी म्हणून उन, पाऊस, थंडी, वादळी वारा अशां आपदांचा कसलाही विचार न करता, न थकता बारामाही राबणारा पोशिंदा म्हणजेच शेतकरी होय. मात्र तो निसर्ग किंवा व्यवस्थेने त्याला कायमच नागवले जाते. आणि तो देखील कधी आपल्या हक्कांसाठी आक्रमक होत नाही. देशातील शेतकर्यांनी जर एक वर्षभरच ठरवले की, यंदा शेती करायची नाही, तर काय होईल. याच्या परिणामाची भीती भयावह आहे. कारण शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे, त्या संप पुकारल्यास अर्थव्यवस्था कोसळेल, मात्र तरी देखील तो कोणत्याही परिस्थितीत आपली शेती पिकवणे सोडत नाही, त्यामुळे शेतकर्यांना मदतीची नाही तर, त्याला स्वयपूर्ण करण्याची खरी गरज आहे.
COMMENTS