मुंबई : केईएम ही मुंबईच्या सामाजिक जीवनातील महत्त्वाची सामाजिक संस्था आहे. आरोग्य क्षेत्रातील एखाद्या संस्थेने सुवर्ण किंवा शताब्दी महोत्सव साजर
मुंबई : केईएम ही मुंबईच्या सामाजिक जीवनातील महत्त्वाची सामाजिक संस्था आहे. आरोग्य क्षेत्रातील एखाद्या संस्थेने सुवर्ण किंवा शताब्दी महोत्सव साजरा करणे ही त्या संस्थेसाठी अभिमानास्पद बाब असते. मुंबईच्या आरोग्य क्षेत्रात केईएमचे नाव अग्रगण्य आहे. संस्थेने आपल्या शताब्दी वर्षामध्ये पदार्पण केले असून हे वर्ष समाजोपयोगी ठरावे, अशी अपेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज व्यक्त केली.
सेठ गोवर्धनदास सुंदरदास वैद्यकीय महाविद्यालय व राजे एडवर्ड स्मारक रुग्णालय शताब्दी वर्ष शुभारंभ कार्यक्रमाचे आयोजन केईएम रुग्णालयात करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री मंगल प्रभात लोढा, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, राज्यसभा खासदार मिलिंद देवरा, आमदार सर्वश्री अजय चौधरी, कालिदास कोळंबकर , राजहंस सिंह, महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी, अतिरिक्त आयुक्त बिपिन शर्मा, अधिष्ठाता संगीता रावत आदी उपस्थित होते.
संस्थेच्या या 100 वर्षांच्या काळात संस्थेसाठी समर्पण वृत्तीने काम करणाऱ्या लोकांना धन्यवाद देत मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, आरोग्य क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने परिवर्तन होत आहे. राज्य शासनही नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा मिळण्यासाठी आरोग्य क्षेत्रामध्ये आमूलाग्र बदल करीत आहे. महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून प्रत्येक व्यक्तीला पाच लाखापर्यंतचे मोफत उपचार मिळत आहे. प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालयाचे धोरण राज्याने स्वीकारले आहे. त्यानुसार मागील एक वर्षात दहा नवीन वैद्यकीय शासकीय महाविद्यालय राज्यात सुरू करण्यात आली आहे.
कोविडच्या काळात शासकीय रुग्णालयांनी खूप चांगले काम केले. त्यामुळे अनेकांचे जीव वाचले. कोविडच्या काळात शासकीय रुग्णालयाचे काम निश्चितच कौतुकास्पद होते. केईएम हे कुटुंब आहे, यामध्ये प्रत्येक व्यक्तीची काळजी घेतली जाते. हे संस्थेला अभिमानास्पद आहे. संस्थेच्या कर्मचाऱ्यांसाठी 21 मजली इमारतीचे भूमिपूजनही करण्यात आले आहे, असेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले.
प्रास्ताविक अधिष्ठाता संगीता रावत यांनी केले. कार्यक्रमाला डॉक्टर्स, प्राध्यापक तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
COMMENTS