नवी दिल्ली/प्रतिनिधी ः दिल्लीतील कथित मद्य घोटाळ्याची धग अजूनही काही कमी होण्याची चिन्हे नसून, केंद्रीय अन्वेषण विभाग अर्थात सीबीआयने शुक्रवारी द

नवी दिल्ली/प्रतिनिधी ः दिल्लीतील कथित मद्य घोटाळ्याची धग अजूनही काही कमी होण्याची चिन्हे नसून, केंद्रीय अन्वेषण विभाग अर्थात सीबीआयने शुक्रवारी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना समन्स बजावल्यामुळे खळबळ उडाली आहे. त्यामुळे केजरीवालांचा पाय खोलात जातांना दिसून येत आहे. सीबीआयने पाठवलेल्या समन्समध्ये उद्या शनिवार 16 एप्रिलला चौकशीसाठी हजर राहण्याचे समन्स बजावले आहे. त्यामुळे आपचे नेते मनीष सिसोदीयानंतर आता थेट केजरीवाल यांना समन्स पाठवल्यामुळे सीबीआयच्या रडारवर आता केजरीवाल असल्याचे दिसून येत आहे.
आपचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी ट्विट करून याला अत्याचार म्हटले आहे. त्यांनी लिहिले की, अत्याचार नक्कीच संपुष्टात येतील. या प्रकरणात दिल्लीचे माजी मुख्यमंत्री मनीष सिसोदिया हेदेखील तुरुंगात आहेत. सिसोदिया यांना सीबीआयने 26 फेब्रुवारी रोजी अटक केली होती. मनीष सिसोदिया यांची अंमलबजावणी संचालनालयानेही (ईडी) तुरुंगात चौकशी केली होती. चौकशीनंतर ईडीने मनीष सिसोदिया यांना तुरुंगातूनच अटक केली होती. ईडीने मनीष सिसोदिया यांचीही कोठडीत चौकशी केली होती. याप्रकरणी मनीष सिसोदिया यांनी राऊज अव्हेन्यू कोर्टात याचिका दाखल करून जामीन मागितला होता. मात्र, न्यायालयाने ते मान्य केले नाही. दिल्ली सरकारने 17 नोव्हेंबर 2021 रोजी नवीन उत्पादन शुल्क धोरण लागू केले होते. या धोरणाच्या अंमलबजावणीनंतर दिल्ली सरकारने महसूल वाढीसोबतच माफिया राजचा अंत करण्याचा युक्तिवाद केला होता, मात्र नेमके उलटे झाले. दिल्ली सरकारचा महसूल बुडाला. जुलै 2022 मध्ये दिल्लीच्या तत्कालीन मुख्य सचिवांनी एलजी व्हीके सक्सेना यांना एक अहवाल सादर केला होता, ज्यामध्ये मनीष सिसोदिया यांच्यावर दारू व्यापार्यांना अवाजवी लाभ दिल्याचा आरोप करण्यात आला होता. नायब राज्यपालांनी या प्रकरणाची सीबीआयमार्फत चौकशी करण्याची शिफारस केली होती. एलजींच्या शिफारसीनंतर सीबीआयने 17 ऑगस्ट 2022 रोजी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला. या प्रकरणात मनीष सिसोदिया यांच्यासह 15 जणांना आरोपी करण्यात आले होते. 22 ऑगस्ट रोजी ईडीने अबकारी धोरणात मनी लाँड्रिंगचा गुन्हाही नोंदवला होता. सुमारे 6 महिन्यांच्या तपासानंतर सीबीआयने फेब्रुवारी महिन्यात मनीष सिसोदिया यांना अटक केली. तेव्हापासून मनीष सिसोदिया तुरुंगात आहेत.
राजधानीतील राजकारण तापणार – आपचे पाच मंत्री यापूर्वीच तुरुंगात असून, आता थेट दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आप पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांना सीबीआयने समन्स बजावल्यानंतर राजधानीतील राजकारण तापण्याची शक्यता आहे. भ्रष्टाचारविरोधी आंदोलनातून जन्म घेतलेला पक्ष अशी ओळख असलेल्या आपचे पाच मंत्री भ्रष्टाचाराच्या कारणांवरून तुरुंगात आहेत. दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन हे मनी लॉन्ड्रिंगच्या आरोपाखाली जेलमध्ये आहेत. याआधी सोमनाथ भारती यांच्यावरही घरगुती हिंसाचाराचे आरोप होते. मनीष सिसोदिया हे अटक झालेले आपचे पाचवे मंत्री होते.
COMMENTS