Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राष्ट्रवादी विरोधक एकसंघ ठेवणे भाजपासाठी कसरत : निशिकांत पाटील यांना स्वकीयांचाच अडथळा

इस्लामपूर / प्रतिनिधी : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील व माजी नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांच्यातील राजकिय, संस्थात्मक व विकासाच्या दृष

सातार्‍यात वाढदिवसाचा केक रस्त्यावर कापणार्‍या 16 जणांना अटक
विषमुक्त शेतीसह विषमुक्त कृषी उत्पादने काळाची गरज : ना. देवेंद्र फडणवीस
कराडला कुत्र्याच्या हल्ल्यात 7 वर्षाचा मुलगा गंभीर जखमी

इस्लामपूर / प्रतिनिधी : राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील व माजी नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांच्यातील राजकिय, संस्थात्मक व विकासाच्या दृष्टीने सुरु असलेला संघर्ष सर्वश्रुत आहे. इस्लामपूर विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी विरोधकांतील ऐकिच्या ऐवजी बेकिमुळे आ. जयंत पाटील यांना आपले राजकिय अस्तित्व अबाधीत ठेवण्यास बळ मिळत आहे. भाजपच्या निशिकांत पाटील यांच्या राजकिय प्रवासात स्वकियचं अडथळा ठरत असल्याची चर्चा कार्यकर्त्यांतून होताना दिसत आहे. त्यामुळे इस्लामपूर विधानसभा मतदार संघातील विखुरलेले विरोधक एकसंघ ठेवणे हे भाजपच्या वरिष्ठांसाठी कसरत ठरणार आहे.
सद्या नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीत प्रशासक काम पाहत आहेत. गत नगरपालिकेच्या निवडणुकीत स्व. नानासाहेब महाडिक, माजी खा. राजू शेट्टी, माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादीतील नाराजांची कुणकुण लागताच निशिकांत पाटील यांच्यासारखे अभ्यासू, कर्तबगार व विकासाची दुरदृष्टी असणारे नेतृत्व हेरले आणि विकास आघाडीतर्फे थेट नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिली. पालिकेतील आ. जयंत पाटील यांच्या एकहाती 31 वर्षांच्या सत्तेला सुरूंग लागला. ही निवडणुक संपुर्ण महाराष्ट्रभर गाजली. आ. जयंत पाटील यांना होमपिचवर पराभवाला सामोरे जावे लागल्याने महाराष्ट्राच्या राजकिय वर्तुळात याची चर्चा चांगलीच रंगली. इथूनच आ. जयंत पाटील व माजी नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांचा राजकिय संघर्ष सुरू झाला.
नगरपालिका निवडणुकिनंतर निशिकांत पाटील यांनी भाजपात प्रवेश केला. भाजपने इस्लामपूर विधानसभा मतदार संघाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली. बुथ रचना, गाव तिथे भाजपा शाखा यासह भाजपाची रचना त्यांनी अधिक मजबुत केली. माजी मंत्री सदाभाऊ खोत, विकास आघाडीचे अध्यक्ष विक्रम पाटील, गौरव नायकवडी, राहुल महाडिक, सम्राट माहडिक यांचे निशिकांत पाटील यांच्याशी राजकिय दृष्ट्या सख्य नसल्याचे अनेकदा दिसून आले आहे. या उलट शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आनंदराव पवार हे मात्र यापासून अलिप्त दिसत आहेत. राष्ट्रवादी ही निशिकांत पाटील यांना घेरण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे निशिकांत पाटील यांना पक्षातील अंतर्गत व राष्ट्रवादी बरोबर संघर्ष करावा लागत आहे. तरी इस्लामपूर विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी विरोधात एकसंघ मोट बांधण्यासाठी भाजपाचे वरिष्ठ नेते कधी मुहूर्त पाहणार याकडे सर्वसामान्य भाजपा कार्यकत्यांचे लक्ष लागले आहेत.
इस्लामपूर मतदार संघात कमळ फुलणे शक्य
सन 2019 ची विधानसभा निवडणूक पाहता आ. जयंत पाटील यांना 1,15,563, निशिकांत पाटील यांना 43,394 गौरव नायकवडी यांना 35,668 मते मिळाली होती. या निवडणुकीत आ. जयंत पाटील यांच्या विरोधात 83,256 मतदारांनी आपले मत नोंदविले आहे. यावरून 32,307 मतांची आघाडी जयंत पाटील यांना मिळाल्याचे दिसून येत आहे. विरोधकांतील फुट ही जयंत पाटील यांचा विजय सुखर करत आहे. इस्लामपूर मतदार संघात परिवर्तन घडविण्यासाठी विरोधकांची एकसंघ मुठ बांधणे गरजेचे आहे. यासाठी भाजपच्या वरिष्ठांनी लक्ष घातल्यास निश्‍चितपणे या मतदारसंघात कमळ फुलणे शक्य आहे.

COMMENTS