करुणा मुंडे राजकारणात उतरून धनंजय मुंडेंविरोधात लढणार…; नगरला केली शिवशक्ती सेना पक्षाची घोषणा

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

करुणा मुंडे राजकारणात उतरून धनंजय मुंडेंविरोधात लढणार…; नगरला केली शिवशक्ती सेना पक्षाची घोषणा

अहमदनगर/प्रतिनिधी : राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या पत्नी करुणा धनंजय मुंडे यांनी राजकारणात उतरण्याचा निर्णय घेतला असून, थेट पती धन

पाण्यातून शाळेत जाण्याची जीवघेणी, चिमकुल्याची वाट
हेल्पिंग हॅण्ड्सचे भैय्या बॉक्सर यांचा महात्मा गांधी मानवता पुरस्काराने गौरव
कोपरगाव-शिर्डीत एस.टी कर्मचाऱ्यांचे आंदोलन चिघळले (Video)

अहमदनगर/प्रतिनिधी : राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या पत्नी करुणा धनंजय मुंडे यांनी राजकारणात उतरण्याचा निर्णय घेतला असून, थेट पती धनंजय मुंडेंविरोधात परळीतून निवडणूक लढवण्याचाही मनोदय जाहीर केला आहे. यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.
करुणा मुंडे यांनी गुरुवारी नगरमध्ये नव्या शिवशक्ती सेना पक्ष स्थापनेची घोषणा केली. नव्या वर्षात जानेवारी अखेरीस नगरमध्येच 1 लाखाचा मेळावा घेऊन पक्षाचे चिन्ह व झेंडा जाहीर करणार असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, मी नेतृत्व करणार आहे, पण सामाजिक काम करणारांना नेते करणार आहे, मात्र, गरज पडली व वेळ आली तर मी मैदानात उतरेल व परळीमध्ये धनंजय मुंडेंविरोधात निवडणूक लढवेल, असेही त्यांनी जाहीर केले. मंत्री धनंजय मुंडे व करुणा मुंडे यांच्यातील कौटुंबिक बाब न्यायप्रविष्ट आहे. परळीत वा बीडमध्ये जाण्यास त्यांना निर्बंध आहेत. या पार्श्‍वभूमीवर गुरुवारी त्यांनी नगरमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी भारत भोसले, मुरलीधर धात्रक, रवी गवळी, दादासाहेब जावळे, भाऊसाहेब शिंदे आदी उपस्थित होते.
कौटुंबिक जीवनात 25 वर्षे मी खूप काही सहन केले आहे, माझ्या बहिणीबद्दलही सहन केले आहे. पण मला कारागृहात जावे लागल्याने तसेच जीवनज्योती सामाजिक सेवा संस्थेच्या माध्यमातून सामाजिक काम करताना महाराष्ट्रात वाढलेल्या भ्रष्टाचाराचा कोठेही अंत दिसत नाही. त्यामुळे भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्र करण्यासाठी शिवशक्ती सेना या पक्षाच्या माध्यमातून सामाजिक काम करणारांना ताकद देणार आहे. करुणा मुंडे आगे बढो..हम तुम्हारे साथ है…अशा घोषणेऐवजी कार्यकर्ताओ आगे बढो..करुणा धनंजय मुंडे तुम्हारे साथ है…अशी माझ्या नव्या पक्षाची घोषणा असणार आहे, असेही करुणा मुंडे यांनी यावेळी आवर्जून स्पष्ट केले.

भ्रष्टाचार मुक्तीचेच ध्येय
राज्यामध्ये सर्वकाही अंधार आहे, भ्रष्टाचार चालू, महिलांवर अत्याचार चालू आहे. हे सर्व दूर करण्यासाठी व आता महाराष्ट्र भ्रष्टाचार मुक्त करण्यासाठी आपण गोरगरीबांच्या पाठीशी उभे राहून त्यांना ताकद देण्याचा निर्णय घेतला असून यासाठी शिवशक्ती सेना पक्षाची स्थापना करण्यात आली असल्याची घोषणा करुणा धनंजय मुंडे यांनी पत्रकारांशी बोलताना केली. करुणा मुंडे म्हणाल्या की आज सर्वत्र भ्रष्टाचार फोफावत चाललेला आहे, कोट्यवधी रुपयांचे घोटाळे घातलेले आहेत. मी गेल्या पंचवीस वर्षापासून राजकारण बघत आहे. आज मी एका मंत्र्याची पत्नी आहे. मात्र, माझ्यावरसुद्धा मोठे संकट उभे राहिले. मला जेलमध्ये घातले गेले व माझ्यावर आज अनेक निर्बंध लादले गेले. मी जे काही पंचवीस वर्षांमध्ये पाहिले आहे, ते पाहिल्यानंतर आपण आता समाजासाठी देणे लागतो या भावनेतून मी आता समाजसेवेच्या माध्यमातून काम करण्याचा वसा घेतेला आहे व एक वर्षापासून त्याची अंमलबजावणी सुरू केली आहे. ज्या स्वयंसेवी संस्था आहेत व जे सामाजिक काम करतात, त्यांनी सुद्धा आता माझ्या बरोबरीने काम करावे, असे मी आवाहन करत आहे, असे सांगून त्या म्हणाल्या, आता जो काही भ्रष्टाचार सर्वत्र होत चालला आहे, त्याकरता आपल्याला भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र घडवण्यासाठी काम करायचे आहे. त्या उद्देशाने मी शिवशक्ती सेना पक्षाची स्थापना करणार असल्याचेही करुणा मुंडे यांनी यावेळी सांगितले.

जानेवारीत मेळावा
आज सर्वच पक्ष वेगळ्या माध्यमातून बनवले गेलेले आहेत, कोट्यवधी रुपयांचे घोटाळे सुद्धा अनेक जण करत आहेत म्हणून आपल्याला आता स्वच्छ राजकारण व भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र करायचे आहे, हीच संकल्पना घेऊन मी आता हे कार्य पुढे चालू ठेवणार आहे. 30 जानेवारीपर्यंत पक्षाची स्थापना करण्यासाठी मी राज्यभर दौरे करणार आहेत व येत्या महिन्याभरामध्ये पक्षाची स्थापना केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. याचे मुख्य कार्यालय मुंबई येथे राहणार असून दुसरे कार्यालय नगर आणि संगमनेर येथे राहणार असल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले. त्या पुढे म्हणाल्या की, आज येथील सत्ताधारी असो किंवा अन्य कोणताही पक्ष असो, त्यांना सामान्य जनतेशी काही देणे-घेणे राहिलेले नाही. आज शेतकरी आत्महत्या करत आहे, त्याबाबत कोणी बोलायला तयार नाही, एसटी कर्मचार्‍यांचा संप सुरू आहे व यामध्ये सरकार लक्ष देत नाही. ज्या भारतीय जनता पार्टी यांनी पहिल्यांदाच या संपाला पाठिंबा दिला, नंतर तेथे या संपातून पळून गेले, असा आरोपही मुंडे यांनी यावेळी केला. आज या संपामध्ये अनेक जण शहीद झाले आहे, त्यांचे प्रपंच उदध्वस्त झाले आहे तरी सरकारला जाग आली नाही, असा आरोपही त्यांनी यावेळी केला. मात्र, आपण त्यांच्याशी संपर्कात असून त्यांच्या पाठीशी ठामपणे असून आपण त्यांच्याबरोबर राहणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

स्वच्छ चारित्र्य हा निकष
मी एका मंत्र्याची बायको आहे. मात्र, ज्याचे स्वच्छ चारित्र्य व चांगले विचार असेल, तो आमच्याबरोबर राहील, त्यालाच माझ्या पक्षात संधी देणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. आगामी काळामध्ये ज्या जागेवर निवडणुका होतील, त्या निवडणुका माझ्या पक्षाकडून जो इच्छुक असेल त्याचे सुद्धा आम्ही चारित्र्य तपासूनच त्याला उमेदवारी देणार असल्याचेही मुंडे यांनी यावेळी सांगितले.

अण्णांचे आशीर्वाद घेणार
भ्रष्टाचार मुक्तीसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी राज्यात व देशात काम केलेले आहे, त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून मी आगामी काळामध्ये वाटचाल करणार आहे. मी अण्णांना भेटण्यासाठी चार वेळा गेले होते पण, अण्णांनी मला भेट दिली नाही व मला भेटले नाही. बहुदा यामागे राजकीय षडयंत्र असावे असा संशय सुद्धा त्यांनी व्यक्त केला. मी मंत्री धनंजय मुंडे यांची पत्नी असल्यामुळे कौटुंबिक विषय असेल म्हणून मला भेटू दिले नसावे. त्यामुळे मी आगामी काळामध्ये अण्णांची भेट घेऊन मी माझ्या कार्यपद्धतीविषयी तसेच भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्र अभियान व नवा शिवशक्ती सेना पक्षाचा उद्देश व काम, यावर निश्‍चितपणे त्यांना सांगणार असल्याचे व त्यांचे आशीर्वाद आणि मार्गदर्शन घेणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. दरम्यान, माझ्या शिवशक्ती सेना या पक्षाचे काम सामान्य जनतेकडून मिळणार्‍या मदतीवर चालणार असून, या पक्षासमवेत काम करू इच्छिणार्‍या सामाजिक कार्यकर्त्यांनी 7498277777 किंवा 9009575318 यावर संपर्काचे आवाहनही त्यांनी केले.

उमेदवारांचे प्रतिज्ञा पत्र घेणार
शिवशक्ती सेना हा पक्ष स्थापन केल्यानंतर माझ्या पक्षाकडून जो कोणी उमेदवारी मागेल त्याला उमेदवारी देणार आहे. निवडून आल्यानंतर त्या पदावर असेपर्यंत त्याला कोणत्याही प्रकारची प्रॉपर्टी घेता येणार नाही अशी माझी भूमिका असेल व त्याला त्यासंदर्भातले प्रतिज्ञा पत्र लिहून द्यावे लागेल, असेही त्या म्हणाल्या.

अनेक मंत्र्यांच्या पत्नी संपर्कात
राज्यामध्ये अनेक मंत्र्यांच्या पत्नी त्रासलेल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील एका मंत्र्याच्या पत्नीने माझ्याशी थेट संवाद साधून मला साथ देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र मी त्या मंत्र्यांच्या पत्नीचे आता नाव सांगू शकत नाही, असेही मुंडे यांनी यावेळी सांगितले

COMMENTS