इस्लामपूर / प्रतिनिधी : कामेरी (ता. वाळवा) येथील विश्वशांती व्यायाम मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या प्रो. कब्बडी स्पर्धेत शाहू क्रीडा मंडळ सडोली
इस्लामपूर / प्रतिनिधी : कामेरी (ता. वाळवा) येथील विश्वशांती व्यायाम मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या प्रो. कब्बडी स्पर्धेत शाहू क्रीडा मंडळ सडोली, जि. कोल्हापूर या संघाने जय हनुमान क्रीडा मंडळ बाचणी संघाचा 6 गुणांनी पराभव करून विश्वशांती चषक व रोख 25 हजार रुपयांचे बक्षीस मिळवले. बाचणी संघाला दुसरा क्रमांक मिळाला. त्यांना 20 हजार रुपये व चषक बक्षीस देण्यात आले. मावळा सडोली संघाने 3 रा तर राजाराम बापू व्यायाम मंडळ कासेगाव संघाने 4 था क्रमांक मिळविला. त्यांना अनुक्रमे 15 हजार व 10 हजार रुपयांचे बक्षीस देण्यात आले.
त्याअगोदर जय हनुमान बाचणी संघाने राजारामबापू व्यायाम मंडळ कासेगाव संघाचा 18 गुणांनी व शाहू सडोली संघाने चुरशीच्या लढतीत मावळा सडोली, संघावर अवघ्या 2 गुणांनी विजय मिळवून अंतिम फेरीत प्रवेश केला होता. इस्लामपूर व्यायाम मंडळ, जयंत स्पोर्ट्स, इस्लामपूर, तरुण मराठा सांगलीवाडी व शिवमुद्रा कौलव संघ उपांत्य पूर्व फेरीत पराभूत झाले. या स्पर्धेतील सर्वात चुरशीचा सामना शाहू सडोली विरुध्द शिवमुद्रा कौलव यांच्यात झाला निर्धारित वेळेत दोन्ही संघांनी प्रत्येकी 21 गुण केल्याने सामना बरोबरीत राहिला. त्यानंतर प्रत्येकी पाच रेड देण्यात आल्या. सडोली संघाने कौलव संघाचा 3 गुणांनी पराभव करून शाहू सडोली उपांत्य फेरी गाठली होती.
या स्पर्धेतील आदर्श संघ म्हणून शिवमुद्रा कौलव संघाची निवड करण्यात आली त्याला 5 हजार, स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडू म्हणून रोहित साठे शाहू सडोली यांना तीन हजार रुपयांचे बक्षीस देण्यात आले. अंतिम सामन्यात वैभव वाघमोडे उत्कृष्ट खेळाडू ठरला तर सुजित पाटील उत्कृष्ट चढाई, सौरभ खोत उत्कृष्ट पकड यासाठीची बक्षिसे देण्यात आली.
स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ ना. जयंत पाटील व शिराळा विधानसभा मतदार संघाचे आ. मानसिंगराव नाईक यांच्या हस्ते झाला. या स्पर्धेत विश्वशांती व्यायाम मंडळाचे अध्यक्ष नंदूकाका पाटील, उपाध्यक्ष अशोक कुंभार यांच्यासह विकास पाटील, राजाराम पाटील, जयराज पाटील, महेश पाटील, गणेश पाटील, रणजीत इनामदार व अन्य खेळाडूंनी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. कामेरी येथील विश्वशांती व्यायाम मंडळाच्या वतीने बांधण्यात येणार्या प्रो कबड्डी इन डोअर मैदानासाठी आ. मानसिंगराव नाईक यांनी 20 लाख रुपयांचा निधी मिळवून देण्याचे आश्वासन यावेळी दिले.
COMMENTS