देवळाली प्रवरा : राहुरी येथील दिवाणी व फौजदारी न्यायालय परिसरातील दोन न्यायाधीशांचे बंगले अज्ञात चोरट्यांनी फोडले असून, या चोरीत नेमका किती मुद्द
देवळाली प्रवरा : राहुरी येथील दिवाणी व फौजदारी न्यायालय परिसरातील दोन न्यायाधीशांचे बंगले अज्ञात चोरट्यांनी फोडले असून, या चोरीत नेमका किती मुद्देमाल गेला आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी या संदर्भात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,दिवाणी न्यायाधीश अनुपमा पारशेट्टी आणि सह दिवाणी न्यायाधीश पंकज पाटील यांचे बंगले फोडल्याचे रविवारी सकाळी उघडकीस आले. राहुरी न्यायालयाच्या पाठीमागे न्यायाधीशांच्या निवासासाठी स्वतंत्र व्यवस्था असून, त्यापैकी दोन बंगल्यांवर ही चोरी झाल्याचे समोर आले आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. श्वानपथक आणि ठसेतज्ज्ञ पथकास नगर येथून पाचारण करण्यात आले. मात्र श्वानपथकाला चोरट्यांचा माग घेण्यात यश आले नाही. त्यामुळे चोरटे कोणत्या मार्गाने आले आणि पळून गेले याचा शोध लागलेला नाही.
पत्रकारांनी घटनास्थळी छायाचित्रण करण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी परवानगी दिली नाही. त्यामुळे या घटनेचे दृश्य दस्तऐवजीकरण होऊ शकले नाही.
दरम्यान, स्थानिक नागरिकांच्या मते राहुरीत पोलिसांची रात्रीची गस्त केवळ कागदावरच चालते, प्रत्यक्षात ती होत नसल्याच्या तक्रारी गेल्या काही महिन्यांपासून केल्या जात आहेत. न्यायाधीशांचे बंगले फोडले जाणे हे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहे.
पोलिसांनी प्राथमिक चौकशीत “कोणताही मौल्यवान ऐवज चोरीला गेला नाही” असा खुलासा केला असला तरी, गुन्ह्याचे तपशील माध्यमांसमोर न आणणे यावरून अनेक शंका उपस्थित होत आहेत. राहुरी तालुक्यात कायदा-सुव्यवस्थेची स्थिती ढासळत असून पोलिसांचा धाक नागरिकांमध्ये उरलेला नाही, अशी चर्चा सुरु आहे.

COMMENTS