इस्लामपूर / प्रतिनिधी : इस्लामपूर पालिकेची निवडणुक अवघ्या तीन महिन्यांवर येऊन ठेपल्याने जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी पालिकेच्या कारभारात लक्ष
इस्लामपूर / प्रतिनिधी : इस्लामपूर पालिकेची निवडणुक अवघ्या तीन महिन्यांवर येऊन ठेपल्याने जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी पालिकेच्या कारभारात लक्ष घातले आहे .शहरातील राष्ट्रवादीचे स्थानिक पदाधिकारी व नेते यांच्यातील गटबाजीमुळे शहरवासीयांचे प्रश्न मंत्री पाटील यांच्याकडे योग्यपणे पोचवले जात नाहीत. यामुळेच मंत्री पाटील यांनी प्रभाग बैठका घेतल्या आहेत. शहरातील जनतेचे प्रश्न समजून घेऊन ते सोडवण्यासाठी एक स्वीय सहाय्यक राष्ट्रवादी कार्यालयात नेमावा अशी मागणी नागरिकांच्यातून होत आहे .
इस्लामपूर पालिकेत राष्ट्रवादीची एकहाती सत्ता नाही मात्र राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर शहरातील राजकीय समीकरणे बदलण्यास सुरुवात झाली आहे. इस्लामपूर पालिकेत सत्ता आणण्यासाठी राष्ट्रवादीच्या पदाधिकारी व नगरसेवकांनी आक्रमक होण्याची गरज असताना स्थानिक पातळीवरील नेत्यांमधील गटबाजीच्या राजकारणामुळे सर्वजण एका छताखाली येत नाहीत. त्यामुळे शहरातील नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी मंत्री पाटील यांनी स्वतः स्वीय सहाय्यक नेमावा अशी मागणी नागरिकाच्यातून होत आहे. राष्ट्रवादी कार्यालयात स्वीय सहाय्यक उपस्थित असल्यास त्यांच्या मार्फत शहरातील नागरिकांचे प्रश्न, निवेदने समजावून घेण्यास मदत होईल असे शहरातील सामान्य जनतेला वाटत आहे.
पालिकेतील राष्ट्रवादी विरोधात भाजप, शिवसेना, काँग्रेस, मनसे, स्वाभिमानी शेतकरी संघटना, शहर संघर्ष समिती असे गट विकास आघाडीच्या माध्यमातून एकत्रित आहेत. माजी नगराध्यक्ष दिवंगत विजयभाऊ पाटील यांच्या निधनानंतर पालिकेतील राष्ट्रवादीला म्हणावा असा चेहरा मिळालेला नाही. त्यामुळे नागरिकांनी आपले प्रश्न नेमके कोणासमोर मांडायचे. हा यक्षप्रश्न निर्माण झाला आहे. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेतील नागरिकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी स्वतःचे स्वीय सहाय्यक यांची नेमणूक केली आहे. यांच्या माध्यमातून अजित पवार हे नागरिकांचे प्रश्न जाणून घेऊन त्यांचा निपटारा करीत आहेत, असाच एक स्वीय सहाय्यक मंत्री जयंत पाटील यांनी इस्लामपूर शहर राष्ट्रवादी कार्यालयात नेमावा जेणेकरून नागरिकांचे प्रश्न मार्गी लावण्यास मदत होईल, अशी मागणी नागरिकांतून जोर धरू लागली आहे.
COMMENTS