ओबीसींच्या राजकीय आरक्षणाला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत बाद करण्यात आल्यावरही सत्ताधारी आणि विरोधी पक्ष एकमेकांना दूषणं देण्यात धन्यता मान
ओबीसींच्या राजकीय आरक्षणाला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत बाद करण्यात आल्यावरही सत्ताधारी आणि विरोधी पक्ष एकमेकांना दूषणं देण्यात धन्यता मानत आहेत. एक प्रकारे हा ओबीसी आरक्षणाला कायमचा खो घालण्याचा प्रकार असून सत्ताधारी जातवर्ग हा खेळ अगदी ओबीसींच्या विरोधातील चोख भूमिका घेऊन बजावतो आहे. न्यायालयाने निर्णय दिला असल्यामुळे सर्वच पक्ष हतबल होण्याचे नाटक व्यवस्थित वटवताहेत. अर्थात, त्यांचे हे वर्तन ओबीसी समाजाला अनभिज्ञ नक्कीच नाही; परंतु, काहींना स्वतःच्या अज्ञानात सुख वाटते. तसं राज्याच्या सत्ताधारी आणि विरोधी पक्ष असणाऱ्या सत्ताधारी जातवर्गाला ओबीसींना यातले काही कळत नाही, असे वाटत असते. त्यांच्या अज्ञानाचे सुख त्यांनी येथेच्छ उपभोगावे, त्यासंदर्भात आम्हाला काहीही म्हणायचे नाही! मात्र, आज आमचा आक्षेप आहे तोच मुळी जयंत पाटील यांच्या वक्तव्यावर. त्यांनी ओबीसी आरक्षणाला केंद्र सरकारचा विरोध असल्यानेच ते राज्याला इम्पेरिकल डाटा देण्यास तयार नसल्याचे म्हटले आहे. त्यांचे हे म्हणणे आपण एक वेळा सत्य आहे, असे मानूया! कारण महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांसह ओबीसी कार्यकर्त्यांनी देखील या बाबीवर प्रकाश टाकला आहे. आता तीच रि जयंत पाटील यांनी ओढली आहे. आम्ही जयंत पाटील यांना आठवण करून देऊ इच्छितो की, जयंत पाटील हे महाराष्ट्रात अनेक उपद्व्याप घडवून आणणाऱ्या मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी भिडे यांचे शिष्य आहेत. त्यांचे हे गुरू देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेही तथाकथित का असेना पण गुरु आहेत, असे आमचे प्राथमिक ज्ञान आहे आणि ते विश्वासार्ह आहे. देशाच्या जनतेने मोदी-भिडे चा एकाच ठिकाणी भेट झाल्याचा फोटो सगळ्या देशाने पाहिला आहे. जयंत पाटील यांना त्या फोटोच्या आधारावर आम्हाला एवढंच सुचवायचं आहे की, राजकीय सत्ताकारणात काही गोष्टी संबंधातून करायच्या असतात. मोदींचे ते गुरूबंधू एका अर्थाने आहेत. पण ओबीसी आरक्षण मिळवण्यासाठी त्यांनी त्या पध्दतीने काही प्रयत्न केले का? हा खरा आमचा प्रश्न आहे. आता जयंत पाटील हे आरोप करताय की, केंद्र सरकार हे ओबीसी विरोधात भूमिका घेत आहेत. आम्ही तर कितीतरी वर्षांपासून म्हणतोय की, संघ-भाजप हे तत्वतः ओबीसी विरोधात असल्याने ते ओबीसी हिताचं काम करतील यावर आमचा विश्वास नाही. गेली पस्तीस वर्षे आम्ही हे सांगतो आहोत. ओबीसी म्हणून आमची भूमिका ठोस असताना जयंत पाटील यांनी वेगळं काय सांगितलं? खरेतर, महाराष्ट्रात ब्राम्हण-मराठा यांची अघोषित युती आहे. ती सांस्कृतिक आणि समाजकारणात मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी भिडे यांच्या प्रयोगातून जशी दिसते तशी राजकीयदृष्ट्या ती कोणत्याही पक्ष आघाडींचे सरकार असल्यावरही दिसते. त्यामुळेच पुण्याच्या खोले बाईंनी आपल्या मोलकरीण मराठा बाईला शूद्र ठरवून त्या बाईच्या हातचा स्वयंपाक नाकारला होता. इतकच नव्हे, तर आम्हाला अपवित्र किंवा बाटवल्याचाही जाहीर आरोप केला होता! तरीही, मराठा समाज सामाजिक पातळीवर चवताळून उठला नव्हता! याचे मुख्य कारण मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी भिडे सारख्या वैदिक ब्राह्मणांनी मराठा तरूणांचे मेंदू आपल्या वशीत घेतले होते. अशावेळी जयंत पाटील यांनी कुलकर्णी उर्फ भिडे ची पाठराखणच केल्याचे महाराष्ट्राने पाहिले होते. त्यामुळे, जयंत पाटील हे सामाजिक न्यायाच्या भूमिकेत ओबीसी आरक्षणाचा मुद्दा मांडताहेत, असं अजिबात म्हणता येणार नाही! याउलट, जयंत पाटील हे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसींनी त्यांच्या पक्षाला भरभरून मतदान करावं अशी धूर्त अपेक्षा बाळगून आहेत. आता ओबीसी समाज इतका अज्ञानी राहीला नाही की, मराठा-ब्राह्मण या सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय युतीला भरभरून मतदान करेल! यानिमित्ताने, आम्ही एवढंच म्हणतो की, आता आमचे प्रश्न आम्ही आमच्या भिस्तीवर सोडवू! प्रसंगी संघर्ष करून अथवा राजकीय सजगता ठेवून. पण, तुम्ही ओबीसी आरक्षणावर जो खो-खो चालवला तो मात्र थांबवा!
COMMENTS