मुंबई ः मराठा आरक्षणाचा लढा आणखीनच तीव्र होतांना दिसून येत आहे, मनोज जरांगे यांनी 20 जानेवारीपासून आझाद मैदानावर आमरण उपोषण करण्याचा इशारा दिल्या
मुंबई ः मराठा आरक्षणाचा लढा आणखीनच तीव्र होतांना दिसून येत आहे, मनोज जरांगे यांनी 20 जानेवारीपासून आझाद मैदानावर आमरण उपोषण करण्याचा इशारा दिल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारची आरक्षणाप्रती असलेली सकारात्मकता पाहता आमरण उपोषणाचा निर्णय घेऊ नये, असे म्हटले आहे. तसेच ओबीसी समाजावर अन्याय न करता मराठा समाजाला आरक्षण देण्याचे प्रयत्न सुरू असल्याचेही फडणवीस यांनी सांगितले.
यासंदर्भात पुढे बोलतांना फडणवीस म्हणाले की, मराठा आरक्षणासंदर्भात सरकार सकारात्मकतेने काम करत आहे. मुख्यमंत्री शिंदे स्वतः याप्रकरणी जातीने लक्ष देत आहेत. राज्य मागासवर्गीय आयोगाने वेगाने काम सुरु केले. तर शिंदे समितीचा दुसरा अहवाल आला असून तिसरा अहवालही येणे अपेक्षित आहे. त्यामुळे राज्य सरकारची सकारात्मकता पाहता जरांगे यांनीही असा निर्णय घेऊ नये असे फडणवीस म्हणाले. ओबीसी समाजावर अन्याय न करता मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी काम सुरू आहे. यासाठी फेब्रुवारीमध्ये विशेष अधिवेश बोलावण्यात आले असून यामध्ये तोडगा काढणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यापूर्वीच सांगितले. याप्रकरणी डेडलाइननुसार काम सुरू आहे. त्यामुळे अशा प्रकारे उपोषण करणे योग्य नाही असे भाष्य फडणवीस यांनी केले आहे. दरम्यान खासदार संजय राऊतांच्या आरोपांवर बोलतांना फडणवीस म्हणाले की, संजय राऊत रोज वेगवेगळे आरोप करतात. त्यांच्या आरोपांना उत्तर देणे मी आता बंद केले आहे. त्यांच्या आरोपांना देण्याइतकी माझी पातळी खाली गेलेली नाही, असा पलटवार फडणवीस यांनी केला आहे. सलीम कुत्ता सोबतची पार्टी भाजपच्या पदाधिकार्याने आयोजित केली होती. व्यंकटेश मोरे असे त्याचे नाव आहे. आजही मोरे हा भाजपचा पदाधिकारी आहे. आता चौकशी करा असे म्हणत राऊत यांनी व्यंकटेश मोरेचे उपमुख्यमंत्री फडणवीसांसोबतचे फोटोही दाखवले होते. यावर फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले आहे. तर इंडिया आघाडी ज्या प्रकारचे राजकारण करत आहे ते कमकुवत असल्याचे म्हटले आहे.
इंडिया आघाडीतील लोक स्वार्थासाठी एकत्र आलेले- इंडिया आघाडी ही आघाडी नाही. मोदींमुळे आपले भ्रष्टाराचे दुकान बंद होईल अशी ज्यांना भीती वाटते ते लोक या आघडीत एकत्र आले आहेत. स्वार्थासाठी एकत्र आलेले लोक स्वार्थासाठीच वेगळेही होतात’’ अशी टीका फडणवीस यांनी केली आहे. अयोध्येत 22 जानेवारी रोजी होणार्या सोहळ्याबाबत बोलतांना फडणवीस म्हणाले, राम लल्लाची प्राणप्रतिष्ठा झाल्यामुळे एका नवीन अध्यायाची सुरुवात होईल. 22 जानेवारीनंतर एक आत्मनिर्भर, स्वाभिमानी भारत पाहायला मिळेल’’ असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.
COMMENTS