कोपरगाव तालुका ः छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र, पराक्रम, शुरता, निर्णयक्षमता हे गुण सर्वांसाठीच प्रेरणादायी असून आजच्या धकाधकीच्या, ताणतणावाच्
कोपरगाव तालुका ः छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र, पराक्रम, शुरता, निर्णयक्षमता हे गुण सर्वांसाठीच प्रेरणादायी असून आजच्या धकाधकीच्या, ताणतणावाच्या, अनिश्चित काळातही आनंदी राहण्यासाठी सकारात्मक जीवनाचा आदर्श म्हणून शिवचरित्राचा अभ्यास व अनुकरण करणे अतिशय गरजेचे आहे असे उद्गार जळके, जि. जळगांव येथी ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज जळकेकर यांनी संवत्सर येथील कार्यक्रमात काढले.
गोदावरी खोरे नामदेवरावजी परजणे पाटील तालुका सहकारी दूध उत्पादक संघाचे संस्थापक दिवंगत नेते नामदेवराव परजणे पाटील (आण्णा) यांच्या 20 व्या पुण्यस्मरण सोहळ्यानिमित्त संवत्सर येथे आयोजित प्रवचनातून शिवचरित्र : प्रेरणादायी वाटचाल या विषयावर ह. भ. प. जळकेकर महाराज बोलत होते. ज्येष्ठ किर्तनकार ह.भ.प. उध्दवजी महाराज मंडलिक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सोहळ्यासाठी व्यासपीठावर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, पंचायत समितीचे माजी सदस्य कृष्णराव परजणे, ह. भ. प. मनसुख महाराज दहे, विनायक महाराज वाघ, सुभाष महाराज जगताप, महंत दामोदरबाबा महानुभाव, महंत नितीनबाबा महानुभाव यांची उपस्थिती होती. प्रारंभी स्व. नामदेवराव परजणे आण्णा यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तर गोदावरी खोरे सहकारी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे पाटील यांनी स्वागत व प्रास्तविक केले. महाराजांचे शौर्य आणि युध्दीमत्ता युगानुयुगे आपल्यासाठी निश्चितच प्रेरणादायी आहे. कल्पक प्रशासनाच्या आधारे जनसामांन्याचा कैवार आणि गुणवंतांचा आदर करीत शत्रू पक्षावर मात करुन मराठ्यांचे नांव जगाच्या इतिहासात अजरामर करुन ठेवणार्या छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र आजच्या समाजासाठी प्रेरणादायी वाटचाल असल्याचेही मार्गदर्शन ह. भ. प. जळकेकर महाराज यांनी केले. ज्येष्ठ किर्तनकार ह. भ. प. उध्दव महाराज मंडलिक यांनीही यावेळी मार्गदर्शन केले. सद्याच्या धावपळीच्या युगात परस्परांविषयीचा आदरभाव माणूस विसरत चालल्याने जिकडे तिकडे अराजकता वाढत आहे. अहंभाव दूर करण्यासाठी मनाची कवाडे उघडी करा. संस्काराने, विचारचे धन जोडता आले तर जीवन धन्य होईल. नामदेवराव परजणे आण्णांसारखी मोठ्या मनाची माणसे आजच्या पिढीला प्रेरणा देणारी आहेत. त्या प्रेरणेतून समाज घडावा, विश्वबंधुत्वाची भावना प्रत्येकांमध्ये निर्माण व्हावी अशी अपेक्षाही मंडलिक महाराज यांनी व्यक्त केली. जि. प. च्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील यांनी स्व. परजणे आण्णांच्या स्मृतींना उजाळा देताना मुलींच्या शिक्षणाविषयी त्यांना तळमळ होती. गोरगरीब मुली अनेक अडचणीमुळे शिक्षण घेवू शकत नाहीत याचे त्यांना नेहमीच दुःख वाटत होते. त्यांचे ते स्वप्न आज पूर्ण झालेले आहे. अशा शब्दात विखे यांनी परजणे आण्णा यांच्या स्मृतींना अभिवादन करून आभार व्यक्त केले. नामदेवराव परजणे पाटील यांच्या जीवन आणि कार्याची प्रेरणादायी वाटचाल या माहितीपटाच्या स्कॅनकोडचे अनावरण उध्दव महाराज व जळकेकर महाराज यांच्याहस्ते करण्यात आले. संवत्सर येथील नामदेवराव परजणे पाटील महाविद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांना नामदेवराव परजणे पाटील शिष्यवृत्तीचे धनादेश वितरीत करण्यात आले. कोपरगांव येथील महिला महाविद्यालयाच्या कुपासिंधू नियतकालिकेचे प्रकाशनही यावेळी करण्यात आले. तसेच संवत्सर येथील बाळासाहेब सहाणे टेलर यांच्यातर्फे कोपरगांव येथील श्री चक्रधर स्वामी विद्यालयातील विद्यार्थ्यांना गणवेशाचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांसह मोठा जनसमुदाय उपस्थित होता.
COMMENTS