नवी दिल्ली : मध्यपूर्वेतील वाढत्या तणावाचा परिणाम आता हवाई वाहतुकीवरही दिसू लागला आहे. देशातील प्रमुख विमान सेवा कंपनी इंडिगोने विमान तिकिटांवर अ

नवी दिल्ली : मध्यपूर्वेतील वाढत्या तणावाचा परिणाम आता हवाई वाहतुकीवरही दिसू लागला आहे. देशातील प्रमुख विमान सेवा कंपनी इंडिगोने विमान तिकिटांवर अतिरिक्त इंधन अधिभार लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीच्या घोषणेनुसार 14 मार्चपासून नवीन नियम लागू करण्यात येणार असून त्या तारखेनंतर केलेल्या सर्व तिकिट आरक्षणांवर अतिरिक्त शुल्क आकारले जाणार आहे. त्यामुळे विमानप्रवास करणार्या प्रवाशांना आता तिकिटांसोबत 425 रुपयांपासून ते 2300 रुपयांपर्यंत अधिक रक्कम भरावी लागू शकते.
कंपनीने स्पष्ट केले की, मध्यपूर्वेतील तणावामुळे विमान इंधनाच्या किमतींमध्ये मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे विमानसेवा चालवण्याचा खर्च वाढला असून त्याचा काही भाग प्रवाशांवर टाकणे अपरिहार्य ठरले आहे. देशांतर्गत आणि भारतीय उपखंडातील प्रवासासाठी सुमारे 425 रुपयांचा अधिभार आकारला जाणार आहे. मध्यपूर्वेकडे जाणार्या उड्डाणांसाठी हा अधिभार 900 रुपये असेल. दक्षिण-पूर्व आशिया, चीन, आफ्रिका आणि पश्चिम आशियाकडे जाणार्या प्रवासासाठी सुमारे 1800 रुपये अतिरिक्त शुल्क आकारले जाणार आहे. युरोपकडे जाणार्या प्रवासासाठी हे शुल्क 2300 रुपयांपर्यंत असणार आहे. विमान कंपन्यांच्या एकूण खर्चात विमान इंधनाचा मोठा वाटा असतो. अनेकदा हा हिस्सा एकूण परिचालन खर्चाच्या सुमारे चाळीस टक्क्यांपर्यंत पोहोचतो. अलीकडील घडामोडींमुळे जेट इंधनाच्या दरात मोठी वाढ झाल्याने विमान कंपन्यांवर आर्थिक दबाव वाढला आहे. तज्ज्ञांच्या मते, जर इंधनाच्या किमतींमध्ये वाढ कायम राहिली तर पुढील काळात विमानप्रवास आणखी महाग होण्याची शक्यता आहे. यापूर्वीही काही विमान कंपन्यांनी अशाच प्रकारे इंधन अधिभार लागू केला आहे. त्यामुळे वाढत्या इंधन दरांचा परिणाम आता हवाई प्रवासावर स्पष्टपणे दिसू लागला आहे.
विमान प्रवाशांवर वाढता खर्च
इंधनाच्या वाढत्या किमतींमुळे विमान तिकिटांवर अतिरिक्त अधिभार लागू करण्यात आला आहे. 14 मार्चपासून लागू होणार्या या निर्णयानुसार प्रवाशांना 425 ते 2300 रुपयांपर्यंत अतिरिक्त शुल्क भरावे लागू शकते. त्यामुळे देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय विमानप्रवास महाग होण्याची शक्यता आहे.

COMMENTS