Homeताज्या बातम्यादेश

तांदूळ उत्पादनात भारत जगात अव्वल

नवी दिल्ली ः भारताने कृषी क्षेत्रात आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठत तांदूळ उत्पादनात जगात अव्वल स्थान पटकावले आहे. आतापर्यंत या क्षेत्रात आघाडीवर अस

दोन तासाच्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान (Video)
कृषीसाठी 1.52 लाख कोटींची तरतूद
राज्यात रब्बी पेरण्या 101 टक्क्यांवर

नवी दिल्ली ः भारताने कृषी क्षेत्रात आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठत तांदूळ उत्पादनात जगात अव्वल स्थान पटकावले आहे. आतापर्यंत या क्षेत्रात आघाडीवर असलेल्या चीनला मागे टाकत भारताने जागतिक तांदूळ उत्पादक म्हणून स्वतःची ओळख अधिक ठळक केली आहे. सध्या देशाचे तांदूळ उत्पादन सुमारे 15 कोटी टनांच्या पुढे गेले असून, ही आकडेवारी भारताच्या कृषी क्षमतेचे आणि शेतकर्‍यांच्या कष्टाचे प्रतिबिंब मानली जात आहे.
काही दशकांपूर्वी अन्नधान्याच्या कमतरतेसाठी ओळखला जाणारा भारत आज अन्नसुरक्षेच्या बाबतीत सक्षम झाला असून, धान्यसाठ्याच्या बाबतीतही देश भक्कम स्थितीत आहे. वाढलेले उत्पादन केवळ देशांतर्गत गरजा भागवण्यासाठी उपयुक्त ठरत नाही, तर भारताला जागतिक अन्नपुरवठादाराची भूमिका बजावण्यासही सक्षम करते. तांदळाच्या निर्यातीमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पुरवठा वाढत असून, जागतिक स्तरावर अन्नधान्याच्या किमती स्थिर ठेवण्यास त्याचा सकारात्मक परिणाम होत आहे.
या यशामागे संशोधनाधिष्ठित शेती आणि नव्या तंत्रज्ञानाचा मोठा वाटा आहे. भारतीय कृषी संशोधन संस्थांनी विविध पिकांसाठी विकसित केलेले प्रगत वाण शेतकर्‍यांपर्यंत पोहोचू लागल्याने उत्पादनक्षमता वाढली आहे. अलीकडेच विविध प्रादेशिक पिकांसाठी मोठ्या संख्येने नवीन आणि सुधारित वाण सादर करण्यात आले असून, हे वाण अधिक उत्पादन देणारे, हवामान बदलांना तोंड देणारे आणि दर्जेदार उपज देणारे असल्याचे सांगितले जाते. उच्च उत्पादनक्षम बियाण्यांचा वापर, आधुनिक शेतीपद्धती आणि धोरणात्मक सरकारी पाठबळ यामुळे शेतकर्‍यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होत आहे. विशेष म्हणजे गेल्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणावर नवीन पिकांच्या वाणांना मान्यता देण्यात आली असून, यामुळे कृषी क्षेत्रात नव्या कृषीक्रांतीची पायाभरणी होत असल्याचे चित्र दिसते.
तांदूळ, गहू, कडधान्ये, तेलबिया तसेच इतर प्रमुख पिकांमध्ये झालेली ही प्रगती भारताला केवळ अन्नधान्य उत्पादनात आत्मनिर्भर करत नाही, तर जागतिक कृषी नकाशावर एक मजबूत आणि विश्‍वासार्ह अन्नपुरवठादार म्हणूनही उभे करते. शेतीतील संशोधन, नवकल्पना आणि शेतकर्‍यांपर्यंत तंत्रज्ञानाचा वेगवान प्रसार सुरू राहिल्यास, भारताची ही आघाडी भविष्यात अधिक मजबूत होईल, यात शंका नाही.

COMMENTS