मुंबई/प्रतिनिधी ः एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी एक देश एक निवडणूक विधेयक संसदेत मांडणार असून, ते मंजूर झाल्यानंतर काही दिवसांमध्येच मुदतपूर्व लोक
मुंबई/प्रतिनिधी ः एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी एक देश एक निवडणूक विधेयक संसदेत मांडणार असून, ते मंजूर झाल्यानंतर काही दिवसांमध्येच मुदतपूर्व लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका घेण्याची तयारी केंद्राची सुरू असतांना, इंडिया आघाडीमध्ये अजूनही चर्चाच सुरू असल्याचे दिसून येत आहे. इंडिया आघाडीची तिसरी बैठक मुंबईमध्ये सुरू आहे, मात्र या बैठकीत संयोजक पदावरून मतभेद होतांना दिसून येत आहे. त्यामुळे संयोजन पदाची घोषणा करणे इंडिया आघाडीकडून टाळण्यात आले. तसेच 13 सदस्यांची समन्वय समिती जाहीर करत इंडिया आघाडीने जुडेगा भारत, जितेगा इंडिया घोषवाक्य जाहीर केले आहे.
इंडिया आघाडीच्या संयोजक पदावरुन अडचण निर्माण होणार आहे. कारण, काँग्रेस मल्लिकार्जुन खरगे यांच्या नावावर आग्रही आहे. खरगे हे दलित चेहरा आहेत. त्यामुळे दलित मते आपल्याकडे ओढता येतील. तसेच त्यांचा राजकीय अनुभव मोठा आहे. त्यामुळे काँग्रेस त्यांच्या नावावर ठाम राहण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, काँग्रेसने संयोजक पद न घेता मोठे मन दाखवावे असे कम्युनिस्ट पार्टीसह इतर पक्षांची मागणी आहे. बैठकीमध्ये पंतप्रधान पदाचा चेहरा कोण हे ठरवले जाणार असल्याची शक्यता आहे. तसेच येत्या काळात संयोजक महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. खरगे संयोजक झाले तर दलित आपल्याकडे वळतील, या कारणासाठी काँग्रेस त्यांचे नाव पुढे करत आहे. भाजपकडून लक्ष्य करणे अवघड जाईल असा चेहर्याची निवड करण्यावर सर्व नेत्यांमध्ये एकमत आहेत. पण, तो नेता कोण असेल याबाबत निश्चिती नाही. सर्वमान्य चेहरा असावा यासाठी सर्व पक्ष प्रयत्नशील आहेत. याआधी आघाडीच्या तीन बैठका झाल्या. विरोधी पक्षांना एकत्र आणण्यासाठी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी प्रयत्न केले होते. त्यामुळे नितीश कुमार यांचीही संयोजकपदी निवड केली जाऊ शकते. नितीश कुमार यांनी कोणत्याही पदाची अपेक्षा नसल्याचे म्हटले असल्याने संभ्रम निर्माण झाला. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या नावाचाही विचार केला जाऊ शकतो. नेते बाहेर वेगळी प्रतिक्रिया देत असले तरी बैठकीमध्ये त्यांची वेगळी भूमिका असू शकते. त्यामुळे संयोजक पद नेमके कोण स्वीकारले किंवा कोणाच्या नावाला पसंती मिळेल हे पाहावे लागणार आहे. दरम्यान, आघाडीमध्ये संयोजक पदावरुन कोणताही वाद नाही. चर्चेनंतर संयोजक पदाची निवड केली जाईल, असे नेत्यांकडून सांगण्यात येत आहे.
तेरा सदस्यांची समन्वय समिती जाहीर – मुंबईत सुरू असलेल्या इंडिया आघाडीच्या तिसर्या बैठकीत 13 जणांची समन्वय समिती स्थापन करण्यात आली. तसेच, आघाडीचे घोषवाक्यही ठरवण्यात आले. या समितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार, शिवसेनेचे संजय राऊत, तृणमूल काँग्रेसचे अभिषेक बॅनर्जी, आम आदमी पक्षाचे राघव चढ्ढा, काँग्रेसचे केसी वेणुगोपाल, ओमर अब्दुल्ला, हेमंत सोरेन, एमके स्टॅलिन, मेहबुबा मुफ्ती, जावेद खान, लल्लन सिंह, डी. राजा आणि तेजस्वी यादव यांचा समावेश आहे. आघाडीच्या आजच्या बैठकीत एक घोषवाक्यही निश्चित करण्यात आले. या घोषवाक्यात भारत या शब्दाचा आवर्जून समावेश करण्यात आला आहे.
कपिल सिब्बल यांच्या उपस्थितीने काँगे्रस नेते अस्वस्थ – मुंबईतील इंडिया आघाडीच्या बैठकीचा शुक्रवारी दुसरा दिवस आहे. भाजप विरोधी पक्षांचे देशभरातील दिग्गज नेते बैठकीला हजर आहेत. काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेले नेते कपिल सिब्बल यांनी या परिषदेला हजेरी लावल्यामुळे काँगे्रसच्या नेत्यांमध्ये काही वेळ अस्वस्थता पसरली होती. कपिल सिब्बल यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत अखिलेश यादव यांच्या समाजवादी पक्षात प्रवेश केला आहे. काँग्रेसचा राजीनामा देताना त्यांनी राहुल गांधींच्या नेतृत्वावरही टीका केली होती.
COMMENTS