नगराध्यक्षांचा ‘शहरबंद’चा इशारा पाथर्डी : शहरातील साईनाथ विभागात राहणाऱ्या ६६ वर्षीय महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र मंगळवारी सायंकाळी अज्ञात चोरट्या

नगराध्यक्षांचा ‘शहरबंद’चा इशारा
पाथर्डी : शहरातील साईनाथ विभागात राहणाऱ्या ६६ वर्षीय महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र मंगळवारी सायंकाळी अज्ञात चोरट्यांनी ‘धूम स्टाईल’ हिसकावून नेल्याची घटना घडली. दोन दिवसांपूर्वीही शहरात अशाच प्रकारची घटना घडली होती. वारंवार मंगळसूत्र चोरी, पाकीटमारी, चोरी, छेडछाड व टवाळखोरांच्या प्रकारांत वाढ होत असल्याने शहरातील गुन्हेगारीला पोलिसांनी तातडीने आळा घालावा, अन्यथा शहरबंद आंदोलन करून पोलीस प्रशासनाला जाब विचारू, असा इशारा नगराध्यक्ष अभय आव्हाड यांनी दिला.
या पार्श्वभूमीवर नगराध्यक्ष आव्हाड यांच्यासह उपनगराध्यक्षा मंगलताई कोकाटे, नगरसेवक नंदकुमार शेळके, बंडूशेठ बोरुडे, बजरंग घोडके, सुभाष बोरुडे, डॉ. जगदीश मुने, नगरसेविका मनीषा उदमले, सचिन वायकर, सचिन भंडारी, राम भंडारी, मेघा चिंतामणी आदींनी पोलीस निरीक्षक पुजारी यांची भेट घेतली.
या भेटीदरम्यान पोलीस निरीक्षक पुजारी व नगराध्यक्ष आव्हाड यांच्यात शाब्दिक चकमक झाल्याचे सांगण्यात आले. “गुन्हेगारीला पाठीशी घाला,” असे फोन येतात, तसेच पोलीस कर्मचारी व अधिकाऱ्यांची कमतरता आहे, असे पुजारी यांनी स्पष्ट केल्यानंतर आव्हाड यांनी “आमदार राजळे किंवा आमच्यापैकी कोणी तुम्हाला गुन्हेगाराला पाठीशी घाला असे म्हटले आहे का?” असा सवाल उपस्थित केला.दरम्यान, मंगळसूत्र चोरीच्या तपासासाठी पोलिसांचे पथक तैनात करण्यात आले असून आरोपींचा लवकरच छडा लावू, असे आश्वासन पोलीस निरीक्षक पुजारी यांनी दिले.
यावेळी नगराध्यक्ष आव्हाड यांनी शाळा-महाविद्यालय परिसरातही परिस्थिती चिंताजनक असल्याचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की, अल्पवयीन मुलांच्या टोळ्या तयार होऊन विद्यार्थ्यांना एकटे गाठून मारहाण, मुलींची छेडछाड, धमक्या देणे तसेच जबरदस्तीने पैसे उकळण्याचे प्रकार घडत आहेत. जुन्या व नव्या बसस्थानक परिसरातही चोरट्यांचा उच्छाद सुरू असून प्रवाशांचे दागिने व मौल्यवान वस्तू चोरीला जात असल्याने तातडीने कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली.

COMMENTS