नाशिक- काही वर्षांपूर्वीपर्यंत वैद्यकीय अभ्यासक्रमांतील प्रवेश संख्या कमी होती. तसेच देशातील वैद्यकीय शिक्षण जगभरातील इतर देशांच्या तुलनेत मागे

नाशिक– काही वर्षांपूर्वीपर्यंत वैद्यकीय अभ्यासक्रमांतील प्रवेश संख्या कमी होती. तसेच देशातील वैद्यकीय शिक्षण जगभरातील इतर देशांच्या तुलनेत मागे होते. परंतु २०१८ मध्ये वैद्यकीय शिक्षणात अमुलाग्र बदल केलेले आहेत. काळानुरूप वैद्यकीय शिक्षणात सर्वसमावेशकता आणण्याचा प्रयत्न केला आहे. नियमित विषयांसोबतच दृष्टीकोन, नितीमुल्ये, संवाद कौशल्ये विकासावर भर दिला जात असल्याची माहिती ‘एसएमबीटी’च्या अधिष्ठाता डॉ.मीनल मोहगावकर यांनी दिली.
इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) नाशिक शाखेच्या वतीने शालिमार येथील आयएमए हॉल येथे रविवारी (११ फेब्रुवारी) आयोजित ‘ओमनीकॉन २०२४’ परीषदेप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी डॉ.वसंतराव गुप्ते ओरेशनअंतर्गत ‘वैद्यकीय शिक्षण आणि त्यात होत असलेले बदल’ या विषयी त्यांनी माहिती दिली. याप्रसंगी आयएमए नाशिकचे अध्यक्ष डॉ.विशाल गुंजाळ, सचिव डॉ.माधवी गोरे-मुठाळ, उपाध्यक्षा डॉ.मनिषा जगताप, परीषदेचे समन्वयक डॉ.पंकज भट, डॉ.सागर भालेराव, डॉ.किरण शिंदे, डॉ.प्रेरणा शिंदे आदी उपस्थित होते.
डॉ.मोहगावकर म्हणाल्या, नॅशनल मेडिकल कमिशनमार्फत नवनवीन नियमावली जाहीर केली जात असते. या पार्श्वभुमीवर वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत प्रत्येकाने वैद्यकीय सेवा देत असतांना या धोरणांविषयी अद्ययावत राहिले पाहिजे. वैद्यकीय शिक्षणात २०१८ सालपासून अमुलाग्र बदल झालेले आहेत. यामध्ये वैद्यकीयच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या अभ्यासक्रम कालावधीत ५ कुटुंब दत्तक घेतांना त्यांचे निरीक्षण करण्याचा समावेश आहे. फ्लिप क्लासरुमसोबत विविध नवीन संकल्पनांचा समावेश झालेला आहे. ७० टक्के अभ्यासक्रम वैद्यक शास्त्राविषयी असून, उर्वरित ३० टक्के अभ्यासक्रमात व्यवहार कौशल्ये, संवाद कौशल्ये व वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत राहातांना इतर आवश्यक कौशल्यांच्या विकासावर आधारित आहे.
उद्घाटन कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना आयएमए नाशिकचे अध्यक्ष डॉ.विशाल गुंजाळ म्हणाले, या परीषदेच्या नोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून ६०० डॉक्टरांनी सहभाग नोंदविला असल्याने खर्या अर्थाने ही परीषद यशस्वी झालेली आहे. सर्वसमावेशक परीषद असावी, या उद्देशाने सत्रांचे नियोजन केले असून, इतर शहरांतील तज्ज्ञांची व्याख्याने घेण्याऐवजी नाशिकच्या वैद्यकीय क्षेत्रातील दिग्गजांना प्राधान्य दिले. वर्षभरातील कामाचा आढावा घेतांना डॉ.गुंजाळ म्हणाले, आमच्या कार्यकारणीने वर्षभर दर महिन्याला विविध उपक्रम, कार्यक्रमांचे आयोजन केले. हॉस्पिटल रजिस्ट्रेशनचा विषय असेल किंवा इतर विविध विषयांचा पाठपुरावा केला.
उद्घाटन कार्यक्रमापूर्वी झालेल्या सत्रामध्ये डॉ. शिरीष देशपांडे यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले, डॉक्टरांनी सुसंवाद जोपासला पाहिजे. रुग्णावर उपचार करतांना त्यांचा पूर्वइतिहास समजून घेतल्यास उपचार करणे सोपे होते. अधिकाधिक पारदर्शक राहातांना लौकिक मिळविण्याचे अवाहन त्यांनी केले. यानंतर डॉ.विजय काकतकर यांचे सत्र झाले. रुग्णांवर यशस्वी उपचार केल्यावर ते आपला प्रसार करतात. त्यामुळे रुग्णांशी सुसंवाद ठेवावा. शस्त्रक्रिया करतांना पूर्व तयारी, शस्त्रक्रियादरम्यान घ्यायची काळजी तसेच शस्त्रक्रियेनंतर करायची निरीक्षणे याबद्दल त्यांनी सखोल मार्गदर्शन केले. आयव्हीएफ उपचारासदंर्भात डॉ.प्रियांका कासलीवाल यांनी माहिती दिली. ऑन्कॉलॉजी क्षेत्रातील आधुनिक उपचारांबाबत डॉ.भुषण नेमाडे यांनी माहिती दिली. तर डॉ.मिलिंद पिंपरीकर यांचे स्पोर्टस एज्युरी आणि फिटनेस या विषयावरील सत्र झाले. रक्तवाहिन्यांसंदर्भातील शस्त्रक्रियांतील तीन दशकांचा अनुभव याविषयावर डॉ.राजेंद्र नेहेते यांनी संवाद साधला. याशिवाय डॉक्टर आणि करप्रणालीसह अन्य विविध विषयांवरील सत्र घेण्यात आले. आभार आयएमए नाशिकच्या सचिव डॉ.माधवी गोरे-मुठाळ यांनी मानले. समिती सदस्य डॉ. अनुप भारती, डॉ नीलेश जेजुरकर यांच्यासह इतर सदस्यांनी परिश्रम घेतले.
COMMENTS