Homeताज्या बातम्यादेश

अयोध्येत श्रीराम मंदिराचे लोकार्पण

राम आग नव्हे, ऊर्जा ः पंतप्रधान मोदी

अयोध्या ः उत्तरप्रदेशातील अयोध्या नगरीमध्ये प्रभू श्रीराम मंदिराचा उद्घाटन सोहळा सोमवारी पार पडला. या ऐतिहासिक सोहळ्याचा जल्लोष अन् उत्साह सर्वत्

महासभा : संविधान सन्मान ची की वंचित आघाडीची ! 
अमली पदार्थांशी संबंधित 222 खटले विशेष न्यायालयासमोर प्रलंबित
गुन्हेगारीचा चढता आलेख !

अयोध्या ः उत्तरप्रदेशातील अयोध्या नगरीमध्ये प्रभू श्रीराम मंदिराचा उद्घाटन सोहळा सोमवारी पार पडला. या ऐतिहासिक सोहळ्याचा जल्लोष अन् उत्साह सर्वत्र पाहायला मिळत आहे. अवघ्या देश ’राममय’ झाला असून राजनामाच्या जयघोषाने आसमंत दुमदुमत आहे. रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासह सहा पाहुणे पूजेला उपस्थित होते. त्यांनी विधीप्रमाणे पूर्ण पूजा केली. हातात चांदीचे छत्र आणि लाल अंगवस्त्र घेऊन पंतप्रधान मोदी दुपारी 12.05 वाजता राम मंदिरात पोहोचले. यानंतर पंतप्रधानांनी कमळाचे फुल हातात घेऊन प्रार्थना केली. प्रभू रामाचे बालस्वरूप पाहिले. प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर रामलल्लाच्या डोळ्यांवरील पट्टी काढून टाकण्यात आली. गेल्या आठवड्यातच राम मंदिरात 51 इंची नवीन मूर्ती ठेवण्यात आली होती. शेवटी पंतप्रधानांनी रामलल्लाच्या चरणी साष्टांग दंडवत केला. रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर सर्व पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला. तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे खजिनदार गोविंद देव गिरी महाराज, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, सरसंघचालक मोहन भागवत आणि पंतप्रधान मोदी यांनी श्री रामजन्मभूमीवर लोकांना संबोधित केले.

अयोध्येतील श्रीराम मंदिर लोकापर्णानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, आमचे रामलल्ला आता तंबूत राहणार नाही. आमचे रामलल्ला आता दिव्य मंदिरात राहणार आहेत. राम मंदिराच्या उभारणीनंतर देशवासीयांमध्ये नवा उत्साह निर्माण झाला आहे. आज आपल्याला शतकानुशतकांचा वारसा मिळाला आहे, श्री रामाचे मंदिर मिळाले आहे. गुलामगिरीची मानसिकता मोडून उठणारे राष्ट्र नवा इतिहास घडवते. आजपासून हजार वर्षांनंतरही लोक या क्षणाबद्दल आणि तारखेबद्दल बोलतील. रामाचा किती आशीर्वाद आहे की आपण सर्वजण हा क्षण होताना पाहत आहोत. मी पवित्र अयोध्यापुरी आणि शरयू यांनाही नमन करतो. मला सध्या दिव्य वाटत असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले.

पुढे बोलतांना पंतप्रधान म्हणाले की, ते दैवी अनुभव आपल्या आजूबाजूलाही आहेत, त्यांना मी कृतज्ञतेने प्रणाम करतो. मी प्रभू रामांचीही माफी मागतो. आपल्या त्याग, तपश्‍चर्या आणि उपासनेत काहीतरी कमतरता असावी जेणेकरून आपण इतकी वर्षे ते करू शकलो नाही. आज ही उणीव पूर्ण झाली आहे. मला विश्‍वास आहे की प्रभू राम आपल्याला नक्कीच क्षमा करतील. आज प्रत्येक गावात कीर्तन-संकीर्तन होत आहे. स्वच्छता मोहीम सुरू आहे. देश दिवाळीच्या तयारीला लागला आहे. आज संध्याकाळी घरोघरी राम ज्योत प्रज्वलित केली जाईल. काल मी धनुषकोडीला होतो. राम सागर ओलांडण्यासाठी निघालो तेव्हा कालचक्र बदलले. आता कालचक्र पुन्हा बदलेल. अनुष्ठानाच्या वेळी सागर ते शरयू असा प्रवास करण्याची संधी मला लाभली. राम भारतीयांच्या मनात आहे. तुम्ही कोणाच्याही मनाला स्पर्श केलात तर तुम्हाला एकात्मता जाणवेल. देशाच्या कानाकोपर्‍यात रामायण ऐकण्याची संधी मिळाली असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले.

रामलल्लाला 5 किलो सोन्याच्या दागिन्यांचा साज – रामलल्लाची प्राण प्रतिष्ठा झाली आहे. सिंहासनावर विराजमान झाले आहेत. सोन्याच्या दागिन्यांनी सजलेल्या रामलल्लाला 5 वर्षांच्या बालरुपात पाहून लोक भावूक झाले आहेत.200 किलोंच्या या मूर्तीला 5 किलो सोन्याच्या दागिन्यांनी सजवण्यात आले आहे. प्रभू त्यांच्या नखापासून कपाळापर्यंत रत्नजडित आहेत. रामलल्लाच्या डोक्यावर सोन्याचा मुकुट आहे. त्याच्या काठाला मोत्यांची झालर लटकलेली आहे. कपाळाच्या मध्यभागी पांढर्‍या धातूपासून बनवलेला टिळा आहे. कानात सोन्याचे झुमके घातले. गळ्यात हिरव्या, पांढर्या आणि लाल रंगाच्या मोत्यांची दिव्य माळ आहे. त्याचे लटकन रामललाच्या नाभीपर्यंत लटकलेले आहे.

COMMENTS