Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पीआय दराडे नियंत्रण कक्षात, वंचितचा आत्मदहनाचा प्रयत्न

राहुरीत आज सर्वपक्षीय रस्ता रोको

देवळाली प्रवरा/प्रतिनिधी ः राहुरी तालुक्यातील ब्राह्मणी येथे झालेल्या धर्मांतर प्रकरणी राहुरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांची

आ. लंकेंची लिपिकास मारहाण..पण त्याचे घुमजाव…
अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू
कलियुगात पुण्यकर्मच महत्वाचे ः परमानंदगिरी महाराज

देवळाली प्रवरा/प्रतिनिधी ः राहुरी तालुक्यातील ब्राह्मणी येथे झालेल्या धर्मांतर प्रकरणी राहुरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांची शुक्रवारी तडकाफडकी बदली करण्यात आली व त्यांना नगरला पोलिस नियंत्रण कक्षात नियुक्ती दिली गेली आहे. विधानसभा अधिवेशनात गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी ही घोषणा केली. मात्र, या बदलीचा वंचित बहुजन आघाडीने निषेध केला व दराडेंची बदली रद्द होण्यासाठी राहुरी पोलिस ठाण्यासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला. दरम्यान, पोलिस निरीक्षक दराडेंवरील अन्याय दूर होण्यासाठी राहुरीत आज शनिवारी (24 डिसेंबर) सर्वपक्षीय रस्ता रोको आंदोलन केले जाणार आहे.

राहुरीचे पोलिस निरीक्षक दराडे यांचा राजकीय बळी घेऊन त्यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आल्याने या कर्तव्य दक्ष अधिकार्‍यांची बदली रद्द करण्यासाठी आज शनिवारी राहुरीत सर्व पक्षीय संघटनांचे रस्ता रोको आंदोलन होणार आहे. या आंदोलनात तालुक्यातील विद्यार्थिनी सहभागी होणार आहेत. दरम्यान, राहुरी पोलिस ठाण्यासमोर शुक्रवारी दुपारी 3 वाजता पिंटूनाना साळवे व सचिन साळवे या दोन तरुणांनी दराडेंच्या बदलीच्या निषेधार्थ स्वतःच्या अंगावर पेट्रोलजन्य पदार्थ ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे.

अधिवेशनात झाली घोषणा – राहुरी तालुक्यातील ब्राम्हणी येथील धर्मांतर प्रकरणी नागपूर अधिवेशनात आ.राम सातपुते यांनी लक्षवेधी मांडली. त्यावरील चर्चेदरम्यान ब्राह्मणी येथील धर्मांतर प्रकरणात तपासात हलगर्जीपणा व आरोपीला मदत केल्याचा पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांच्यावर आरोप करण्यात आला. त्यामुळे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडून 15 दिवसांत उच्च दर्जाच्या अधिकार्‍यांकडून पोलिस निरीक्षक दराडे यांची चौकशी करण्याचे व त्यांची तातडीने नगर नियंत्रण कक्षात बदलीचे आदेश देण्यात आले. हे वृत्त राहुरीत धडकताच विविध संघटनांनी दराडे राजकारणाचा बळी ठरले असल्याची चर्चा सुरु झाली व राहुरी पोलिस ठाण्यासमोर 3 वाजता पिंटूनाना साळवे व सचिन साळवे या दोन तरुणांनी बदलीच्या निषेधार्थ स्वतःच्या अंगावर पेट्रोलजन्य पदार्थ ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला. खमक्या अधिकार्‍यावर अन्याय झाल्याने शनिवार दि.24 रोजी राहुरी येथील नगर-मनमाड महामार्गावर सर्व पक्षीय संघटनाच्यावतीने रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले. या आंदोलनात तालुक्यातील विद्यार्थिनी सहभागी होणार आहेत.

दराडेंवर विविध आरोप – विधीमंडळात लक्षवेधीवर चर्चेत पोलिस निरीक्षक दराडे यांच्यावर विविध आरोप केले गेले. राहुरी तालुक्यात ब्राम्हणी गावात भाजीपाला विक्री करणार्‍या महिलेस धर्मांतर करण्यास भाग पाडून आरोपी कमलेशसिंग याने या महिलेचा विनयभंग केला. पण याबाबतचा गुन्हा दाखल करताना टाळाटाळ करुन त्या महिलेस तुझा कुठे विनयभंग झाला? तुला पैसे देतो, प्रकरण मिटवून घे, असे दराडे यांनी सांगितले, या महिलेच्या हातातील बांगड्या दराडे यांच्यासमोर कमलेशसिंग याने फोडल्या आहेत. हिंदु महिलेच्या बांगड्या तिच्या पतीच्या निधनानंतर फोडल्या जातात. असे असताना पोलिस निरीक्षक दराडे यांनी कमलेशसिंग याचा प्रवास प्रमुख म्हणून काम केले आहे. दराडे यांनी पालघर, पुणे व इतर ठिकाणी नोकरी करताना धर्मांतर करण्यास मदत केली आहे व यातून मोठी संपत्ती गोळा केली आहे. दराडे यांच्या संपत्तीची चौकशी करणार का? त्यास निलंबित करणार का? धर्मांतर विरोधी कायदा आणणार का? असे प्रश्‍न आ.सातपुते यांनी लक्षवेधीच्या वेळी मांडले. विधिमंडळात आ.सातपुते यांच्या लक्षवेधी प्रश्‍नास गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी उत्तर देताना सांगितले की, राहुरी तालुक्यातील ब्राम्हणी गावात भाजी विक्री करणार्‍या महिलेवर दबाव आणून कमलेशसिंग याने धर्मांतर करण्याचा प्रयत्न केला आहे. या प्रकरणी राहुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच कारवाई करणे गरजेचे होते. अधिकार्‍याने हलगर्जीपणा केल्यामुळे कमलेशसिंग याने अटकपूर्व जामीन मिळविला आहे. त्यामुळे पोलिस निरीक्षक दराडे यांची 15 दिवसात अप्पर पोलिस अधीक्षक अधिकार्‍यांमार्फत चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहे. चौकशीत दोषी आढळल्यास पुढील कारवाई करण्यात येईल. दराडे यांना नियंत्रण कक्षात पाठविण्यात येत आहे, असे गृहराज्यमंञी शंभूराज देसाई यांनी विधीमंडळात सांगितले आहे.

वंचितने केला निषेध – पो.नि.दराडे यांच्या बदलीचे वृत्त सोशल मिडीयावरुन व्हायरल झाल्यानंतर दुपारी 3 वाजता राहुरी पोलिस ठाण्याच्या आवारात पिंटूनाना साळवे व सचिन साळवे या दोन तरुणांनी स्वतःच्या अंगावर पेट्रोलजन्य पदार्थ ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे. या घटनेमुळे पोलिस ठाणे परिसरात खळबळ उडाली होती. पोलिसांनी या दोघांच्या हातातून पेट्रोलजन्य पदार्थांच्या बाटल्या काढून घेतल्याने अनर्थ टळला. पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांनी काही महिन्यातच राहुरी तालुका हद्दीत अवैध व्यवसाय पूर्णपणे बंद केले. छेडछाडीवर आळा घालण्यात त्यांना यश येत आले. त्यांचे कामकाज हे उल्लेखनीय असून अशा अधिकार्‍याची राहुरी तालुक्याला नितांत गरज आहे. त्यामुळे पोलिस निरीक्षक दराडे यांची बदली तात्काळ रद्द करण्यात यावी, ही मागणी तालुक्यात जोर धरु लागली आहे. दराडे यांची बदली रद्द न झाल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीचे पिंटूनाना साळवे व सचिन साळवे यांनी दिला आहे.

सर्वपक्षीय आज रस्ता रोकोमध्ये – पोलिस निरीक्षक दराडेंसारख्या खमक्या अधिकार्‍यावर अन्याय झाल्याने आज शनिवारी दि.24 रोजी राहुरी येथील नगर-मनमाड महामार्गावर सर्व पक्षीय संघटनांच्यावतीने रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात तालुक्यातील विद्यार्थिनी सहभागी होणार आहेत. या आंदोलनात ठाकरे सेनेचे उत्तर जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे, स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे, रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात यांच्यासह विविध संघटना व पक्षांचे पदाधिकारी सहभागी होणार आहेत.

COMMENTS