इस्लामपूर / प्रतिनिधी : इस्लामपूर पालिकेची निवडणुक विकास आघाडी व शिवसेना लढणार असून राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी हिंमत असले तर मंत्री जयंत पाटील य
इस्लामपूर / प्रतिनिधी : इस्लामपूर पालिकेची निवडणुक विकास आघाडी व शिवसेना लढणार असून राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी हिंमत असले तर मंत्री जयंत पाटील यांच्या शिवाय निवडणूक लढवून दाखवावी. तसेच कोणी किती निधी आणला याचा लेखा-जोखा मांडण्यासाठी आमची गांधी चौकात येण्याची तयारी आहे. वेळ व तारीख ठरवा, असे आवाहन विकास आघाडीचे अध्यक्ष विक्रम पाटील यांनी केले.
ते इस्लामपूर नगरपालिका येथे झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी शिवसेनेचे गटनेते आनंदराव पवार, विकास आघाडीचे उपाध्यक्ष नगरसेवक वैभव पवार, शकील सय्यद, प्रदीप लोहार हे उपस्थित होते.
विक्रमभाऊ पाटील म्हणाले, राष्ट्रवादीचे गटनेते संजय कोरे हे शहरात परिवर्तन झाल्यापासून नगराध्यक्ष यांच्या सानिध्यात होते. सभागृहामध्ये ते नेहमी पाठीमागील बाकावर बसत होते. राज्यात सत्ता आल्यानंतर पुढील बाकावर बसत आहेत. जशी सत्ता बदलते तसे ते बदलत असतात. त्यांना स्वत:च्या प्रभागाचा विकास करता आला नाही. त्यांना शहराच्या विकासाच्या बाबतीत बोलण्याचा कोणताही अधिकार नाही. त्यांच्या प्रभागातील रस्ते कोल्हापूर रोड ते वाघवाडी रोड व कामेरी रोड हे आमच्या सरकारच्या कारकिर्दीत मंजूरी आणून आम्ही पूर्ण केले. शहाजी पाटील तर निधीचा हिशोब मागत आहेत. त्यांनी कधीपण तारीख व वेळ निश्चित करावी, कुणी किती निधी आणला, कुणी किती विकास कामे केली याचा हिशोब जनतेसमोर देऊ.
आमच्या 5 वर्षाच्या कारकिर्दीत 123 कोटी 37 लाख 33 हजार 587 रुपयाचा निधी आणला. त्यांच्या 30 वर्षांच्या कारकिर्दीत 179 कोटी 53 लाख 97 हजार 95 रुपये एवढा निधी मिळाला. खंडेराव जाधव आमच्या सत्ताकाळात अनेक ठराव बेकायदेशीर झाल्याचा आरोप करत आहेत. ठराव बेकायदेशीर होताना राष्ट्रवादीचे नगरसेवक सभागृहामध्ये काय करत होते. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या नगरसेवकांनी नवीन घर खरेदी केल्यानंतर नगरपालिकेमध्ये वार्ड बुकाला नाव लावण्यासाठी खरेदीपत्राच्या 2 टक्के अन्यायी कर लावला होता. तो आम्ही रद्द केला. भुयारी गटर, 24 बाय 7 पाणी पुरवठा योजना, भाजीपाला मार्केटला त्यांना त्यांच्या काळात मंजूरी घेता आली नाही. आरक्षण टाकण्याची भिती दाखवण्याचा उद्योग राष्ट्रवादीने केला आहे. सध्या शिवसेनेने आणलेल्या 11 कोटींच्या निधीला विरोध करुन विकास कामात खिळ घातली. मुख्याधिकार्यांना हाताशी धरुन भुयारी गटारचे काम थांबवण्याचे पाप राष्ट्रवादी करत आहे.
शिवसेनेचे गटनेते आनंदराव पवार म्हणाले, भुयारी गटार योजनेचे पाठीमागील काळात काम शिवसेनेने बंद पाडल्याचा आरोप राष्ट्रवादीचे गटनेते संजय कोरे यांनी केला. त्यांचे आता वय झाले असून त्यांना आठवत नाही, काही ठिकाणी पाणी पाईपला लिकेज होते. त्याचे लिकेज संबंधीत ठेकेदार काढत नसल्यामुळे शिवसेनेने काम रोखले होते. त्यासाठी नगराध्यक्षांच्या दालनात बैठक झाली. त्यावेळी कोरे उपस्थित होते. त्यांनीही त्यावेळी लिकेज काढून देण्याबाबत सहमती दर्शवली होती. निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी राजकारण करण्याचा प्रयत्न करु नये.
COMMENTS