मानवतावादी दूरदृष्टी

Homeताज्या बातम्यासंपादकीय

मानवतावादी दूरदृष्टी

वामनदादा कर्डक यांचा स्मृतिदिन काल सर्वत्र साजरा झाला. महाराष्ट्रात असं एक ही गाव नाही,जिथं वामनदादा कर्डक यांच नाव नाही. आणि बाबासाहेबांचा असा कोणता

अर्थाशिवाय संकल्प
सोयीचे राजकारण
राजकीय मोर्चेबांधणी

वामनदादा कर्डक यांचा स्मृतिदिन काल सर्वत्र साजरा झाला. महाराष्ट्रात असं एक ही गाव नाही,जिथं वामनदादा कर्डक यांच नाव नाही. आणि बाबासाहेबांचा असा कोणताही जीवन प्रसंग नाही की जो भीमगीतात व्यक्त झाला नाही. प्रज्ञासूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सांस्कृतिक आघाडीची पताका निष्ठेने आणि खंबीरपणे आपल्या खांद्यावर घेऊन तेजस्वी लेखणीने आणि कणखर वाणीने बुद्ध, कबीर, फुले, शाहू, आंबेडकर यांचे विचार देशाच्या विविध प्रांतांत रुजवले. महाराष्ट्राच्या घराघरांत, वाडी-वस्त्यात, खेड्यापाड्यांत आणि माणसांच्या मनामनांत नेऊन पोचविणारे वामनदादा कर्डक; खर्‍या अर्थाने एकाच वेळी समाजशिक्षक, लोकशिक्षक आणि प्रागतिक चळवळीचे द्रष्टे भाष्यकार म्हणून त्यांच्याकडे बघितले जाते.  वामनदादा कर्डक हे सामाजिक परिवर्तनवादी चळवळीचे ऊर्जाकेंद्र होते असे म्हणणे चुकीचे होणार नाही. चळवळीचे ऊर्जाकेंद्र बनलेले वामनदादा विचारांची पेटती मशाल होऊन जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत आंबेडकरी विचार घेऊन समाजात कायम फिरत राहिले गायत राहिले. आंबेडकरी चळवळीच्या आधुनिक गीतरचनाकारांमध्ये लोककवी वामनदादा कर्डकांचा उल्लेख प्रथम स्थानी येतो. बुद्ध-फुले-शाहू-आंबेडकरी विचार समाजमनात पोचवताना समाजातील अनिष्ट रुढी, परंपरा, अंधश्रद्धांवर प्रहार करणारे गीतलेखन वामनदादांनी केले आहे. आपल्या लेखणीने व गीत गायनाने आंबेडकरवाद सांगणारे महाकवी वामनदादा कर्डक यांनी आंबेडकरी चळवळ जिवंत ठेवण्यासाठी संबंध आयुष्य खर्ची घातले. वामनदादा कर्डक यांनी भारतीय सांस्कृतिक परिघात भीम गीते या नवीन गीतप्रकाराची चळवळ गतिमान केली. दलितांच्या जीवनात लोककला ही परंपरेने आलेली होतीच मात्र त्याला स्वातंत्र्यानंतर  दलित नवस्वातंत्र्यच आणि स्वाभिमानाच बळ मिळालं आणि नवीन सांस्कृतिक चळवळ सुरू झाली. प्रल्हाद शिंदे, विठ्ठल शिंदे, विठ्ठल उमप, आनंद शिंदे, मिलिंद शिंदे, विष्णू शिंदे, प्रकाश पाठणकर ही अस्सल लोककलेचा बाज असलेली मंडळी स्वयंस्फूर्तीने भीम गीते गाऊ लागली. वामन दादा, प्रताप सिंग, आणि अनेक दलित गीतकारांनी भीमगीते लिहिली आहेत. पहिल्या पिढीतील कलाकारांनी आपल्या वेदना, पिळवणूक, कष्ट, अस्पृश्यता, भेदभाव, अन्याय, अत्याचार आपल्या गीतातून प्रकर्षाने, निर्भीडपणे व्यक्त केला आहे. सुगम गीत प्रकारात शिंदे घराणं प्रसिद्ध आहे, प्रल्हाद शिंदे, आनंद शिंदे, मिलिंद शिंदे, विठ्ठल उमप, नंदेश उमप, विष्णू शिंदे, पुष्म देवी, आदर्श शिंदे, उत्कर्ष शिंदे, अनिरुद्ध वनकर, राहुल साठे, शीतल साठे, अशोक निकाळजे आदींचे योगदान अनन्यसाधारण आहे. आंबेडकरी प्रबोधनात्मक गीतात समता, स्वातंत्र्य, न्याय, बंधुता ही मूल्ये ठिकठिकाणी जाणवतात, स्वाभिमान, अभिमान, जाणीव, जागृती, विद्या, करुणा ही जीवन मूल्ये अंगिकारायला शिकवतात. तर गुलामी, सलामी, मुजरे, चाखरी सोडायला प्रवृत्त करतात. आंबेडकरी कलावंतांची ही झुंड आत्ता काउंटर कल्चर प्रभावशाली आणि परिणामकारकतेने करत आहे. बाबासाहेबांच्या मानवतावादी दूरदृष्टीच्या विचारला वामनदादा कर्डकांनी चाल दिली. चळवळीतील अनुभवाच्या, अभ्यासकाच्या भूमिकेतून त्यांनी निर्माण केलेली गाणी आजही फुले आंबेडकरी चळवळीचा आवाज आहेत आणि उद्याही राहणार आहे. आजच्या गायक कवींकडून एवढीच अपेक्षा आहे की, त्यांनी वामनदादा प्रमाणे मानवतावादी दूरदृष्टी ठेऊन भीमगीतांची निर्मिती करावी.

COMMENTS